केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात ज्या लोकांकडे शस्त्रे आहेत अशा परवानाधारकांची एक यादी तयार करून त्यासंबंधीचा सर्व तपशील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची योजना तयार केलेली असून या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शस्त्र परवानाधारकांना विहित नमुन्यातील अर्ज भरून ते जिल्हाधिकार्यांपुढे सादर करावे लागणार असल्याचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.उत्तर गोव्यातील परवानाधारकांना जवळच्या मामलेदार कार्यालयातून अर्ज मिळवावे लागतील. नंतर ते अर्ज भरून आपणाकडे सादर करावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्ज भरून देण्याची प्रक्रिया चालू महिन्याच्या ३० तारखेपर्यंत पूर्ण करावी लागेल. शस्त्र परवानाधारकांची अडचण होऊ नये यासाठी शनिवार व रविवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरून देण्याची सोय करण्यात येणार आहे.
नव्याने अर्ज भरून दिलेल्या देशभरातील परवानाधारकांची यादी ऑक्टोबर २०१५ पर्यंत ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्रालयाने ठेवले आहे. अर्ज भरून दिलेल्या परवानाधारकांना नव्या स्वरुपातील परवाना पुस्तिका देण्यात येणार असून या पुस्तिकेवर होलोग्राम व विशेष बारकोडची सोय असेल. तसेच त्यावर परवानाधारकाची इत्यंभूत माहिती असेल. परवानाधारक कुठल्या राज्यातील आहे, सध्या तो कुठे राहतो, त्याचा पत्ता बदलला आहे काय, बदलला असेल तर नवा पत्ता काय आहे आदी माहिती करून द्यावी लागणार आहे. शिवाय परवानाधारकाला आपला मोबाईल क्रमांक, लॅण्डलाईन फोनचा क्रमांक, ई-मेल आयडी, त्याचे जन्म राज्य, पती किंवा पत्नीचे नाव, जन्म कुठल्या जिल्ह्यात झाला, तो कुठल्या पोलीस स्थानक हद्दीत राहतो, व्यवसाय, त्याच्याकडे कसल्या प्रकारचे शस्त्र आहे अशी तपशीलवार माहिती द्यावी लागणार आहे. त्यासाठी परवानाधारकाला चार पानी अर्ज भरावा लागणार आहे. एकदा अशा प्रकारे देशभरातील शस्त्र परवानाधारकांची यादी तयार करून ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली की देशभरातील शस्त्र परवानाधारकांविषयीची इत्यंभूत माहिती कुणालाही तात्काळ मिळू शकेल. परिणामी एका प्रकारची सुसूत्रता निर्माण होईल. या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे मोहन यांनी स्पष्ट केले. राज्यभरात २३६५ शस्त्र परवानेधारक आहेत अशी माहितीही मोहन यांनी यावेळी दिली. उत्तर गोव्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपल्या शस्त्र परवान्यासंबंधीची माहिती देणारे अर्ज भरून द्यावेत असे आवाहनही यावेळी मोहन यांनी केले.