दूधाची ऍलर्जी का स्तन्यदोष?

0
385
  • डॉ. मनाली म. पवार

आयुर्वेदाने स्तन्यपानावर इतका भर दिला आहे की काही कारणाने स्वतः आई बाळाला स्तन्य पाजू शकली नाही तरी तिच्याच वयाच्या, तिच्यासारख्या स्वभावाच्या निरोगी स्त्रीची ‘धात्री’ म्हणून व्यवस्था करायला सांगितलेली आहे. स्तन्यपानाला एवढे महत्त्व आहे.

सध्या स्त्रिया फक्त घरांपुरती मर्यादित नसून अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या आहेत व मोठमोठ्या जबाबदार्‍या उचलत आहेत. त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक ओढाताण होऊ शकते. शिवाय स्वतःकडे पुरेसं लक्ष द्यायला वेळही नसतो. यामुळे आचरण आणि आहारात योग्य काळजी घेतली जात नाही. परिणामतः स्तन्याची उत्पत्ती पुरेशा प्रमाणात होत नाही.

बाळाला आईच्या दुधाची ऍलर्जी आहे म्हणून स्तन्यपान बंद केले… असे सांगणारे काही पेशंट्‌स आढळले. ‘बाळाला आईच्या दुधाची ऍलर्जी’ ऐकूनच विचित्र वाटते ना? अशावेळी बाळाला दूध पाजायला जिवाचे रान करून गडउतार झालेली हिरकणी आठवते आणि आजच्या या स्थितीची कीव कराविशी वाटते. ‘स्तन्यपानाची ऍलर्जी’ म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून फक्त ‘स्तन्यदोष’ असतात, जे योग्य आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्याने दूर करता येतात व त्यानंतर नेहमीसारखे स्तन्यपान करता येते. त्यासाठी बाळाचे स्तन्यपान पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते.

बाळाला पहिले ६ महिने शक्यतो फक्त स्तन्यपानच द्यावे. ६ महिन्यानंतर बाहेरचे अन्न सुरू केले तरी दीड ते दोन वर्षे स्तन्यपान देत राहावे. आयुर्वेदाने स्तन्यपानावर इतका भर दिला आहे की काही कारणाने स्वतः आई बाळाला स्तन्य पाजू शकली नाही तरी तिच्याच वयाच्या, तिच्यासारख्या स्वभावाच्या निरोगी स्त्रीची ‘धात्री’ म्हणून व्यवस्था करायला सांगितलेली आहे. स्तन्यपानाला एवढे महत्त्व आहे. अगदीच नाईलाज असला आणि आई किंवा धात्री दोघींचेही दूध मिळू शकले नाही तरच गाईचे दूध द्यायला सांगितले आहे. बाळाच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आणि आईच्या प्रकृतीच्या दृष्टीने ‘स्तन्यपान’ सर्वोत्तम असते. त्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले ‘गर्भीणी परिचर्येचे’ पालन केल्यास कुठलाच दोष उद्भवत नाही. गरोदरपणापासून शतावरी कल्पासारख्या बहु-उपयोगी रसायनाची योजना करणे आवश्यक आहे. बाळंतपणानंतरही शतावरी कल्प घालून दूध, अहळिवाची खीर, लाडू, तूप वगैरे गोष्टी सेवन करत राहिल्यास स्तन्योत्पत्तीस मदत होते.

स्तन्यपान करणारे बालक संपूर्णतः मातेचा आहार व आचरण यावरच अवलंबून असते. मातेचे खाणे, पिणे, वागणे, बोलणे आदी सार्‍यांचा परिणाम बालकावर होत असतो. म्हणूनच बालकाचे आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टिने मातेने स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी.

