दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्नावर चर्चा करून योग्य तो उपाय काढण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. ते आज सकाळी दिल्लीला रवाना होतील. गोवा मुक्तीनंतर १९६२ साली केंद्र सरकारने जारी केलेल्या एका आदेशानुसार सरकारने येथील जनतेला पोर्तुगालमध्ये जाणार की नाही, यासंबंधी कळविण्याचे आवाहन केले होते व कोणतीही माहिती न देणारे भारतीय नागरिक म्हणून गृहीत धरण्याची तरतूद केली होती. असे असतानाही हजारो नागरिकांचा पोर्तुगालमध्ये जन्म झाल्याची नोंद आहे. त्यामुळे गोंधळ आहे. विदेशी देशांचा यासंबंधीचा कायदा आपल्या देशाला लागू पडू नये, असे विधेयक केंद्राने संमत करावे, या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री केंद्राला सूचना करण्याची शक्यता आहे.
दाबोळीत विमानांच्या पार्किंगचा प्रश्न केंद्राकडे मांडणार
दाबोळी विमानतळावर सध्या विमान पार्किंगची समस्या आहे. त्यामुळे ‘पार्किंग लॉट’चा प्रश्न सोडविण्यासाठी आपण केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. एअर एशिया कंपनीने दाबोळी विमानतळावर पार्किंगची जागा मिळावी म्हणून प्रस्ताव ठेवला आहे. मोठ्या प्रमाणात विमाने पार्क करण्याची सोय झाल्यानंतर विमाने रात्रीच्यावेळी दाबोळीवर पार्क केली जातील व सकाळी ती उड्डाण घेतील. वरील सुविधा निर्माण झाल्यानंतर एटीएफ शुल्क साडेबारा टक्क्यांवरून कमी करणे शक्य होईल, असे पर्रीकर यांनी सांगितले. एसआयटीने ज्या कंपन्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत त्यापैकी दोन कंपन्यांनी खनिज निर्यातीसाठी बनावट चलनांचाही वापर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.