देवस्थान समित्यांच्या निवडणुका उत्साहात

0
5

>> अनेक मंदिरांच्या समित्यांची झाली बिनविरोध निवड

राज्यात काल रविवारी 9 फेब्रुवारी रोजी विविध देवस्थानच्या निवडणुका पार पडल्या. यात काही ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला तर काही ठिकाणी बिनविरोध समित्यांची निवड करण्यात आली. डिचोली तालुक्यातील साळ आणि मयेमधील दोन देवस्थानांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. तर पेडणे तालुक्यातील आगरवाडा येथील श्री नागनाथ भूमिका वेताळ देवस्थानची निवडणूक बरीच गाजली. तब्बल 4 तासांच्या खडाजंगीनंतर पेडणे तालुका मामलेदार कार्यालयाचे प्रतिनिधी अव्वल कारकून गोपीनाथ मसुरकर यांच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर निवडणूक बिनविरोध पार पडली. तथापि, बऱ्याच देवस्थानांमध्ये समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रत्येक मंदिराजवळ पोलीस कुमक त्याप्रमाणे मामलेदार कार्यालयातून खास निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. देवालयांचे प्रशासक आदी अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून होते.
साळ येथील श्री महादेव भूमिका देवस्थानच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला. तर मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या निवडणूक प्रक्रियेस हरकत घेण्यात आली. सत्तरी तालुक्यातील वेळूस रवळनाथ देवस्थानच्या निवडणुकीवर गुरव महाजन गटाकडून बहिष्कार टाकण्यात आला. या देवस्थानामध्ये अपेक्षित हक्क मिळत नसल्यामुळे या देवस्थानचे गुरव महाजनांनी याला तीव्र आक्षेप घेतला. मतदान प्रक्रियेमध्ये अपेक्षित हक्क मिळत नाही. गुरव समाजावर अन्याय होत आहे. यामुळे या निवडणुकीमध्ये भाग घेणार नसल्याचे गुरव समाजाने स्पष्ट केले व त्यांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही. त्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये गावकर समाजाने उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला व बिनविरोध समितीची नियुक्ती करण्यात आली. फोंडा व धारबांदोडा तालुक्यातील विविध देवस्थान समित्यांची निवड करण्यात आली. काही देवस्थानात बिनविरोध तर काही ठिकाणी मतदान घेऊन समितीची निवड करण्यात आली. निवडणुकीवेळी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काणकोणातील 10 मंदिरांच्या निवडणुका शांततापूर्ण रितीने

काणकोण तालुक्यातील 2025 ते 2028 सालांसाठी नवीन समित्या निवडण्याची मंदिरांतील प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीाया वातावरणात संपन्न झाली. तालुक्यातील 11 मंदिरापैकी 10 मंदिरांतील निवडणूक अत्यंत खेळी मेळीच्या आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या सर्व मंदिरातील निवडणुकींवर काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर जातीने लक्ष ठेवून होते. श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाची निवडणूक प्रक्रिया संध्याकाळी बऱ्याच उशिरापर्यंत सुरू होती.