- पौर्णिमा केरकर
देवकेळीच्या नावामागाचे रहस्य काही सुटता सुटत नाही. देवकेळ मला आवडते ते तिच्या हलक्याशा सुगंधापेक्षासुद्धा तिच्या भडक, तेवढ्याच आकर्षक रंगसंगतीमुळे. रंगांचे किती वैविध्य तिला विधात्याने बहाल केले आहे, अगदी तिच्या सहवासात आल्यानंतर तिला पाहताना भान हरपते.
देवकेळीला ‘देवकेळ’ का म्हणतात हे अजूनही मला उमगलेले नाही. ‘केळ’ शब्द दिसला की प्रथम लक्षात येतात ती म्हणजे खाण्याची केळी. पण येथे तर प्रत्यक्षात फुलांनी लगडलेल्या फुलझाडाला ‘देवकेळ’ असे संबोधले जाते. केळीचे झाड लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्याच ओळखीचे. या झाडाशिवाय तर सण-उत्सव साजरे करणेच अशक्य. उत्सवात पंगती झडतात त्या केळीच्या पानावरच. केळीच्या गब्यापासून भाजी तयार केली जाते. तसेच मखराची विविध प्रकारची आकर्षक आराससुद्धा केली जाते. अशा या बहुगुणी केळीची जागासुद्धा स्वयंपाकघराच्या कडेकुशीला असते. घरच्या गृहिणीला तर ती सदैव दिसायलाच हवी अशी तिची रचना असायची. अजूनही आहे.
केळीच्या बेटाला पाणी खूप हवे असते. असे पाणी म्हणजे स्वयंपाकघरातील भांडी घासण्यासाठीची जागा. त्या जागेपासून जवळ अशा ठिकाणी केळी मुद्दामहून लावल्या जातात, जेणेकरून धुतलेल्या भांड्यांचे, भाजीचे वापरलेले पाणी या बेटाला आपोआपच मिळेल. खरे तर या केळी देवकार्यात जास्त उपयोगी. त्यांचे सर्वच अवयव धार्मिक कार्यात वापरले जातात. तरीही तिला देवकेळ म्हटले जात नाही. उलट जे झाड खूप सुंदर, रंगीबेरंगी फुले देते ती मात्र देवकेळ!
असे हे देवकेळीच्या नावामागाचे रहस्य काही सुटता सुटत नाही. देवकेळ मला आवडते ते तिच्या हलक्याशा सुगंधापेक्षासुद्धा तिच्या भडक, तेवढ्याच आकर्षक रंगसंगतीमुळे. रंगांचे किती वैविध्य तिला विधात्याने बहाल केले आहे, अगदी तिच्या सहवासात आल्यानंतर तिला पाहताना भान हरपते. देवकेळीच्या बाबतीत रंगांचे कॉम्बिनेशन मात्र जबरदस्त. गडद पिवळा, त्यावर लाल पुंजके ठिपके, पूर्ण लाल रंग, भगवा व त्या पार्श्वभूमीवरील हिरवी हळदीची पाने जशी लंबोडकी असतात तशाच आकाराची मोठी पाने. देवकेळी गडद रंगांच्या फुलांनी खूप खुलून दिसतात. पिवळ्या-लाल रंगात त्या अधिक उठावदार भासतात. देवकेळीची फुले अंगणाची शोभा जशी वाढवतात तसेच ती कडेकुशीला लावली जाते. त्यांच्या बिया रुजत घातल्या व त्याठिकाणी पाणथळ जागा असली की त्या तरारून येतात.
