दूधसागर : गोव्याचा मानदंड

0
397

– दादू मांद्रेकर

सूर्यापासून कधीकाळी सुटलेल्या तप्तलाल वस्तुमानाचे आज दिसणारे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, शनी, गुरु, युरेनस आणि नेपच्यून हे आठ ग्रह म्हणजे भाग आहेत. परस्पर गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या वस्तुमानाला प्रचंड गती लाभल्याने प्रत्येकाला लाभलेले गोलीय स्वरूप आणि त्याचवेळी ते वस्तुमान थंड होत जाताना प्रत्येक घटकाचा आकुंचन होत गेलेला पृष्ठभाग हा जर डोंगर-दर्‍यांनी व्यापला नसता तर पृथ्वी म्हणजे चेंडूच्या पृष्ठभागासारखा तुकतुकीत एक पृष्ठभाग असता. त्याच्यावर त्यानंतरच्या प्रक्रियेने प्रचंड प्रमाणावर बाष्प होऊन पडलेला पहिला पाऊस, पडलाही नसता! – आणि पडला असता तर ते पाणी धरून ठेवण्यासाठी पृथ्वीचा पृष्ठभाग पात्र झाले असते का? हा संशोधनाचा विषय ठरावा! सतत होणारे बाष्प आणि त्यामुळे पृथ्वीवर ठिकठिकाणी पडणारा पाऊस काही ठिकाणी अतिशीत वातावरणामुळे तयार होणारे आणि कायम गोठून राहणारे हिम व त्यामुळेच पृथ्वीच्या वातावरणाचे संतुलित राहिलेले तापमान, हे होण्यासाठी सूर्यापासून तिचे असलेले योग्य अंतर हे सर्व पृथ्वीवरील साठलेल्या पाण्यात अमिबासारखा पहिला पेशीय जीव तयार होण्यास मदत झाली आहे. ऍमिनो ऍसीड नावाचे जीवाचे पोषणमूल्य तयार करणारा घटक ह्या साचलेल्या पाण्यात तयार झाला नसता तर कदाचित पृथ्वीवर पाण्याशिवाय चल (हालचाल करणारी जीवसृष्टी) आणि अचल (अजिबात हालचाल न करणारी वनस्पती – सृष्टी) जीवसृष्टी निर्माणच झाली नसती. पिकून सुकून जाणार्‍या फळाप्रमाणे आकसताना ज्या सुरकुत्या फळावर पडतात, तसेच पृथ्वीचे तप्तलाल वस्तुमान थंड होत जाताना पृथ्वीला पडलेल्या सुरकुत्या म्हणजे डोंगर-दर्‍या. सर्व जीवनमानाचे हे आदीस्थान. कोणताही द्रव पदार्थ हा सपाट भागाकडून खोलगट भागाकडे धाव घेऊन खोलगट भागातच स्थिरावतो हा द्रवपदार्थाचा धर्म.

बाष्प निर्माण होऊन पहिली पर्जन्यवृष्टी झाल्यापासून पृथ्वीवरील पहिल्या द्रवपदार्थाने म्हणजे पाण्याने हा धर्म कधी सोडला नाही. नदी-नाले आणि समुद्र हे त्याचे आदी आणि पृथ्वी असेपर्यंतचे अंतिम स्वरूप. कड्याकपार्‍यावरून नदी-नाले जेव्हा खाली झेप घेतात तेव्हाच त्याचे धबधबे होतात. पृथ्वीवरील सर्व लहान-मोठे धबधबे हे असे तयार झालेले आहेत. काही नद्या थेट कपार्‍यावरून खाली झेप घेतात तर काही कपार्‍यांना कडा नसल्यास तो प्रचंड पाण्याचा लोंढा कपार्‍यावरून घरंगळत खाली येतो आणि पुढे इच्छित स्थळी वहात जातो.
