दूध, भाजीपाल्याचा तुटवडा

0
78

>> गोवा डेअरीचे प्रयत्न अपुरे

कोल्हापूर, बेळगाव या भागातील पूरस्थितीमुळे राज्यात दुधाचा पुरवठा होऊ न शकल्याने दुधाचा तुटवडा काल निर्माण झाला. गोवा डेअरीने स्थानिक पातळीवर दुध उत्पादक शेतकर्‍यांकडील चाळीस ते पन्नास हजार लीटर दूध गोळा करून ग्राहकांना उपलब्ध करून दिले. तथापि, गोवा डेअरीचा दुधपुरवठा अपुरा पडल्याने अनेकांना दूध मिळू शकले नाही.

राज्यात शेजारील कोल्हापूर, बेळगाव या भागातून भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा होतो. राज्यात दरदिवशी साधारण अडीच लाख लीटर दुधाची गरज भासते. गोवा डेअरीकडून साधारण साठ ते सत्तर हजार लीटर दुधाचा पुरवठा केला जातो. गोवा डेअरीबरोबर परराज्यातील कोल्हापूर, बेळगाव व इतर भागातूल दूध संघाकडून अनेक ब्रॅण्डच्या माध्यमातून दुधाचा पुरवठा केला जातो. कोल्हापूर, बेळगाव भागातील पूरस्थितीमुळे परराज्यातून गोव्याला दूध आणि भाजीचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यात भाजीपाला आणि दुधाची टंचाई निर्माण झाली. बाजारातील भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसामुळे चोर्ला घाटातील दरड कोसळल्याने घाटातील महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने कोल्हापूर, बेळगाव भागातील वाहनांना गोव्यात येण्यास अडचण निर्माण झाली आहे.