- मीना समुद्र
मृदुमुलायम अशी पिसं गोळा करावीत तसे शब्द आपण हळूहळू गोळा करत असतो. ते बघण्यात, त्यांना निरखण्यात, त्यांचे गुण पारखण्यात आपण हळूहळू तरबेज होत जातो. त्यासाठी कान, मन, दृष्टी जागी हवी. ते आपल्याला अनाहूत असा आनंद देतात.
ज्यांची पुस्तकं केव्हाही घेऊन वाचावीत अशा लेखकांपैकी एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. कोणताही अभिनिवेष नसलेली त्यांची साधी-सोपी-सरळ पण अनुभवसंपन्न भाषा आणि ‘जे जे आपणासी ठावे ते ते लोकां सांगावे’ ही अशी एक आंतरिक ऊर्मी त्यांच्या शब्दातून जाणवणारी. लोकविलक्षण अनुभव आणि गोष्टीवेल्हाळपण यामुळे आपण पुस्तकाशी समरस होत जातो. एका अनोख्या विश्वाचं दालन आपल्यासमोर खुलं होतं. त्यांचं असंच एक पुस्तक परवा पुन्हा एकदा वाचलं. त्याचं नाव ‘स र वा.’ मुखपृष्ठावरलं नाव वाचून प्रश्न पडलाच मनाला- हे ‘स र वा’ म्हणजे काय? तर सुरुवातीलाच त्याचा उलगडा त्यांनी केला आहे तो असा-
‘‘हा शब्द शहरी लोकांच्या माहितीचा नाही. कोरडवाहू जमिनीत भुईमूग, हरभरा, गहू असलं पीक निघाल्यावर काही शेंगा जमिनीत राहतात. काही लोंब्या, काही घाटे राहतात. ते वेचणं म्हणजे ‘सरवा वेचणं.’ ज्यांना धान्याचं मोल फार कळलेलं असतं ते ‘सरवा’ वेचतात…
लेखकापाशीही नाटक, कादंबरी, ललितलेख, लघुकथा वगैरे वाचून झाल्यावर असा ‘सरवा’ पडलेला असतो. तो वेचण्याची चिकाटी दाखवावी असं लेखकाला वाटतं. जे काही गोळा झालं ते म्हणजे पसा-कुडता. त्यात दाणे निघतील, खडे मातीही निघेल. ‘सरव्या’त हेही येतंच.’’ तेव्हा ‘स र वा’ म्हणजे उठलंसुरलं पण महत्त्वाचं, सांगण्यासारखं असं लेखनातलं राहिलंसाहिलं सत्त्व असं म्हणायला हरकत नाही. पुस्तकात स्वतःचे आणि त्यांच्या आवडत्या लेखकांचे- जॉर्ज ऑखेलचे- काही लेख समाविष्ट आहेत.
आपल्याला परिचित नसलेल्या नवीन शब्दात ते समजावून घेण्यात खूप गंमत असते. त्यांचा अर्थ जाणून घेण्याची ओढ लागते आणि ते वापरात आणण्याची आवडही निर्माण होते. श्रीमती शांताबाई शेळके यांनीही एके ठिकाणी लिहिलंय- ‘‘कुणाला रंगरेषांचे, कुणाला सुरांचे, कुणाला स्पर्शाचे- पोताचे आकर्षण असते. मला शब्दांनी अशी भुरळ घातली. शब्दांशी खेळून पाहावे, जमेल तशी त्यांची जुळणी करावी, त्यातून उमटणारे नादलयीचे आकार पाहावेत अशी हौस निर्माण झाली. आंतरिक ओढ वाढू लागली. शब्दांशी खेळताना भूकही भागू लागली.’’ शब्दांचे देणे असेच असते. मनाची भूक भागविणारे! सुंदर चमकणारे दगड गोळा करावेत, मृदुमुलायम अशी पिसं गोळा करावीत तसे शब्द आपण हळूहळू गोळा करत असतो. ते बघण्यात, त्यांना निरखण्यात, त्यांचे गुण पारखण्यात आपण हळूहळू तरबेज होत जातो. त्यासाठी कान, मन, दृष्टी जागी हवी. ते आपल्याला अनाहूत असा आनंद देतात. आपली समाजाकडे पाहण्याची दृष्टी विशाल करतात.
परवा शेजारणीशी बोलताना ‘आज ‘आवरे’ भिजत घातले आहेत, आता परवा भाजीची काळजी नाही’ असे ती म्हणाली तेव्हा हे ‘आवरे’ काय प्रकरण म्हणून विचारलं तर ती पावट्याची उसळ निघाली. अगंबाई! खरंच की एकेक दाणा पाण्यातून काढून सोलून मोकळा करत बसायचं म्हणजे पसाराच. मग कुणीतरी म्हणणारच, ‘आवर ए!’ त्याचंच ‘आवरे’ झालं असावं का? असा प्रश्न मनात उभा राहिलेला. सांगितलं तेव्हा शेजारीण पसंतीचं हसू हसली. तिनेच बोलता बोलता एकदा सांगितलं की पूर्वी वीज नसायची तेव्हा दिवे घासपूस करण्याचं काम माझंच. त्यासंदर्भात दिव्यासाठी तिने ‘बंगली’ हा शब्द वापरला. मी पुन्हा एकदा विचारून तो दिव्यासाठीच आहे याची खात्री करून घेतली. आपल्याला ‘टुमदार बंगली’ म्हणजे छोटा बंगला हे माहीत असतं. पण दिव्याला ‘बंगली’ का म्हणत असावेत याचा विचार करतेय. हल्ली प्लॅस्टिकचा षट्कोनी आकार पितळेच्या तळात बसविलेला आणि वर पितळी झाकणासारखा आकार आणि त्यावर एक पितळी पोकळ गोळा असतो. त्याला निरांजन आत ठेवण्यासाठी एक छोटं दार असतं. अशा दिवाघराला ‘बंगली’ म्हटलेलं शोभेल असं वाटलं.
