देवाच्या पायी  ठेविला माथा!

0
223

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
आज गुरुवारचा दिवस होता, महाराजांचा दिवस! कालचठरवून टाकले होते – दत्तवाडीला जायचे, महाराजाचेदर्शन घ्यायचे. त्याच्या चरणी लीन व्हायचे. पुष्कळ दिवस त्याचे दर्शन घेतले नव्हते. त्याचे परिमार्जन करावे. सकाळी चहा घेण्याअगोदर आंघोळ उरकली व बाहेर पडलो. पावसाची सततधार चालू होती. काळाकुट्ट अंधार पसरला होता, जणू रात्रच. लक्षणही काही ठिक नव्हते.
तरीही मोटरसायकलवरून निघालो. नशिब, पाऊस थोडा विश्रांती घ्यायला थांबला होता. डोक्यावरून पावसाचे ढग सत्तरी तालुक्याच्या दिशेने धावत होते. थोडाफार प्रकाश पडलेला. महाराजांच्या मंदिरात सुखरूप पोहोचलो. पावसाची पर्वा न करता देवाच्या दर्शनाला कितीतरी भाविक आले होते. डोक्यात माजलेले काहूर बाजूला सारत मीही भक्तीने देवासमोर मंडपात बैठक मांडली. प्रत्येक भक्ताच्या हातात काही ना काही होतेच. काहींच्या हातात अगरबत्ती, केळी, फुले-फळे… मात्र, माझ्या हाती काहीच नव्हते. लोक नमस्कार करायचे, दंडवत घालायचे. मी स्तब्ध उभाच होतो. कंबर मोडली होती ना! बसवत नव्हते. म्हणायचो, ‘’देवा, सांभाळ रे! रागावू नकोस… जमत नाही रे!’’ मूर्तीचे हास्य मला सुखावून जायचे.शेेजारी बसलेला, माझे सदैव भले व्हावे म्हणणारा व्यक्ती मला हसला. देवाच्या दारी सर्वजण आपले मित्रच असतात. मी हसल्यासारखे केले… हसलो नाही. जमले नाही त्याला मी तरी काय करू? कसे हसणार… माझे वाईट व्हावे अशी त्याची नेहमीची इच्छा. तो आता दररोज देवासमोर बसलेला असतो. ध्यान लावून, डोळे मिटून देवाची आळवणी करत काही ना काही मागतच असतो. कुणी देवळांत नसताना येतो व देवाजवळ ध्यानस्थ बसतो. देवाची क्षमा मागतो. नाक घासतो, रडतोही! हल्ली त्याची प्रकृती खालावली होती. चालताही येत नव्हते. वाकडे चालत होता. घरात वादंग चालू होता. जेवण घशाखाली उतरत नव्हते. खाली गेलेले पचत नव्हते. केलेली कर्मे जेवण पचायला देत नव्हती. कित्येक दिवस तो झोपला नव्हता. रात्री-बेरात्री किंचाळत उठायचा. घरची बोंबाबोंब शेजार्‍यापर्यंत पोहोचली. दारी १०८ आली. रातोरात त्याला इस्पितळात नेले गेले. मी उठलो, देवाला नमस्कार केला. देवाच्या पायी येणारा देवाला दंडवत घालत होता. मागणे मागत होता. नवस बोलत होता. प्रत्येकाची आशा वाढली होती. दर सोमवारी महादेवाकडे गर्दी, मंगळवार व संकष्टीला गजाननाकडे, गुरुवारी महाराज, शुक्रवारी देवी तर शनिवारी मारुती व शनिदेव! भक्तांची भयानक रेलचेल. श्रावण महिन्यांत तर महाभयानक गर्दी. कोट्यवधी लोक, कोट्यवधी देव! मग ही नामावली प्रत्येकाचे प्रश्‍न, त्याला उत्तर देणे. त्यांचे पहिल्यांदा कान देऊन ऐकणे कसे शक्य असेल देवाला! गणेशाकडे दाद मागणे, साद घालणे म्हणजे पहिल्यांदा मुषकराजाच्या कानात सांगायचे व त्याच्यामार्फत देवाजवळ पोहोचले म्हणायचे. आज-काल मुषकाकडे वाढलेली गर्दी पाहून दुसरा तयार केला तरीही पुरेना. शेवटी मुंबापुरीतील सिद्धिविनायकाच्या देवालयातील मुषक गायब झालेत. एरवी काही साहेबांना सांगायचे असेल तर आम्ही द्वारपालाला सलाम ठोकतो की नाही?
मग एवढ्या भक्तांचे ऐकणे म्हणजे देवाजवळ कॉम्युटर असायला हवा. त्याशिवाय ते शक्यच नाही. म्हणजे या मोठमोठ्या देवांजवळ एक एक सुपर कॉम्प्युटर असायला हवा. मग त्यांनाही कुणीतरी फिडींग करायला हवे की नको? म्हणजे भारतात कॉम्प्युटरचे आगमन केव्हाच झाले म्हणायचे! सगळ्यांचे जोडलेले हात, त्यांचे ते लावलेले ध्यान बघून काहीही न मागता तिथून निघालो. देवालयाला प्रदक्षिणा घातली. बागेतल्या औदुंबराच्या पेडावर गेलो. चकरा मारत राहिलो. तिथल्या कोपर्‍यात बसकण मारली. डोके शांत केले. देवाचे नामस्मरण करायला सुरवात केली. महाराजांचे नाव ओठांवर ठेवले. डोळ्यासमोर मूर्ती आणली. त्याची आळवणी करू लागलो.