पाण्याच्या प्रवाहाने कड्यावरून एकदम खाली झेप घेणे आणि त्याने कड्याच्या उतारावरून घरंगळत खाली येणे हा नैसर्गिक सौंदर्याचा फार मोठा आविष्कार असतो. तेथील घुमणारा एक नादमय प्रचंड आवाज आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा. दुधाळ, फेसाळ, आक्राळ-विक्राळ आत्मघाती पाण्याचा प्रवाह म्हणजे सौंदर्यशास्त्राचा एक आकृतिबंध असतो. हा घुमणारा आवाज आज सभ्य संस्कृतीला परिचित झाला असला तरी नायगारा धबधब्यासारख्या अठराव्या शतकाच्या शेवटी लागलेल्या शोधाआधी त्या घनदाट जंगलात राहणार्‍या आदिवासी जमातीनेसुद्धा नायगाराच्या प्रचंड आवाजाला घाबरून त्याचे दर्शन घेतले नव्हते. कारण प्रचंड आवाज करीत कोसळणारा हा धबधबा म्हणजे कोणतरी महाराक्षच त्या ठिकाणी असावा असा समज करून त्या तीन-चार कि. मी.च्या परिसरात कोणतीच मानवी पावले फिरकली नव्हती. त्याचे पावित्र्य अठराव्या शतकाच्या शेवटपर्यंत मानवासाठी अनभिज्ञ होते. आमच्या गोव्याच्या दूधसागराचे विहंगम दर्शन आदिमानवासाठी कधीच परिचित झाले असण्याची शक्यता आहे. आज हे दुधसागराचे पावित्र्य भंग करण्यासाठी गोव्याच्या आणि गोव्याबाहेरील तथाकथित भारतीय नागरिकांची (?) तेथे शर्यत लागलेली आहे.
गोव्याचा हा दूधसागर धबधबा कड्यावरून एकदम कोसळत नाही, तर तो उतारावरून घरंगळत खाली येतो. त्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहातील सह्याद्रीच्या कठीण कातळाच्या प्रत्येक अणुरेणूवर पाण्याचा प्रत्येक अणुरेणू हा प्रत्यक्ष कपाळमोक्ष करीत असल्याने जे अब्जावधी तुषार एकाच वेळी उडत असतात त्यामुळे पर्वत माथा तो ते पाणी खाली स्थिरावेपर्यंत जो एक पाण्याचा प्रवाह दिसतो तो पूर्ण फेसाळलेला असतो. डोंगरमाथ्यावरून घसरल्यानंतर ह्या प्रवाहाला खाली अनेक फाटे फुटतात आणि हा धबधबा डोंगरकड्याच्या मध्यभागी फुगीर होत खाली खाली निमुळता होत जातो.
पावसाळ्यात ह्या ठिकाणी सतत पावसाची रिपरिप असल्याने आणि पूर्ण ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचे दर्शन फार कमी होते; पण श्रावणसरीत हा धबधबा न्हाऊन निघताना त्यावर पडलेल्या उन्हात हा धबधबा पहाणे हा दुर्मीळ योग आहे; पण हेही त्याचे उन्हातील दर्शन अगदी जवळून घेण्यापेक्षा दूरवरून रेल्वे ट्रॅकवरून घेणे हा फार मोठा आंतरिक ठेवा असतो!
दूधसागर धबधब्याचा अंतरात्मा चिरत त्याच्या उरावरून जाणारा रेल्वे ट्रॅक मला वाटते हा जगातील एकमेव धबधबा असेल. पण ज्यांनी हा रेल्वे ट्रॅक ह्या घनदाट जंगलातून नेला त्या ब्रिटिश अभियंत्यांनी कोणत्याच पद्धतीने इथे निसर्गाची हानी केली नाही किंवा ह्या दूधसागर धबधब्याच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहोचेल असे कोणतेही क्रौर्य केलेले नाही. तिथपर्यंत पावसाळ्यात जाण्याचा रेल्वे हाच एकमेव मार्ग आहे.