घरात नुकतीच व्यालेली एक मांजरी दिवसभर पिल्लांना सोडून कुठे भटकत असते कोण जाणे! घरी आली की खोक्याची वरची बाजू उघडून पिल्लांजवळ जाण्यासाठी धडपड करते. तिचं नाव ‘भटकभवानी’ ठेवलंय. हा आईआजीच्या तोंडून पूर्वीपासून ऐकलेला शब्द. एखादी मुलगी हिंडून-फिरून घरी आली की तिला ‘भटकभवानी’ म्हणत. भटकणारी म्हणून ‘भटक’ ठीक आहे, पण ती भवानी का? भवानी तर देवीचं नाव आहे. आणि या संपूर्ण शब्दात तर हेटाळणीचा सूर दिसतो. तर भवानी म्हणजे जरा जादा, आगाऊ असाही अर्थ कळला. याचा देवीशी काही संबंध नाही म्हटल्यावर हायसं झालं. याच्यासारखाच दुसरा एक शब्द ‘चटकचांदणी.’ चांदणी तर शांत तेजाने चमकत असते. मग एखाद्या सुंदर मुलीला ‘चटकचांदणी’ का बरं म्हणतात आणि तेही थोड्या हेटाळणीनं. थोडे भडक कपडे, डोळ्यात चटकन भरेल किंवा डोळ्यावर येईल असा साजशृंगार यामुळे ती ‘चटकचांदणी’ ठरते. थोडा ठसका, नखरा, थोडे तेज, चमकदारपणा या सगळ्यांचा मिलाफ तिच्यात असतो. यात थोडासा तरी कौतुकाचा भाव असतो. पण कसेतरी पिंजारलेले केस घेऊन वापरत असणारी मुलगी ‘झिंज्यापकडू’ ठरते. काम करताना कुणी चवड्यावर, पायांवर बसलं असेल तर त्याला किंवा तिला असं ‘उट्टंटाळी’ नको बसू, नीट बूड टेकून बस’ असं सांगितलं जातं. याचा उघड अर्थ नसला तरी अधांतरी, अवघडून बसणे असा कळतो. एखाद्या मुली वा मुलाबद्दल तुच्छतेने किंवा दुराव्याने बोलताना ‘कार्टी’ किंवा ‘कार्टा’ असा अपशब्द सर्रास वापरला जातो. ‘कारीट’ या कडू फळाचा कडवटपणा घेऊन हा शब्द आला असावा असे वाटते. तसाच एखाद्याचा रंग काळा असेल तर त्याला ‘काळुंदरा’, ‘काळुंदरी’ म्हणजे उंदरासारखा काळा किंवा काळी असा शब्दही तुच्छतादर्शकच आहे.
छोट्या गोल बोरांना ‘चन्यामन्या’ ही नावे शोभून दिसतात आणि काळ्या करवंदाला ‘काळी काळी मैना, डोंगरची मैना’ हे नावही यथार्थ वाटतं. चेहर्याला पावडर कमी-जास्त लावली असेल तर तो ‘खारा दाणा’ का हे आपल्याला कळते. पण मुलगी पाहायला आलेला मुलगा इतर बाबतीत उजवा पण ‘डेंटिस्ट’ आहे असं म्हटल्यावर तो ‘पण’ का हे कळल्यावर कुणालाही हसू येईल. ‘डेंटिस्ट’ म्हणजे दाताचा डॉक्टर नसून त्याचे दात पुढे म्हणून तो डेंटिस्ट म्हणे! मिर्याएवढा छोटा पण तीक्ष्ण तिखट बुद्धी म्हणून एखादा छोटा म्हणजे ‘मिरमुटला.’ गोल गुबगुबीत चेहर्यावर थोडं चिमटल्यासारखं नाक असणारा गोड गळ्याचा प्रथमेश लघाटे याला वैशाली सामंतने ‘मोदक’ नाव ठेवले होते ते अगदी सार्थ. आता पावसाळा आला की लालकेशरी किडे दिसू लागतील. त्यांना ‘इंद्रगोप’ का म्हणतात? आता पसरलीय तशी ‘रोगराई’ पसरली असं का म्हणतात? राई म्हणजे फुलबाग, वनराई. ती रोगाशी का जोडली गेली असेल? शोधायला हवे.
वि. द. घाटे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘माणूस निसर्गनिष्ठ जीवन जगत असताना मन-शरीरावर होणार्या आघातांनी स्वाभाविकपणे शब्द जन्माला येतात, घडले जातात. निसर्ग व मानवी समाजाशी मुकाबले देताना त्यांची गरज निर्माण होते आणि ती सहजस्वभाविकपणे शब्द आपल्याला देते.’ आणि हे शब्द आपल्याला जगताना आधारभूत होतात.