गणेश चतुर्थी विशेष – देवा, तूचि विद्याधरा…

0
248

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

मनभावन श्रावण आणि सृष्टीच्या समृद्धीचा सरताज म्हणजे भाद्रपद. या दोन्ही महिन्यांचा आनंददायी कालखंड म्हणजे वर्षाऋतू. ज्येष्ठ आणि आषाढ मासांत अविरत बरसणार्‍या पर्जन्यधारांनी न्हाऊन निघालेली सृष्टी तृप्तीच्या हिरव्याकंच वैभवलेण्याने सजून दिमाखात मिरवत असते. चैतन्याचा दरवळच जणू सृष्टीच्या रोमारोमांतून नित्य अनुभवास येत असतो. प्राणिमात्रही या चैतन्याच्या संजीवक स्पर्शाने आनंदविभोर मनःस्थितीत असतात.
वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, गोकुळाष्टमीसारख्या सण-उत्सवांच्या सानंद आचरणाने श्रद्धाळू मन मांगल्याच्या, पावित्र्याच्या भावनेने ओथंबून आलेले असते; काठोकाठ भरून वाहणार्‍या नदी-नाल्यांसारखेच! मनालाही दिव्यत्वाचे भरते येते. ब्रह्मानंद प्राप्तीच्या या आरंभकाळातच मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाची जाणीव होते आणि ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशीच प्रत्येक भाविकाची अवस्था होऊन जाते. एका संस्कृत श्‍लोकाच्या अर्थानुसार- ‘ज्याच्या आंतरिक तेजाने अग्नी प्रज्वलित होतो, सूर्यदेव प्रकाशमान होतो आणि अखिल विश्‍वच उजळून निघते अशा सुखकर्ता- दुःखहर्ता गजाननाच्या घराघरांतल्या आगमनाने जीवन प्रसन्न आणि प्रकाशमय झाल्याचा अनुभव येतो.’
भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी हा विघ्नहर्ता गणराज सजवलेल्या मखरात विराजमान होतो आणि आबालवृद्धांची मने हर्षोल्हासाने न्हाऊन निघतात. हा चैतन्योत्सव प्रामुख्याने दीड दिवस साजरा होत असला तरी आनंद द्विगुणित होण्याबरोबर त्याच्या वास्तव्याचा कालावधीही वाढत जातो. पाच, सात, नऊ, अकरा ते एकवीस दिवसांपर्यंतसुद्धा. एखादी ‘आंगवण’ आणि ‘आंतरिक ऊर्मी’ हेच प्रामुख्याने गणेशाच्या वास्तव्याचे कारण असते. सर्व प्रकारच्या व्यक्तिगत अडचणींवर, समस्यांवर मात करून हा वार्षिक गणेशोत्सव उदंड उत्साहात साजरा केला जातो. गोमंतकातील हाच उत्सव असा आहे ज्यावर महागाई मात करू शकत नाही आणि कसल्याही टंचाईचा जाचही होऊ शकत नाही. गजाननाचा एक निसटता कृपाकटाक्षसुद्धा अडचणींचे डोंगर क्षणात नष्ट करू शकतो ही श्रद्धाच गणेशभक्ताला त्याचा उत्सव सर्वांगसुंदर करण्याची प्रेरणा देत असते.
शिवपार्वतीनंदन गणपती जसा गणांचा अधिपती आहे, तसा तो देवांचाही ‘देव’ आहे. ‘प्रारंभी विनंती करू गणपती’ म्हणून सगळे देवसुद्धा प्रारंभी त्यालाच विनवतात. त्याला मनोभावे नमिल्याशिवाय कुठलेही कार्य सिद्धीस जाऊ शकत नाही असे सांगणार्‍या अनेक कथा आपल्याकडे प्रचलित आहेत. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती तो गणाधिपती! विद्याकलासंपन्न अशा बुद्धिदात्या गणेशाच्या अंगभूत वैशिष्ट्यांचा सुंदर वेध ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी घेतला आहे. ते म्हणतात की, ‘गणपती आपल्या जीवनात, जीवनाच्या विविध क्षेत्रांत निरंतर अग्रभागी राहतो. तो देवांचा सेनापती आहे. गनिमी काव्याच्या युद्धाचा जनक तोच. शत्रुपक्ष प्रबल आहे हे पाहिल्यावर सिंधुरासुराचा वध करताना त्याने गनिमी काव्याचा आश्रय घेतला. गंडकी नगराच्या संरक्षणासाठी सात तट उभे करणार्‍या दैत्य राजाच्या अंतःपुरापर्यंत तो मोठ्या शिताफीने पोहोचला. शिवशंकराचे आत्मलिंग घेऊन जाणार्‍या रावणाला त्याने शब्दात अडकवून ते लिंग गोकर्ण क्षेत्री स्थापन केले. देवांतक आणि नरांतक या राक्षसबंधूशी लढत असताना दमलेल्या सैनिकांना विश्रांती मिळावी म्हणून त्याने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन पत्नींना त्यांच्या सख्यांसह युद्धाची आघाडी सांभाळण्याच्या सूचना दिल्या. स्त्रियांचे सैन्य उभारणारा पहिला सेनापती हा गणपती होय. एका मोठ्या युद्धात लढून गणपती त्यात विजयी झाला. गणपतीच्या स्वागताची जंगी तयारी झाली. पण त्यांच्याकडील मान-सन्मान न स्वीकारता एका भोळ्याभाबड्या शुक्ल नावाच्या भक्ताकडे गणपती गेला आणि त्याच्या घरची पेज आनंदाने प्याला.’ ज्योतिर्भास्करांच्याच सांगण्यानुसार गणपती हा रणांगणात लढणारा, अंतिम विजय प्राप्त होण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गांचा अवलंब करणारा, आनंदाने गोडधोड खाणारा, आनंद झाला की नाचणारा, विद्येचे महत्त्व जाणणारा जागरूक असा देव आहे. ज्यांना आपण विद्याव्यासंगी व्हावे, नृत्य-गायन कलेत नैपुण्य मिळवावे किंवा खाण्या-जगण्यातील आनंद मनमुराद उपभोगण्याची ज्याची इच्छा असेल तर त्यांचा गणपती ‘आदर्श देव’ आहे.
