देव भावाचा भुकेला

0
862
  • डॉ. सीताकांत घाणेकर
    (योगसाधना- ५५३, अंतरंग योग- १३८)

बहुतेकजण काही गोष्टींना महत्त्व देत नाहीत. त्या म्हणजे- संध्या, पूजा, प्रार्थना वगैरे. त्यांची आवश्यकता आपल्याला तेवढी भासत नाही, कारण त्यांमागील तत्त्वज्ञान आम्हाला समजलेले नाही. खरेतर देवाला वस्तू व तिचे मूल्य महत्त्वाचे नाही. महत्त्वाची आहे ती भक्ती म्हणजे भाव.

प्रत्येक मानवाच्या दिनचर्येत अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांतील काही शरीरासाठी, तर काही मनासाठी, थोड्या बुद्धीसाठी व तशाच आत्म्यासाठी. योगसाधनेत पंचकोशाला फार महत्त्व दिलेले आहे. कारण आपले पाच कोश आहेत- अन्नमय (शरीर), प्राणमय (प्राण), मनोमय (मन), विज्ञानमय (बुद्धी), आनंदमय (आत्मा).
या सर्व कोशांचा शास्त्रशुद्ध संभाळ करणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्यासाठीच विविध कोशांसाठी वेगवेगळे सोपस्कार आले- तोंड धुणे, दात घासणे, मल-मूत्र विसर्जन, आंघोळ, शरीरशृंगार, कपडे-आभूषणे-अलंकार, भोजन, संध्या, पूजा, प्रार्थना वगैरे.
आपल्यातील बहुतेकजण यांतील अनेक गोष्टी व्यवस्थित करतात, आणि करायलाच हव्यात. नाहीतर रोग होतील. पण काही गोष्टींना बहुतेकजण महत्त्व देत नाहीत. त्या म्हणजे- संध्या, पूजा, प्रार्थना. त्यांची आवश्यकता आपल्याला तेवढी भासत नाही कारण त्यांमागील तत्त्वज्ञान आम्हाला समजलेले नाही. काहीजण हे सोपस्कार करतात, पण ते भीतीपोटी, अपेक्षेपोटी.
अनेकजणांचा तर प्रामाणिक समज आहे की, प्रार्थना-पूजा कुटुंबातील महिलांनी अथवा वृद्धांनीच करायची असते. बालपणात, तरुणपणात त्यांची आवश्यकता नाही. बरोबर आहे. कारण या व्यक्ती पोटपूजेत एवढे व्यस्त असतात की देवपूजा करण्याची त्यांना इच्छा नाही किंवा वेळ नाही हे निमित्त असते. आणि जे कुणी करतात ते कर्मकांडात्मक करतात.

पूजा म्हणजे इतर कामांसारखी एक असे काहीजण मानतात. म्हणून ते म्हणतातदेखील- ‘‘मला बिलकूल वेळ नव्हता तरी मी पूजा करून टाकली.’’
पूजेच्या सामग्रीत विविध वस्तू आहेत- फुले, पाने, फळे, पंचामृत, मिठाई, वस्त्रे… श्रीमंत व्यक्ती त्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करतात. ते म्हणतातदेखील-‘‘पूजेसाठी चांगली सामग्री आवश्यक आहे, कारण ती देवाला अर्पण करायची असते.’’
या विचारात वावगे काही नाही; पण ते खरोखर आवश्यक आहे का? ‘शेवटी भगवंतानेच बनवलेल्या बहुतेक वस्तू आपण त्यालाच अर्पण करतो. यात मोठा पुरुषार्थ तो कोणता?’ असा विचार भक्तांनी करायला हवा. कारण पूजेअंती या सर्व वस्तू आपणच प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून वापरतो, खातो. म्हणूनच त्यामागील हेतू समजायला हवा.

खरोखर भगवंताला या सर्व वस्तूंची आवश्यकता आहे का? सुज्ञ, सज्जन लोकांनी त्यावर अभ्यास करणे, विचार व चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करणे समाजहितासाठी, कल्याणासाठी अत्यावश्यक आहे.
भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला यासंदर्भात काय सांगतात ते पाहू-
‘पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति|
तदहं भक्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः॥

  • ‘पत्र, पुष्प, फळ किंवा जल- जो कोणी मला (ईश्‍वराला) भक्तिपूर्वक अर्पण करतो, त्या शुद्ध चित्ताच्या भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते (काही असले तरी) मी (ईश्‍वर) आनंदाने सेवन करतो.’
    म्हणजे स्वतः देवालादेखील वस्तू व तिचे मूल्य महत्त्वाचे नाही. मुख्य आहे भक्तिपूर्वक अर्पण- भक्ती म्हणजे भाव.
    म्हणूनच आपले पूर्वज म्हणत असत- ‘देव भावाचा भुकेला’, ‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव.’

