पणजी (न. प्र.)
पशुसंवर्धन खात्याने केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात गेल्या तीन महिन्यांत दूध उत्पादनात १० हजार लिटरनी वाढ झाली असल्याची माहिती काल पशु संवर्धन खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी अनौपचारिकरित्या बोलताना दिली.
तीन महिन्यांपूर्वी राज्यातील दूध उत्पादन एक लाख साठ हजार लिटर एवढे होते. आता ते वाढून एक लाख सत्तर हजार एवढे झाले आहे. गोव्याची दुधाची मागणी ही तीन लाख साठ हजार लिटर एवढी आहे. त्यामुळे जवळ जवळ अडीच लाख लिटर एवढे दूध हे परराज्यातून आणावे लागत असल्याचे गुदिन्हो म्हणाले.
परराज्यातील दूध भेसळयुक्त
परराज्यातील दुधात खूप भेसळ असते. त्यामुळे परराज्यातून दूध आयात करण्यापेक्षा राज्यात दूध उत्पादनात वाढ करण्याची गरज असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी दूध व्यवसायात यावे यासाठी खाते प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या प्रयत्नांना आता फळ येऊ लागलेले असून वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले तरूणही आता दुग्ध व्यवसायात उतरू लागले असल्याचे गुदिन्हो म्हणाले. जास्तीत जास्त गोमंतकीय युवकांना दुग्ध व्यवसायात प्रवेश करावा यासाठी त्यांना विविध प्रकारे लाभ व फायदे मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.