स्तन्यपान हा बाळाचा पूर्णाहार असतो म्हणूनच स्तन्यात कोणत्याही प्रकारची विकृती नसणे फार गरजेचे असते. आयुर्वेदात शुद्ध स्तन्याची लक्षणे खालीलप्रमाणे दिलेली आहेत.
स्तन्यसम्पत्तु प्रकृतिवर्णगन्धरसस्पर्शम्
उदकपात्रे च दुह्यमानमुदकं व्येति
प्रकृतिभूतत्वात् तत् पुष्टिकरमारोग्यकरं चेति|

– स्तन्य स्वच्छ, पातळ व शीतल असावे.
– त्याचा रंग शंखासारखा पांढरा आणि स्निग्ध असावा.
– चव गोड असावी.
– काचेच्या स्वच्छ पात्रात स्वच्छ पाणी घ्यावे आणि त्यात स्तन्याचे तीन-चार थेंब टाकावेत. जर स्तन्य पाण्यात सहज एकजीव झाले तर ते शुद्ध समजावे.
असे स्तन्य बाळाला आरोग्यकर आणि पोषक असते. आजकाल बहुतेक स्त्रियांमध्ये स्तन्य कमी तयार होण्याची तक्रार सर्वत्र आढळते. याची अनेक कारणे आहेत.
क्रोधशोकावात्सल्यादिभिश्‍च स्त्रियाः स्तन्यनाशो भवति|
क्रोध, अतिशोक, वात्सल्याचा अभाव, उपवास, अतिव्यायाम, चिंता वगैरे कारणांमुळे स्तन्य कमी प्रमाणात उत्पन्न होते.
बहुतेक स्त्रिया नोकरी-धंदा करणार्‍या असतात. सध्या स्त्रिया फक्त घरांपुरती मर्यादित नसून अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या आहेत व मोठमोठ्या जबाबदार्‍या उचलत आहेत. त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक ओढाताण होऊ शकते. शिवाय स्वतःकडे पुरेसं लक्ष द्यायला वेळही नसतो. यामुळे आचरण आणि आहारात योग्य काळजी घेतली जात नाही. परिणामतः स्तन्याची उत्पत्ती पुरेशा प्रमाणात होत नाही.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे स्त्रीने घेतलेल्या आहाराचा व मानसिक ताणाचाही परिणाम रसधातुवर होत असतो. रसधातू व स्तन्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे रसधातुमध्ये दुष्टी झाली की त्याचा परिणाम स्तन्यावर होतो. म्हणून शुद्ध स्तन्याच्या उत्पत्तीसाठी बाळंतिणीने आहार- आचरणाबरोबर कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येणार नाही याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. स्तन्य कमी येत आहे असे जाणवल्यास खालील उपाय सुरू करावे.
– शतावरी कल्प घालून दूध प्यावे.
– सकाळ-संध्याकाळ दुधात शिजवून अहळिवाची खीर खावी किंवा अहळिवाचे लाडू खावेत.
– शिंगाड्याच्या पीठाचा गूळ घालून केलेला शिरा खावा.
– दुपारच्या जेवणात तांदळाची, खसखशीची, रव्याची केशर आणि साखर किंवा गूळ घालून केलेली खीर खावी.
– घरचे ताजे लोणी, खडीसाखर, साजूक तूप यांचा दुपारच्या आहारात समावेश करावा.

– अर्धा चमचा शतावरी चूर्ण व अर्धा चमचा विदारी चूर्ण दुधात घालून प्यावे.
या उपायांबरोबर वैद्याच्या सल्ल्याने स्तन्यवृद्धीकर चिकित्सा घ्यावी.
बाळंतपणानंतर स्तनांचा आकार बेडौल होऊ नये, यासाठी स्तनांना तेलाने गोलाकार मालीश करावी. या उपायाने स्तन्यवृद्धी होण्यासही मदत होते.
स्तन्य जसे कमी होते तसे बिघडूही शकते. आयुर्वेद शास्त्रामध्ये याला स्तन्यदुष्टी म्हणून सांगितली आहे. बिघडलेल्या स्तन्यपानामुळे बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

मातेला अजीर्ण झाल्याने, चुकीचे किंवा फार कडू, खारट वा शिळे अन्न खाल्ल्याने फास्ट फूड, जंक फूडचे सेवन केल्याने रूक्ष व बेकरीच्या पदार्थांचा अतियोग, पनीर-दही यासारखे पदार्थ खाल्ल्याने, दुपारी झोपल्याने, खूप जागरण झाल्याने, अति प्रमाणात राग, शोक किंवा ताण आल्याने स्तन्याचा रंग, चव, गंध वगैरे बिघडतात.