याबद्दल सामान्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून विविध कथा बालपणात सांगितल्या जातात-
१) शबरी-रामाची गोष्ट ः
शबरी एक भिल्लीण होती. ती रामाची भक्त होती. तिला भगवंताला प्रसादरूपात फक्त बोरे देणे शक्य होते. पण तिला फक्त गोड बोरेच द्यायची होती; आंबट नव्हे. म्हणून ती बोरे चाखून बघते व गोड बोरेच भगवंताला अर्पण करते.
आणि भगवान राम ती भेट आनंदाने स्वीकारतात.
आपल्या डोक्यात विविध विचार येतात-

  • उष्टी बोरे कुणाला देऊ शकतो का? दुसरा स्वीकारेल?
  • ती भिल्लीण म्हणजे अस्पृश्य होती. मग श्रीरामांनी तिच्या हातची बोरे स्वीकारलीच कशी?
    आपल्या अल्पबुद्धीला व विपरित बुद्धीला असेच विचार शोभतात. या कथेतील भाव महत्त्वाचा आहे. भगवंताला काय अभिप्रेत आहे हे ज्ञान मुख्य आहे.
    २) सुदामा- श्रीकृष्ण ः
    सुदामा एक गरीब-बिचारा ब्राह्मण होता. त्याच्या घरी उपासमारी होत होती म्हणून पत्नीच्या विनंतीप्रमाणे तो आपला बालमित्र- श्रीकृष्ण- याला भेटायला द्वारकेला गेला. जाताना रुमालात गुंडाळून सुके पोहे घेऊन गेला व तेही मूठभर.
    सुदामा आला हे कळल्यावर कृष्ण अगदी पळत जाऊन त्याला भेटला. त्याला आलिंगन दिले व विचारले की वहिनीने माझ्यासाठी काय दिलंय?
    ब्राह्मणाने ते पोहे कृष्णाला दिले व त्याने ते आनंदाने स्वीकारले. रूचीने थोडे थोडे खाल्ले. इथेदेखील देवाला भक्ताचा भावच दिसला.
    खरे म्हणजे सुदामा गरीब असेल, त्याच्याकडे दाम, संपत्ती कमी असेल, पण तो ‘बिचारा’ नक्कीच नव्हता. तो एक तेजस्वी ब्राह्मण होता. आमच्यासारख्या सामान्यांनी त्यातील बोध घ्यायचा असतो. भारतीय तत्त्वज्ञानामागे किती उच्च विचार व चिंतन आहे हे समजणे अपेक्षित असते. त्यासाठी या सर्व साहित्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे आवश्यक असते. आपण फक्त पुराणांतल्या कथा वाचतो व कृतकृत्य होतो. सांगणारा पुराणिक, हरदासदेखील या कथा मीठमसाला लावून सांगत असतो. बालपणी त्या आपण ऐकतो ते ठीक आहे, पण जशी आपली बुद्धी वाढते तसा सखोल अभ्यास, भावार्थ, आध्यात्मिक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

एक कोट्यधीश व्यक्ती चांगल्या मार्गाने अथवा वाईट मार्गाने धन मिळवते व भगवंताच्या चरणी लाखो रुपये अर्पण करते. तेदेखील स्वतःच्या प्रसिद्धीसाठी. एक गरीब कष्ट करून जे धन जमवतो त्यातील एक रुपया देवाचरणी अर्पण करतो- निःस्वार्थ भावाने, कृतज्ञतेपोटी. तेव्हा त्या धनाचे मूल्य भगवंतच ठरवतो. आजच्या समाजात असे अनेकजण दानी दिसतात.

प्रत्येक मानवाला विविध समस्या, संकटे असतात. केव्हा केव्हा त्यामुळे तो खचून जातो. पूर्वाश्रमीचे नरेंद्र व नंतरचे स्वामी विवेकानंद आपले गुरू श्रीरामकृष्ण परमहंसांकडे यासंदर्भात मार्गदर्शनासाठी जात असत. त्यावेळी गुरूंनी त्याला सांगितले की, तू दुर्गामातेकडे जा व तिला तुझ्या समस्या सांग. ती तुला नक्कीच मदत करेल.

त्याप्रमाणे जेव्हा नरेंद्र ठरवून जायचा पण तिथे गेल्यावर एवढा भावविभोर व्हायचा की त्याला म्हणे मी कशासाठी आलो होतो याची आठवणच होत नसे.
यासंदर्भात प. पू. पांडुरंगशास्त्री आपले मत प्रदर्शित करतात- ‘ईश्‍वरपूजन करण्याची आकांक्षा जीवनात कोणामध्ये जागृत होत नाही? प्रभू जर प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहिला तर त्याची कोणत्या रीतीने पूजा करावी याविषयी अनेक विचार माणूस करत असतो. परंतु खरोखर असा प्रसंग उपस्थित होताच त्याला काहीच सुचत नाही. त्याची इंद्रिये स्थिर बनतात, वाणी विलीन होते. जणू ही सर्व प्रभूला पाहून कृतकृत्य तर बनली नाहीत ना? असे वाटते. शेवटी डोळे त्याच्या मदतीला येतात आणि अश्रुजलाने ईश्‍वरपूजन होते. हा भावविभोर मानव प्रभूला सांगतो की, दुसरे काही करू शकत नाही, पण… ‘‘प्रभू! तुला प्रेमाने पाहिल्यामुळे माझे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत.’’
खरेच किती उच्च अवस्था ही ज्ञानी भक्ताची? नरेंद्राच्या बाबतीत असेच घडत असेल का?
आपणही अशी भक्ती व पूजा करूया.