धबधबा पर्यटकांसाठी बंद केल्याने पोलिसांची कारवाई
दूधसागर धबधबा पाहण्यासाठी रविवारी सकाळी आलेल्या दोन हजारपेक्षा अधिक पर्यटकांना दूधसागर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी रोखले. यामुळे पर्यटक रेल्वे रुळावर उतरल्याने सुमारे दोन तास रेल्वे रुळ बंद झाला होता. मात्र वास्को येथून अतिरिक्त पोलीस पथक मागवून पर्यटकांचा हा जमाव हटविण्यात आला.
सरकारने राज्यातील अन्य धबधब्यांबरोबरच पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरलेला दुधसागर धबधबाही पर्यटकांसाठी बंद केल्याने काल या धबधब्याकडे निघालेले शेकडो पर्यटक खोळंबून पडले. त्यामुळे आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. हा धबधबा बंद केल्याने सुमारे दोन हजार पर्यटक काल रविवारी खोळंबून पडले. काल ‘विकएन्ड’ व रविवारची सुटी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक दूधसागर धबधब्यावर सहलीसाठी जाण्यास निघाले होते. मात्र, हल्लीच सांगे येथील धबधब्यावर दोघाजणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सगळेच धबधबे पर्यटकांसाठी बंद केलेले असल्याने वरील धबधब्यावर जाण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर तेथे हिंसाचारासारखी घटना घडू नये यासाठी तेथे मोठ्या संख्येन पोलिसांना तैनात करावे लागले.
दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातल्याची माहिती कर्नाटक व अन्य राज्यातील पर्यटकांना नाही. काल यशवंतपूर व निजामुद्दीन एक्स्प्रेस रेल्वेगाडीने कर्नाटकहून मोठ्या संख्येने पर्यटक दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी आले होते. मात्र, सरकारने धबधब्याकडे जाणारी वाट बंद केल्याने या पर्यटकांचा हिरमोड झाला व दूधसागर धबधबा बंद करण्याच्या घटनेविषयी या पर्यटकानी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराज झालेल्या पर्यटकांनी मग रेल्वे रुळावर गर्दी केली होती. त्यामुळे रेल्वे रूळही ब्लॉक झाला होता.
दुधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाची संख्या वाढतच चालली असल्याचे दिसून आल्यानंतर वास्को व लोंडा येथील पोलीस स्थानकावरून अतिरिक्त पोलीस फौजफाटा आणावा लागला.
सांगे तालुक्यातील नेत्रावळी येथील मैनापी या धबधब्यावर गेल्या आठवड्यात दोघेजण बुडून ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्यातील सर्व धबधब्यांकडे जाणाऱ्या वाटा बंद केल्या असून धबधब्यांवर जाण्यास बंदी आणली असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
रेल्वेकडून सूचनापत्र जारी
दरम्यान, या पार्श्वभूमीवर काल दक्षिण मध्य रेल्वेने एक सूचना पत्र जारी करून दूधसागर धबधब्याचे दर्शन ते प्रवास करीत असलेल्या रेलवे डब्यातून घ्यावे आणि रेल्वे रुळावर गर्दी करून स्वत:सह अन्य लोकांचा जीव धोक्यात घालू नये, अशी सूचना करणारे पत्र जारी केले आहे. तसे करणे हे रेल्वे कायद्यातील कलम 147, 157 खाली गुन्हा असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या ह्या कृत्यामुळे रेल्वेगाडीलाही धोका निर्माण होण्याची भीती असल्याचे रेल्वेने आपल्या सूचनापत्रातून स्पष्ट केले आहे.