देशभरातील 25 घरफोड्यांत सहभागी संशयितास कोलवा येथून अटक

0
10

>> पणजी पोलिसांची कामगिरी

देशभरात 25 हून अधिक घरफोडीच्या प्रकरणात गुंतलेला सराईत चोरटा अरमान शोकीन खान (दिल्ली) याला पणजी पोलिसांना कोलवा येथून अटक करण्यात यश आले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत येथे काल दिली.

पणजी पोलिसांनी मिरामार येथील फ्लॅटमधील चोरीप्रकरणी अटक केलेले संशयित आरोपी अरमान शोकीन खान (33, दिल्ली) आणि पवन गौड (22, उत्तर प्रदेश) हे सराईत चोरटे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून ते रझिया गँग या आंतरराज्य टोळीतील असल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपी अरमान खान हा दिल्ली आणि इतर आसपासच्या भागातील एक वाँटेड गुन्हेगार आहे. अशी माहिती अधीक्षक कौशल यांनी दिली.

मिरामार येथील फ्लॅटमध्ये दि. 1 जुलै रोजी दुपारी दीड ते सव्वा दोन या काळात ही चोरी झाली. चोरट्याने फ्लॅटचे लॅच कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. फ्लॅटमधील अंदाजे 75 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी 2 जुलै रोजी पणजी पोलीस स्थानकावर तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजच्या साहाय्याने तपास करून चोवीस तासांत संशयित आरोपींना कोलवा येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. दोघाही संशयितांनी मिरामार येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच बरोबर वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी संशयितांकडून सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.