मला आठवते कर्नाटकातील ‘मान’ गावातील ती भर दुपार! जुन्या विस्मृतीत गेलेल्या वस्तूंचे फोटो काढायची आमची धडपड चालू होती. मुसळ, वायन, वायनखोड अशा बर्याच वस्तू शोधानंतर सापडल्या, परंतु शोध घेऊनही सापडत नव्हती ती म्हणजे गोरबी. इरली असाही शब्द गोरबीसाठी स्थानिक लोक वापरतात. हुळण, चिखल्या, तळेवाडी, कणकुंभी अशी बरीच गावे पालथी घातली खरी, पण सगळीकडे एकच प्रतिक्रिया- ‘आता खूय आसत इरली? आमी डोकीवर घेतू कापोद.’ आता ही ‘कापोद’ म्हणजे खास पावसापासून रक्षण करण्यासाठी घेतले गेलेले प्लास्टिक. ‘आता इरली तुमका कोणगेर गावची ना’ हेच वाक्य परत परत ऐकून
मनात निराशा दाटून आली. कारण मलाही माहीत होते की आता शेवटी गोरबी मिळाली तर ती याच गावात, अन्यथा ती कोठे नंतर सापडणार नाही. एवढ्यात देहाने कृश झालेली महिला- शेणाने सारवलेल्या स्वच्छ मोकळया लांबलचक अंगणात बसलेली- उठून आमच्यापर्यंत आली व स्वतःजवळ गोरबी असल्याचे सांगू लागली. तिने माझं घर म्हणून ज्या घराकडे बोट दाखवले होते, ते घर तर नुसत्या छप्पर ढासळलेल्या भिंतीच होत्या. उभ्या कोसळलेल्या पावसात तिच्या मातीच्या भिंती असलेले घर कोसळले होते. तिचे अस्तित्व तिथे काहीच शिल्लक राहिले नव्हते. छप्पर पडून चूल तर केव्हाचीच विझून गेलेली. माळा व माळ्यावर ठेवलेली प्रत्येक वस्तू वाचली होती. त्यातच गोरबी होती. धुराने काळवंडून गेलेली. करपटलेली. स्पर्श केला तरी पाने सुटत जाणारी. कोळ्याच्या जाळ्यानी भरलेली. तिला पूर्वीचे दिवस आठवले. डोळ्यात पाणी आले. ‘तुम्हालाच न्या ती’ असे तिने जड अंतःकरणाने सांगितले. पण आम्ही तरी तिला कोठे ठेवणार होतो? आम्हाला फक्त तिचे फोटो हवे होते, ते आता काढायला मिळणार याचाच मोठा आनंद होता. फोटो काढायचा तर मग त्याची साफसफाई करायची म्हणून अंगणात मेरेवर जेव्हा ते ठेवले तेव्हा मात्र ‘माझी देवकेळ आहे, तिथे तिला सांभाळून’ असे उत्कट आर्ततेने त्यांनी म्हटले आणि आम्हा सार्यांचेच लक्ष तिकडे वळले. त्या तशा मोकळ्या अंगणात कडेकुशीला अनंत होता आणि फक्त एकाकी देवकेळ. एकही फूल नसलेली. खरं तर देवकेळीचे मी नानाविध प्रकार बघितले, परंतु त्या प्रत्येक झाडाला पातळ पाकळ्याची रंगीत फुले भरभरून फुललेली. तिथे तिच्या घरासमोर- लांबलचक अंगण होते, जे शेणाने सरावलेले- पारंपरिक झाडापानांचा उपयोग करून मांडव घातलेला. चौकोनी आखीव-रेखीव मेर धरलेली आणि त्यातच ओळीत लावलेल्या देवकेळी… सर्वांचा रंग एकच लालभडक! खूप टवटवीत फुले. त्या तशा भरदुपारी सूर्य माथ्यावर असतानाही त्यांचे रसरशीतपण टिकून होते. मुलाबाळांच्या कलकलाटाने अंगण भरलेले. आपल्या गावात आणि ही कोण माणसे नवीन आली आहेत? याच्या शोधासाठी त्यांचा कानोसा घेणे चालू होते. पण या दुसर्या महिलेच्या अंगणात मात्र देवकेळ फुलली नव्हती. घर उध्वस्त झालेले. तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच तिच्या भाळी वैधव्य आलेले. पदरी मूलबाळ नाही. अंगण सुनसान. त्यात अनंताच्या झाडापेक्षा तिला देवकेळ अधिक जवळची वाटत होती. देवकेळीला ही अशी उदासीनता लगडलेली मी पहिल्यांदाच अनुभवली.
खूप कोवळं हळवं झाड देवकेळीचं. मुळापासून शेंड्यापर्यंत सहज मोडणारं. फुलं तर मालिनींच्या केसांची जशी शोभा वाढवतात तशीच ती देवाच्या चरणी वाहिली जातात. तसं या देवकेळीला कोठेही रुजता येतं, वाढता येतं. तिच्या बिया तर काळ्या रंगाच्या वाटाण्यासारख्या दिसणार्या. फुलाचा खालचा भाग जरासा गोल टूपटूपित. अंगणाला जशी ती सजवते, तशीच ती कोठेही पाणथळ जागेत रुजते. बालपणात मी तिला आमच्या अंगणात लावलेली बघितली होती. शेंदुरी रंग, लहान फुले, एक पाकळी मोठी, तिथेच बाजूला सूईप्रमाणे वर आलेली टोकदार पाकळी. इतर ठिकाणी येता-जाता अनेकदा देवकेळीच्या झाडांची बेटेच अनुभवली. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी जेव्हा मोठमोठ्या बागा विकसित केल्या जातात तेव्हा तर देवकेळीची ओळीने लावलेली फुलझाडे या बागांच्या सुबकतेत अधिकच भर टाकतात. लहानपणी वहीच्या पानात या फुलाची पाकळी ठेवून त्यावर दाब दिला असता त्याच्या रंगासकट तो आकार वहीत उमटायचा. कधीकधी तर दोर घेऊन त्या दोराला रंग लावून देवकेळीच्या फुलाच्या आकारात त्याला वहीत ठेवून त्यावर पेपर दाबत जोरात आतील दोरा ओढला जायचा तेव्हा जो आकार यायचा तोसुद्धा या फुलांच्या पाकळीचाच असायचा. कुठलाच नखरा नसलेले हे सदासतेज फूल आकर्षक रंगसंगतीमुळे मनाला खुणावणारे. जीवाला ओढ लावणारे…