पणजीत गोवा राज्य संस्कृत संमेलन थाटात
भाषेबद्दल प्रेम, अभिमान असून उपयोग नाही तर त्या भाषेचा प्रचार करायला हवा; विशिष्ट विचार करायला हवा. संस्कृत ही ‘देववाणी’ म्हणून आपण ओळखतो त्याची ‘जनवाणी’ कशी करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द लेखिका वीणा गवाणकर यांनी येथे केले.
‘संस्कृत भारती’, गोवातर्फे कला अकादमी आणि गोवा शासनाचे राजभाषा संचालनालय यांच्या सहयोगाने मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात रविवारी आयोजित केलेल्या गोवा राज्य संस्कृत संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर उद्घाटक या नात्याने श्रीमती गवाणकर बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर विशेष पाहुणे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा, संस्कृत भारती गोवाचे अध्यक्ष जगन्नाथ मणेरकर, स्वागताध्यक्ष श्रीनिवास धेंपो, उपाध्यक्ष आश्विन नाईक, चिन्मय मिशनच्या संध्या कामत, भाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वजरीकर हे मान्यवर उपस्थित होते.
भारतात अनेक भाषा आहेत परंतु त्यात सर्व भाषांना जोडणारी एकच भाषा आहे, ती म्हणजे प्राचीन संस्कृत भाषा. नवीन संकल्पना, नवीन विषयांची मांडणी करण्यासाठी भाषेत शब्दांची क्षमता असायला हवी. बदलत्या व्यवहाराबरोबर भाषेला परिवर्तनशील व्हायला लागते. समाजाची गतीशीलता भाषेला झेपली नाही तर ती मृत्यूपंथाला लागते आणि अगदी मृत जरी झाली नाही तरी ती दुबळी होते. हे जर होवू द्यायचे नसेल तर नवीन संकेत, नवीन प्रतीक, नवीन शब्द व नवीन परिभाषा तयार करून तिचे बळ वाढविणे गरजेचे आहे. समाजाच्या प्रगतीबरोबरच मानवी इतिहासात सतत नवीन गोष्टींची भर पडत असते. जुन्या गोष्टी अनेकदा नष्टही होत असतात. त्याबरोबर त्यांचे संकेतही नष्ट होतात याचे भान ठेवायला हवे. ज्या समाजात ज्ञानसंवर्धन हे दुसर्या भाषेवर अवलंबून असेल तिथे संकेत निर्माण करावे लागतात. श्री. पर्रीकर यांनी सांगितले की, दक्षिणात्य भागात संस्कृतचा जास्त वापर होतो इतरांना ती कठीण वाटते कारण त्याविषयीचे अज्ञान आहे. संस्कृत ही भारतीय संस्कृतीला उत्तेजन देणारी भाषा आहे; सर्वांना एकत्र बांधणारी भाषा आहे. या भाषेला कुठल्याही राज्यात कुणाची हरकत नाही. महाविद्यालय स्तरावर संस्कृत ही तिसरी भाषा न रहाता दुसरी भाषा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
ऍड. डिसोझा म्हणाले, संस्कृत ही श्रेष्ठ भाषा आहे व त्याबद्दलचा अभिमान आपणास हवा. आपण संस्कृतपासून दूर चाललो आहोत. राज्य व केंद्र सरकारने संस्कृतवर लक्ष केंद्रित करायला हवे.
स्वागतपर भाषणात श्री. धेंपो यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीत संस्कृतचे जे महत्व आहे ते विसरले गेले आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी हे संमेलन आहे. ‘संस्कृत भारती’ने संस्कृत भाषा सुलभ केली आहे. आपल्याला सुजलाम सुफलाम होण्यासाठी संस्कृत भाषा ही अत्यंत आवश्यक आहे. काही शाळांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते पण महाविद्यालयीन स्तरावर संस्कृतचा समावेश व्हायला हवा. संस्कृत भारतीचे कोकणप्रांत मंत्री चिन्मय आमशेकर यांनी प्रास्ताविक केले.
संस्कृतमुळे भारत अग्रणी : डॉ. नंदकुमार
संमेलनाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृत भारतीचे महामंत्री डॉ. नंदकुमार उपस्थित होते त्यांनी सांगितले की, सर्वज्ञान समाविष्ट असलेल्या संस्कृत भाषेमुळे आपला भारत देश अग्रणी आहे. देशातील प्रत्येक राज्याची भाषा वेगवेगळी असली तरी मातृभूमी भारतमातेची भाषा संस्कृत आहे. संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीला प्रकाशमान करते.
संपूर्ण भारतात संस्कृत शिक्षण अनिवार्य करावे
संपूर्ण भारतात पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणात संस्कृत विषय अनिवार्य करावा, अकरावी-बारावी स्तरावर ज्यांनी संस्कृत विषय अनिवार्य म्हणून घेतला असेल त्यांना बी. ए. एम्. एस्. पदवीसाठी प्राधान्यक्रमाने प्रवेश द्यावा, पाठ्यक्रमात संस्कृत विषय असावा व सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठात सर्व स्तरांवर संस्कृत विषय शिकवला जावा व संस्कृतच्या परीक्षा घेतल्या जाव्यात, बी. एड्. एम. एड्. एल्. एल्. एम्. एम्. बीए., एम्. बी. बी. एस., अशा व्यावसायिक अभ्यासक्रमात भारताच्या या प्राचीन वैज्ञानिक तथा दर्शनिय चिंतन धारेचा समावेश व्हावा, ‘युनेस्को’ नुसार विविध स्तरावरील मूल्यधारित अभ्यासक्रमात संस्कृत वाड्.मयाचा समावेश करावा; वेद आणि शास्त्राच्या संरक्षणासाठी ज्या संस्कृत पाठशाळा कार्यरत आहेत त्यांचे संरक्षण व संवर्धन करावे हे ठराव या संमेलनात संमत करण्यात आले.
समारोप सोहळ्याला जगन्नाथ मणेरकर, संध्या कामत, आनंद देसाई (कार्याध्यक्ष) आश्विन नाईक उपस्थित होते. मणेरकर यांनी संस्कृत संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मेघना देवारी यांनी संस्कृत गीत म्हटले. सौ. आशित उमर्ये यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद उमर्ये यांनी आभार मानले.