‘‘वत्सा, उठ! डोळे उघड. मी आलोय.’’
डोळ्यांसमोर एक बटुमूर्ती उभी होती. मला डोळे उघडायची आज्ञा करत होती. मी डोळे उघडले. समोर ती बटुमूर्ती उभी होती. जवळपास कुणी नव्हते. मी स्वत:ला चिमटा काढला. सगळे खरे होते. बटु हसले.
‘‘बोल काय हवय तुला!’’
‘‘तुला मला बघायची इच्छा होती ना! साक्षात्कार घडावा असं वाटत होतं ना?’’ मी हळूच म्हटले.
कित्येक वर्षांपूर्वी दिवसाढवळ्या पणजीतील महाराजांचे भक्त बागेत औदुंबराच्या पेडाजवळ जमले होते. त्यातल्या एकाला साक्षात्कार झाला. महाराजांनी म्हटले, ‘‘मी इथं काळोखात असतो.’’
बातमी वार्‍यासारखी पसरली. पणजीकरांनी तिथे चहुबाजूंनी वीजेचे खांब बसवले. सारा परिसर प्रकाशमय केला. तेव्हापासून मनात इच्छा प्रसवली – मला पण साक्षात्कार व्हावा, महाराजांचे दर्शन व्हावे.
आज समोर बटुमूर्ती उभी होती. मला काहीतरी मागण्यास सांगत होती. मी हटले, ‘‘त्या मघाशी माझ्या शेजारी बसलेल्या माणसाला चरणाशी ठेव. लाचार आहे, पश्‍चात्ताप होतोच त्याला… माफ कर. त्याची सून गरोदर आहे. नातू हवाय त्याला. त्याच्या व्याध्या दूर कर. घरातील वादंग आवर. माझा तो दुसरा दुष्ट दुश्मन अंथरूणावर पडलाय… मला त्याचे हाल बघवत नाही. त्याला बरा कर. तीसरा तो – तू तर त्याला चांगलाच ओळखतोस. तुझा दंड काही वर्षे सांभाळलेला. त्या भालदार काठीला दंड म्हणून संबोधला… हाती भालदार काठी घेतली ना. तोच तो… त्याची बायको आजारी आहे. गरीब बिचारी.. करतोय कोण व भोगतो कोण? तिला भोगायला लावू नकोस.’’
‘‘अरे, वेडा का खुळा? या सर्व लोकांनी तुला एकटा खिंडीत गाठला. तुझ्यावर मिळेल त्या हत्यारांनी वार केले… तुझ्यावर घाण टाकली त्यांना माफ करायला सांगतोस? तुझ्याकरता केव्हा मागून घेणार? तुझी बायको-पोरे त्यांच्याकरता तरी माग!’’
‘‘देवा तू अंतर्ज्ञानी आहेस, तूच मला सगळे काही दिलेस. वाट्याला आलेले भोग तूच मला भोगायला लावलेस… ती तुझीच लीला होती. का ते तुला माहीत. दु:खात माझ्या जखमांवर फुंकर घातलीस. माझे दु:ख सहन करायला शिकवलेस, न मागता देतच राहिलास. तुझ्याकडे मागण्यासाठीची यादी घरीच राहिली. तुझी कृपा-आशीर्वाद सदैव माझ्या व माझ्या कुटुंबावर राहो अशी पामराची विनंती आहे.’’
‘तथास्तु…!’’ असे म्हणून बटूमूर्ती हसली. अंतर्नाद पावली. मी परत एकदा ध्यान लावले. मन विचलित न करता नामस्मरण करत राहिलो. डोळे उघडले. कितीतरी स्त्री-पुरुष प्रदक्षिणा काढत होते. तिथली विभूती कपाळावर लावली. पावले परतीला लागली. मन कसे शांत झाले होते. डोळ्यांसमोर बटूमूर्तीचे रूप थाटले होते. हृदयात जडून बसले होते.
मी परत देवळात गेलो. देवासमोर बैठक मांडली. मनोभावे देवाचे आभार मानत राहिलो. ती पूर्वीपासून शेजारी बसलेली व्यक्ती तिथेच होती.. परत ती माझ्याकडे बघून हसली. मी पण हसलो. मनापासून मी त्या व्यक्तीला माफ केले होते. त्याच्याविषयी माझ्या मनात आता काहीच कलुषितपणा राहिला नव्हता.
लोक जात-येत होते. प्रत्येकाच्या हातात अभिषेक पावती, अगरबत्ती, फळे-फुले होती. जो-तो देवाला आमिष दाखवत होता. प्रत्येकाच्या डोळ्यात आशा होती. मी मनात म्हटले, ‘‘देवाला तुमच्या हृदयाच्या व्यथा कळतात. तो नक्की त्या दूर करेल. त्याच्यावर माया करा… त्याच्या पायावर माथा टेकवा.’’