गोव्यात अनेक झरे आणि पाणवठे असे आहेत की त्यांचे पावित्र्य पोर्तुगीज शासनाने राखले आहे. इतकेच नव्हे तर ह्या नैसर्गिक जलस्रोतावर फार मोठे अतिशय कलापूर्ण देवळासारखे बांधकाम करून त्यांना संरक्षित केले आहे; पण स्वतंत्र भारतातील सुबुद्ध (?) नागरिकांनी ह्या सर्व नैसर्गिक जलस्रोतांची किडे पडलेली डबकी करून सोडलेली आहेत. बॉक द व्हॉक, पणजी येथे जमिनीखाली बारमाही एक धबधबा पडतो आणि दुसर्‍या बाजूला एक सुरेख झरा वहातो. ह्या सर्व नैसर्गिक स्रोतावर जमिनीखाली प्रचंड मोठे बांधकाम करून त्याचे पोर्तुगिजांनी जतन केलेले आहे हे कुणालाही खरे वाटणार नाही. ते अक्षरश: बंगला पद्धतीचे बांधकाम अजूनही अगदी सुस्थिर, भक्कम आहे. त्याच्यात बाल्कांव आहेत. आमनेसामने बसून चर्चा करण्यासाठी अगदी दगडी सोफे व खुर्च्या आहेत. धबधब्याकडे जाण्यासाठी जमिनीवर अगदी फरशी टाकलेली आणि वर २०० मीटरपर्यंत जमिनीखाली सुरेख दगडी कमान उभारलेली आहे. पण सुबुद्ध (?) गोवेकर भावांनी (?) अगदी जमिनीखालील ह्या बंगल्याच्या बरोबर वर जमिनीवर साईबाबांचे पक्के बांधकाम केलेले आहे. हा दुष्टपणा म्हणणार की सुष्टपणा? हीच वृत्ती दूधसागर धबधब्याकडे जाणारे सर्व सुबुद्ध नागरिक करतात. तेथे दारूच्या बाटल्या तर घेऊन जातातच, चिकन, मटण, बिर्याणी अगदी अन्नही घेऊन जातात. त्या ठिकाणी बसून खातात आणि नेलेल्या कागदी पत्रावळी व उष्टे-खरकटे त्या प्रवाहात सोडून देतात. दारूच्या बाटल्या त्या कातळावर फोडून काचा टाकतात. दुसर्‍या तेथे येणार्‍या माणसाच्या पायात त्या काचा रिघाव्यात आणि तो रक्तबंबाळ व्हावा हाच दृष्टीकोन फार मोठी नागरिक अक्कल (?) असलेल्या भारतीयाकडे आहेत. जलस्रोतांचे पावित्र्य राखून तो निर्मळ ठेवण्याऐवजी तिथे आपली सारी मनाची, शरीराची घाण टाकून तो विद्रूप करून टाकणे हीच भारतीयांची संस्कृती आहे. परदेशात असे कुठेच होत नाही. लेह (लडाख) जिथे हिमालयाच्या माथ्यावरून नद्या वहातात त्या बुद्धिस्ट संस्कृतीत जलस्रोत घाण करण्याची प्रवृत्ती नाही हे मी अनुभवले आहे.
गोव्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी अथांग निळाशार समुद्र तर माथ्यावरही लाखो वर्षांपासून सुरू असलेला दूधसागर धबधब्याची दुधाळ – फेसाळ सह्याद्रीच्या माथ्यावरून घरंगळत खाली कोसळणारा जलप्रपात जणू सह्याद्रीला लाखो वर्षांपासून दुधाचा अभिषेक घालतो आहे असे वाटते. आतापर्यंत मी तीनवेळा दूधसागरावर जाऊन आलेलो आहे. आणि त्याची वेगवेगळ्या अंगाने ७०-८० तरी छायाचित्रे टिपलेली आहेत. वेगवेगळ्या अंगाने आणि वेगवेगळ्या वातावरणात व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले आहे. कर्नाटकातून वहात येणारी ही नदी गोव्याने परिधान केलेल्या हिरव्याचार पाचूच्या चंद्रकलेला पांढरी फेसाळ वेलबुट्टीदार किनार लावण्यासाठी जणू त्या सह्याद्रीच्या कड्यावरून कपाळमोक्ष करीत धावत येते आहे असेच त्या विशाल फेसाळ प्रपातासमोर आपण उभे राहिलो असता वाटते.
