अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप
भाजपकडून सातत्याने अपमान केला जात असल्याने आज होणार्या महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यात हजर राहणार नसल्याचे, शिवसेनेने सांगितले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिवसेना सामील होईल की नाही, याबाबतही अनिश्चितता कायम आहे.शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, भाजपनेत्यांबरोबर युती करण्यासंबंधी कोणतीही बैठक झालेली नाही.
दरम्यान, त्याअगोदर बोलताना भाजप सरचिटणीस राजीव प्रताप रुढी यांनी आजच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेतून कोणाचा शपथविधी होईल असे वाटत नाही, असे सांगितले. शिवसेनेशी बोलणी चालू आहेत, पण त्यातून अजून काही निष्पन्न झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज भाजपचे नागपूरचे आमदार व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून वानखेडे स्टेडियमवर शपथ घेणार आहेत. ‘लहान व नेटके सरकार शपथ घेईल’ असे भाजप सूत्रांनी सांगितले.
शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे वरिष्ठ नेते, भाजप राज्यांचे मुख्यमंत्री, बॉलीवूड सितारे व अन्य हजारो मान्यवर निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर १० मंत्री शपथ घेतील. यात एकनाथ खडसे, सुधीर मुंगटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे तसेच अनुसूचित जाती व जमतींमधील आमदारांचा समावेश असेल असे कळते.