देशद्रोही

0
20

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून एका यूट्यूबर तरुणीला पकडण्यात आल्यानंतर जी माहिती समोर येऊ लागली आहे ती धक्कादायक आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हस्तकांच्या संपर्कात असल्यावरून हरियाणाची ज्योती मल्होत्रा हिची चौकशी सुरू झाली आणि त्यातून जे उघड होऊ लागले आहे ते एका व्यापक देशव्यापी तपासाची गरज व्यक्त करते आहे. आजकाल जगामध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर नावाची नवी जमात उदयाला आली आहे. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन आला आहे. समाजमाध्यमांच्या द्वारे आपले म्हणणे मांडण्याची सोय ज्याला त्याला मोफत उपलब्ध झालेली असल्याने त्याच्या आधारे अभिव्यक्त होण्याची स्पर्धाच जणू लागलेली आहे. आपण तयार केलेला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा, त्याला जास्तीत जास्त लाईक्स मिळावेत, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आणि त्यातून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळावे अशी अहमहमिका यूट्यूबसारखी माध्यमे वापरणाऱ्यांमध्ये लागलेली असते. ह्याच स्पर्धेचा लाभ उठवून आपल्या देशाविषयी चांगली प्रतिमा समाजात निर्माण करण्यासाठी आणि शक्य झाल्यास त्यांचा हेरगिरीसाठी आणि माहिती मिळवण्यासाठी वापर करण्यासाठी पाकिस्तानने अशा भारतीय इन्फ्ल्युएन्सर्सना म्हणजेच प्रभावकांना गळाला लावण्याचे प्रयत्न चालवले असावेत असे एकूण हे प्रकरण पाहता दिसते. ह्यापूर्वी महिलांचा वापर करून सैन्याधिकारी आणि इतरांना ‘हनीट्रॅप’ मध्ये गुंतवून त्यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. पाकिस्तानकडून तरूणींचा वापर करून लष्करी आणि हवाई दलाच्या तळांसंबंधीची माहिती ‘हनीट्रॅप’द्वारे मिळविली गेली. मात्र, सध्या जे प्रकरण उघडकीस आले आहे, तेही तितकेच गंभीर स्वरूपाचे आहे. ही यूट्यूबर तरुणी पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात आली. तिला पाकिस्तानच्या आलिशान सफरी घडवल्या गेल्या. अतिमहनीय व्यक्तीसारखी तेथे वागणूक दिली गेली. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर चीनमध्ये देखील पाठवले गेले. आलिशान गाड्यांतून प्रवास काय, बड्या बड्या हॉटेलांतून राहण्या-खाण्याची व्यवस्था काय, बड्या बड्या पार्ट्यांना निमंत्रण काय, अशी अगदी अतिमहनीय व्यक्तीसारखी वागणूक मिळाल्यावर अशा मोहजालाला ती बळी पडली तर नवल नाही. आपण ज्या लोकांच्या संपर्कात आहोत, ते मैत्रीचा आव आणत असले, तरी प्रत्यक्षात आपण देशविरोधी कार्याकडे ओढले जात आहोत ह्याचा थांगपत्ताही ह्या महिलेला लागू नये याचे खरोखर आश्चर्य वाटते. पैशाची हाव एवढी मोठी असावी की देशद्रोहापर्यंत घेऊन जावी? पाकिस्तानी उच्चायोगातील व्यक्तीशी तिचा संपर्क झाला. त्याने पाकिस्तानची सफर घडवली. मग पाकिस्तानला वारंवार भेटी झाल्या. चीनपर्यंत जाणे झाले. मग ह्या पाकिस्तानी ‘मित्रां’च्या तालावर नाचणे सुरू झाले. हा सगळा प्रकार केवळ ह्या एका महिलेपुरता सीमित नाही. सध्या ज्या व्यक्तींना अटक झालेली आहे, त्यामध्ये देवेंदरसिंग धिल्लों हा राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. नौमन इलाही, अरमान, तारीफ, शहझाद, महंमद अली मुर्तझा, गझाला, यामीन महंमद अशी इतरांची नावे आहेत. पाकिस्तानच्या आयएसआयने भारतामध्ये कसे जाळे विणायला सुरूवात केलेली आहे त्याचा हा खणखणीत पुरावा आहे. हे लोक काही लष्करी अधिकारी वगैरे नाहीत. राष्ट्रीय महत्त्वाची गुपिते वगैरे यांच्यापर्यंत पोहोचतील अशी शक्यताही फारशी नाही. तरीही पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्र हे असे पद्धतशीरपणे जाळे विणत असेल तर त्यामागे काही तरी हेतू निश्चितच असेल. देवेंदरसिंग धिल्लों हा गेल्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानला जाऊन आला. तेथे त्याची आयएसआयच्या हस्तकांशी भेट झाली. नौमन इलाही हा तर साधा सुरक्षारक्षक आहे. तो आयएसआयच्या संपर्कात होता. त्याच्या मेहुण्याच्या बँक खात्यात नियमित पैसे यायचे. म्हणजेच हे लोक आपापल्या कुवतीनुसार पाकिस्तानला मदत करीत होते. ज्योती मल्होत्रा ही तर आपल्यासारख्याच इतर प्रभावकांना जाळ्यात ओढत होती. पाकिस्तानला हितकारक असा मतप्रवाह जनमानसात निर्माण करण्याच्या दृष्टीने ह्या लोकांची मदत आयएसआय घेत होती असे ह्यावरून दिसते. पैसा आणि इतर आमिषांपोटी विकले जाणारे जोवर असतील, तोवर अशी हेरगिरी चालतच राहील. परंतु बाहेरच्या शत्रूपेक्षा असे घरभेदी अधिक घातक असतात. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा शोध घेणारी व्यवस्था देशात निर्माण व्हायला हवी. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा काही लोक पाकिस्तानच्या पथ्थ्यावर पडणारी भूमिका घेतात, त्यामागे अशी कारस्थाने असू शकतात हे भान ह्या साऱ्या प्रकरणातून आपल्याला आले म्हणजे पुरे.