दूरचित्रवाणीवर प्रकटणार जुन्या घरांच्या भिंतींआडचा इतिहास

0
127
आर्यन खेडेकर

गतकाळाच्या स्मृती जागवीत उभ्या असलेल्या गोव्यातील पुरातन घरांच्या भिंतींआड दडलेला इतिहास जिवंत करणारी एक मालिका लवकरच स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवर अवतरणार असून या पुरातन वास्तूंचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्या वास्तूंशी निगडित कहाण्या प्रथमच गोमंतकीयांपुढे येणार आहेत.

पणजीतील म्हामाई कामत यांचे घर, कालापूरचे धेंपो घराण्याचे घर, आरोबा – पेडणे येथील देसाईवाडा, मंगेशी येथील भावे यांचे घर, चांदर येथील मिनेझीस ब्रागांझा आदींची घरे अशा अनेक घरांच्या व त्यांच्याशी निगडित घराण्यांच्या या कहाण्या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न आर्यन खेडेकर हे करणार आहेत. ‘काणी एका घराची’ असे या मालिकेचे शीर्षक असून त्यातून गोव्यातील अशा निवडक वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंचे दर्शन घडेल.
एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होताना या पुरातन वास्तूंनाही अवकळा येऊ लागली असली, तरी अजूनही सण समारंभाच्या निमित्ताने जुन्या घराची ओढ त्या घराण्यांच्या वारसांना स्वस्थ बसू देत नाही. अनेक कुटुंबांनी आपली जुनी घरे अत्यंत परिश्रमपूर्वक उत्तम स्थितीत सांभाळली आहेत. गोव्यात येणार्‍या पर्यटकांचेही लक्ष या वास्तू वेधून घेत असतात.
गोव्याची ही पारंपरिक घरे, त्यातील बल्कांव, राजांगणे, तुलसीवृंदावने, रहाटाच्या विहिरी, देखणी देवघरे या सगळ्यांचे दर्शन घडवीत असताना कुटुंबप्रमुखाच्या मुखातूनच त्या घराची कहाणी सांगण्याचा प्रयत्न खेडेकर आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. सप्टेंबरच्या उत्तरार्धात ही मालिका दूरचित्रवाणीवर येणार असून तिची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन खेडेकर यांचे आहे. यापूर्वी ‘चल, पासयेक या’ या मालिकेची निर्मिती खेडेकर यांनी केली होती.