* वात दोषांमुळे स्तन्य बिघडल्यास ….
– स्तन्य किंचित काळसर होते.
– त्याची चव तुरट- कडवट होते
– फेस येतो.
असे दूध प्यायल्यास बाळाला अपचन, गॅसेस, मलावरोधाचा त्रास होतो आणि त्याचे वजन नीट वाढत नाही.
स्तन्यदुष्टी वातदोषामुळे झालेली असल्यास –
– दशमूलारिष्ट आणि कुमारी आसव कोमट पाण्यात मिसळून घ्यावे. तसेच दशमूलघृत सेवन करावे.
– स्तनांवर दशमूल, हिरडा आणि ज्येष्ठमध यांचा लेप करावा. त्यामुळे स्तन्यशुद्धी होऊ शकते.
बाळंतिणीने हिंग आणि सैंधव तूपासह घेतल्यास वातदूषित स्तन्यामुळे बाळाचे पोट दुखणे, पोट फुगणे वगैरे त्रास कमी होतात. * पित्त दोषांमुळे स्तन्य बिघडल्यास….
– स्तन्य किंचित पिवळसर रंगाचे होते. त्याची चव आंबट, कडू होते. स्पर्श गरम जाणवतो.
पित्तदूषित स्तन्यपानामुळे बाळाला अधिक घाम येतो, जुलाब होतात आणि अंग गरम जाणवते.
स्तन्यदुष्टी पित्तदोषामुळे झालेली असल्यास….
– पंचतिक्त घृत सेवन करावे.
– स्तनांवर चंदन, वाळा, अनंतमूळ अशा पित्तशामक व शीतल द्रव्यांचा लेप करावा.
– वैद्याच्या सल्ल्याने प्रवाळपंचामृत, कामदुधा, भूनिम्बादी काढा वगैरे औषधे घ्यावीत.

* कफदोषांमुळे स्तन्य बिघडल्यास….
– स्तन्य किंचित खारट, चिकट आणि जड होते. असे स्तन्य पाण्यात टाकल्यास तळाला जाऊन साठते. कफदोषामुळे बिघडलेले स्तन्य बाळाला पाजल्यास बाळाला अतिप्रमाणात लाळ सुटते, चेहर्‍यावर सूज येते, अंगाला खाज सुटते व वारंवार सर्दी, खोकला वगैरे त्रास होतो.

– स्तन्यदुष्टी कफदोषामुळे झालेली असल्यास सुंठीचे चूर्ण मध आणि तूपासह सेवन करावे.

– स्तनांवर कडिचिराईत, गुळवेल, त्रिफळा अशा द्रव्यांचा लेप लावावा. वैद्याच्या सल्ल्याने पिप्पलादी चूर्ण, पंचकोल चूर्ण वगैरे औषधे घ्यावीत.
स्तन्य दूषित झाले असता किंवा त्याचे प्रमाण कमी झाले असता लवकरात लवकर योग्य ते उपचार करावेत. शक्यतो अंगावर पाजणे बंद करू नये.
मुळात स्तन्यदुष्टी होऊच नये यासाठी अगोदरपासूनच प्रयत्न करावेत.

– बाळंतिणीच्या आहारात पुरेशा प्रमाणात शुद्ध, शक्यतो घर्‍ी केलेल्या हळदीचा समावेश करावा. ओल्या हळदीचे लोणचे आहारात असावे. भाजी-आमटीमध्येही हळद पुरेशा प्रमाणात वापरावी.

– हिंग आहारात वापरल्याने स्तन्य शुद्ध राहण्यास मदत होते.

– भाजी-आमटीच्या फोडणीत मोड आलेल्या मेथ्या टाकल्यानेही स्तन्य शुद्ध राहण्यास मदत मिळते. तसेच स्तन्योत्पत्तीसाठीही मदत मिळते.

– जिरेसुद्धा स्तन्यशुद्धीकरता उत्तम द्रव्य आहे. यासाठी भाज्यांना जिर्‍याची फोडणी देता येईल. ताकामध्ये जिरेपूड टाकावी. भाज्यांमध्येही जिरेपूड टाकावी.

– जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून ओवा, बाळंतशोप, तीळ वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाण्यानेही स्तन्य शुद्ध रहायला मदत मिळते.

– कुळीथाचे सूप सेवन केल्यानेही स्तन्य शुद्ध राहते. त्यासाठी कुळीथाच्या सूपाला जिर्‍याची फोडणी देऊन, आमसूल टाकून सेवन करावे.
याप्रकारे काळजी घेतल्यास स्तन्यदुष्टी होणार नाही.
तरीही काही कारणास्तव स्तन्यदुष्टी झाली, दूध खूपच कमी झाले किंवा आईला दूध पाजणे अगदीच शक्य नसल्यास स्तन्याला पर्याय म्हणून गाईचे ताजे दूध वापरता येते. बाळाला गाईचे दूध देण्यापूर्वी ते दूध विशिष्ट प्रकारे संस्कारित करावे. पाऊण कप दुधात पाऊण कप पाणी घालावे. त्यात वावडिंगाचे १०-१५ दाणे किंवा चमचाभर लघुपंचमुळाची द्रव्ये टाकून मंड आचेवर एक कप मिश्रण उरेपर्यंत उकळावे व गाळून घेऊन योग्य तापमानाचे झाल्यावर बाळाला पाजावे.
वावडिंग किंवा लघुपंचमुळाच्या द्रव्यांबरोबर दूध उकळल्याने वरचे दूध शक्य तेवढे हलके बनते. गाईच्या दुधापेक्षा आईचेच दूध पचायला हलके असते.
आईने घेतलेला आहार, औषधे यातील पोषकांस स्तन्यामध्ये येत असतो म्हणून वरचे दूध घालायला सुरू केल्यानंतर त्या दुधामध्ये अश्‍वगंधा, शतावरीसारखी पोषक द्रव्ये दुधात घालावी व ते दूध स्वच्छ वस्त्रातून गाळून घेऊन मगच बाळाला पाजावे. बाळाला वरचे दूध पाजायचे झाले तर सर्व प्रक्रियेमध्ये स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. नाहीतर बाळाला लगेच जुलाब, सर्दी, खोकला, ताप, पोटात दुखणे वगैरे त्रास होऊ शकतात.
बाळाला डबाबंद दुधाच्या पावडरपासून तयार केलेलं दूध देऊ नये. ते पचायला खूप अवघड असतं.

– तसेच बाळाला बाटलीने दूध पाजू नये. वाटी-चमच्यानेच दूध पाजावे. शक्य असल्यास चांदीची वाटी व चांदीच्याच चमच्याचा वापर करावा.

– बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाला शक्यतो सहा महिने स्तन्यपानच करावे. कारण आईच्या दूधाला तोड नाही.
बाळंतिणीच्या आहार- आचरणावरच स्तन्य निर्मिती अवलंबून असल्याने प्रसूती परिचर्येवर पूर्ण भर द्यावा.
बाळंतिणीच्या आहारात ‘हे’ पदार्थ असलेच पाहिजेत…..
१. कुळीथ सूप ः कुळीथ हे एक प्रकारचे कडधान्य आहे जे पचायला हलके, वात व कफदोष शमवणारे असते. गर्भाशय आकुंचन करण्याचा विशेष गुणधर्म असतो.
२. बाळंतिणीची सुपारी ः ओवा, तीळ, बडीशोप, बाळंतशोप, धन्याची डाळ, जेष्ठमध चूर्ण, लवंग चूर्ण, काळे मीठ, खोबर्‍याचा किस, लिंबू ही घटकद्रव्ये वापरून सुपारी तयारी करावी. ओवा पचनाला मदत करतो. तीळ गर्भाशयातील वात नाहीसा करून गर्भाशय शुद्ध करतो. बाळंतशोप स्तन्यवर्धक. या पद्धतीने बनवलेली सुपारी रोज जेवणानंतर नीट चावून खावी.
३. मेथीचे लाडू ः मेथ्या गर्भाशयाची शुद्धी करून त्याला प्राकृत स्थितीत आणण्यासाठी विशेष उपयुक्त. याशिवाय स्तन्यशुद्धीसाठी तसेच बाळंतिणीचे वजन कमी करण्यासाठीही मदत करतात.