रेल्वेच्या ट्रॅकवरील पुलावर उभे राहून तासन तास अविरत कोसळणार्‍या ह्या फेसाळ जलप्रपाताकडे पाहिले असता माणूस नावाच्या पृथ्वीवर इतर प्राण्यासारखाच उत्क्रांत झालेल्या प्राण्याची शूद्रता अधिक जाणवते. रेल्वेच्या आणि बॉक द व्हॉक सहीत गोव्यातील जलस्रोतांवर अभिनव बांधकाम करून त्याला पावित्र्य प्राप्त करून दिलेल्या पोर्तुगिजकालीन सर्व अभियंत्यांना अभिवादन केलेच पाहिजे. गोव्याचा रेल्वे ट्रॅक ज्यांनी शोधून काढला आणि बांधला त्या ब्रिटिश अभियंत्यांना सलाम केलाच पाहिजे. इतक्या घनदाट जंगलातून आणि धबधब्याच्या उरावरून रेल्वे जाणारा भारतातील तरी हा एकमेव रेल्वेमार्ग असावा. हा रेल्वेमार्ग बांधत असताना ह्या नैसर्गिक चित्रकृतीला त्यांनी आपल्या मानवनिर्मित कृतीने कुठेही बाधा आणलेली नाही. बाधा जर आज येथे कोण आणत असेल तर भारताचे दुष्ट नागरिकच.
ह्या दूधसागर धबधब्याचे आज रूढ अर्थाने दोन भाग आहेत. याचे विहंगम दर्शन रेल्वे पुलावर राहून अगदी जवळून आपणाला येथेच्छ घेता येते; पण ते रेल्वेपुलावरील भागाचे. खरा रमणीय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा दूधसागराचा भाग हाच आहे. हा प्रचंड आवाज करीत कोसळणारा प्रपात रेल्वे ट्रॅकच्या पायाकडे शांत होतो आणि स्वत:ला तिथे डोहात रूपांतरित करीत परत लगबगीने पुलाखालून खालच्या चिंचोळ्या, कातळकपारीतून स्वत:ला झोकून देऊन खाली कुळेच्या बाजूने नदी बनून साळसूदपणे निघून जातो. भर पावसाळ्यात ह्याचे सर्वांगसुंदर दर्शन हृदयात साठवणे ही एक अपरिमित अनुभूती आहे; पण ती तुम्ही सौंदर्यउपासक असल्यास. तसे नसल्यास तुमच्या पापी पावलांची येथे अजिबात गरज नाही.
कर्नाटकाने जर उद्या ह्या नदीवर वरच्या बाजूने बांध घालून पाणी अडवले तर अनेक अनिष्ट परिणाम गोव्यावर होऊ शकतात. सगळ्यात म्हणजे निसर्गाने केवळ गोव्यासाठी रेखाटलेले हे भव्य निसर्गचित्र एका क्षणात नष्ट होईल.
निसर्गाला समजून घेण्यासाठी आणि त्याच्या अणुरेणूत सामावलेले सौंदर्य आपल्या मर्मबंधात कायमचे साठवून ठेवण्यासाठी फक्त हवे आहे ते संवेदनशील मन आणि ते दुसर्‍याला दाखविण्यासाठी मनाचा आरसा. निसर्गाच्या पावित्र्यात मन शांत करण्यासाठी जायचे असेल तर शिजवलेले अन्न नेऊ नका, सुकामेवा आणि बिस्किटजन्य पदार्थ न्या. संतुलित आहार घ्या आणि पदार्थांची वेष्टने किंवा इतर नेलेल्या पाणी आदीच्या बाटल्या, वस्तू परत बॅगेत घालून घरी येऊन त्याची विल्हेवाट लावा, ही कळकळीची विनंती.
………..