देशभरात कोरोनाचे तीन प्रकार

0
195

>> काही राज्यांत रुग्णसंख्येत वाढ

देशात ब्रिटनमधील कोरोनाच्या नवीन प्रकाराचे १८७ रुग्ण आढळले असून सहाजणांना दक्षिण आफ्रिकेतील कोरोना संसर्ग झाला आहे. तर एका व्यक्तीत ब्राझीलमधील कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे दोन प्रकार आढळून आले आहेत. हे दोन्ही प्रकार महाराष्ट्रासह केरळ आणि तेलंगणमध्येही आढळून आले आहेत, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. काही ठिकाणी नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. महाराष्ट्राशिवाय केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
ह्या नव्या रुग्णवाढीसंबंधी संशोधन सुरू असून महाराष्ट्रात अमरावती, यवतमाळमध्ये पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. मुंबईत नागरिकांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियमांचे पालन केले नाही, तर लॉकडाउनचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुंबईमध्ये रोज ३५० च्या जवळपास नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात महत्वाची बैठक बोलवण्यात आली. देशातील काही राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली होती.

रोजची रुग्णसंख्या १३ हजारांवर
देशात काही काळापूर्वी करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या १० हजारांच्या खाली आली होती आणि ती आता दररोज १३ ते १४ हजारांवर पोहोचली आहे.