आपल्याकडे गणेशभक्तीची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेचे जनक म्हणजे महाराष्ट्रातील थोर गणेशभक्त चिंचवडचे मोरया गोसावी. त्यांनी गणेशभक्तीचा सर्वत्र प्रसार केला. त्यांच्या गणेशभक्तीचा हा वारसा त्यांच्या पुत्रानेही पुढे चालवला. एवढेच नव्हे तर सतत सात पिढ्या गणेशभक्तीची उत्कट परंपरा राखणारे हे थोर घराणे. १३ व्या शतकातील महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण हे मुख्य दैवत असले तरी त्या पंथातील एक प्रमुख कवी श्री. नरेंद्र यांच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ काव्यग्रंथाच्या आरंभी गणेशस्तुतीचे उदाहरण सापडते.
उमा शंकराचा कुमरू| की सांधो गणांचा ईश्‍वरू|
तो सेंदुरें साडंबरू| गोरा मेरू जैसा॥
या उमाशंकरसुताविषयी सर्वच प्रसंगी संतांच्या मनात नितांत श्रद्धाभावना आहे. वारकरी पंथाचे संस्थापक संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरांनी तर ज्ञानेश्‍वरी ग्रंथाच्या आरंभीच- ‘देवा तूचि गणेशु| सकलार्थमति प्रकाशु|’ अशा शब्दांत श्रीगणेशाचे सुंदर स्तवन केले आहे.
संत तुकाराम व मोरया गोसावी समकालीन. तुकाराम विठ्ठलाचे परम भक्त, तर मोरया गोसावी परम गणेशभक्त.
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
ते तिन्ही देवांचे जन्मस्थान
हा तुकारामांनी रचलेला सुंदर अभंग. आजही तो सुरील्या पद्धतीने सादर केला जातो. श्रीगणेशाची आराधना संत तुकारामांनाही मान्य होती हे यावरून दिसून येते.
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
यासारखी नितांत सुंदर आणि भक्तप्रिय आरती रचून संत रामदासांनी आपल्या गणेशभक्तीची प्रचिती दिली आहे. त्यांच्या दासबोध महाग्रंथाचा दुसरा समास केवळ गणेशस्तवनाचाच असून ‘गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा’ असे नमन ते उत्कट भावनेने करतात.
श्रीगणपती हा गणांचा अधिपती, तसेच बुद्धिदाता देव. त्याच्या जन्मासंबंधी, प्रामुख्याने गजमुखासंबंधी ज्या कथा आहेत त्यांमध्ये पार्वतीच्या स्नानगृहाबाहेर पहार्‍याला बसलेल्या गणपतीची कथा जास्त प्रसिद्ध आहे. पार्वतीला पुनरपी पुत्रप्राप्ती करून देण्यासाठी भगवान शंकरानी हत्तीचे मस्तक गणपतीच्या धडावर बसवले. गजानन वा गणेश, तसेच इतर अनेक पवित्र नावांनी ही मंगलमूर्ती अगणित भक्तांच्या अंतःकरणात विसावली.
विज्ञानाने घडवलेल्या शेकडो चमत्कारांनी आज मानवी जीवन भौतिकदृष्ट्या सुसह्य बनले आहे. बाह्यांगी प्रगतीच्या पंखांवर आपण स्वार झालो आहोत. शरीर आणि मनालाही तत्कालिक आनंद देणार्‍या साधनांची निर्मिती ‘वाढता वाढता वाढे’ अशाच प्रमाणात होत आहे. वाचन, संगीत, प्रवास, खेळ यांसारख्या जीवनानंद देणार्‍या गोष्टींबरोबरच समाजातील अस्वस्थ करणार्‍या घटनांनी संवेदनशील मने वेदनाग्रस्त होतात. खून, बलात्कार, जातीय तेढ, धार्मिक दुरावा, प्रत्येक क्षेत्रात मातलेला उदंड भ्रष्टाचार, सबंध जगाला भेडसावणारा दहशतवाद अशा अनेक मानवनिर्मित आसुरी गोष्टींनी हादरलेल्या आणि भेदरलेल्या मनःस्थितीत आपण वावरत आहोत. अशा प्रतिकूल परिस्थितीत निर्भयतेने जीवनाला सामोरे जायचे असेल, आयुष्याचा हरवलेला सूर शोधायचा असेल तर सश्रद्ध मनाने सर्वशक्तिमान ईश्‍वराला शरण गेल्याशिवाय तरणोपाय नाही याचीही प्रचिती आपल्याला येत असते. ईश्‍वर हा सर्वार्थाने अनुभवण्याचा विषय आहे. श्रीगणेश हे ईश्‍वराच्या अनेक रूपांपैकी एक मंगलरूप. दुःखाचा परिहार करणारे, निसर्गाशी तादात्म पावायला लावणारे, घराघरांत, मनामनांत आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपात समाजात चैतन्य जागवणारे, आबालवृद्धांच्या मनात भक्तीचा झरा निर्माण करणारे, घरातील नातेसंबंध आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करणारे, नृत्य-संगीत-कलेच्या रूपाने मन रिझवणारे. अशा या विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता होत आहे. या सुखनिधान गणेशोत्सवाच्या गणेशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
॥ श्रीगणेशाय नमः ॥