पर्वरी येथील मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत दूधसागर धबधब्यावरील पर्यटन आवश्यक सुरक्षा उपायांची पूर्तता केल्यानंतर येत्या सोमवार 21 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना काल ही माहिती दिली. या बैठकीला गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दूधसागर धबधबा सर्किटमधील रस्त्याच्या दुरवस्थेचा आढावा घेण्यात आला. सतत पडणारा पाऊस आणि कुळे येथील नदीतील पाण्याचा प्रवाह याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या बैठकीत सखोल चर्चेनंतर आवश्यक सुरक्षा उपायांची पूर्तता केल्यानंतर सोमवारपासून पर्यटनाला सुरुवात करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली, असे राणे यांनी सांगितले.