दुहेरी आव्हान

0
25

भारतीय जनता पक्षाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस सध्या पक्षासमोरील आव्हाने दूर सारण्यासाठी गोव्यात ठिय्या देऊन राहिले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डाही लवकरच गोव्यात डेरेदाखल होणार आहेत. भाजपपुढील आव्हाने यंदा थोडथोडकी नाहीत. शिवाय ती यावेळी दुहेरी स्वरूपाची आहेत. बाहेरची आव्हाने तर आहेतच, परंतु त्याहून अधिक अंतर्गत आहेत. भाजपची प्रतिष्ठा त्यांनी जवळजवळ पणाला लावली आहे.
भाजपपुढील पहिले अंतर्गत आव्हान आहे ते अर्थातच बंडाळीचे. पक्षाचे राज्यातील सरकार बळकट करण्यासाठी इतर पक्षांतून फोडाफोडी करून आणलेले आणि पक्षाचे निष्ठावंत यांच्यात एव्हाना कमालीची जुंपलेली दिसते आहे आणि या संघर्षात कोणाच्या बाजूने राहायचे हा पेच भाजपा श्रेष्ठींपुढे आहे. पक्षाच्या निष्ठावंतांसोबत राहायचे की सत्तेसाठी सोबत आलेल्यांना पाठबळ द्यायचे ह्याचा निर्णय यावेळी पक्षाला घ्यावा लागणार आहे आणि तो निश्‍चितच सोपा नाही.
नुकतेच मांद्रे मतदारसंघात दयानंद सोपटे आणि लक्ष्मीकांत पार्सेकर या दोघांनीही आयोजित केलेल्या कार्यक्रमांना फडणवीस यांनी हजेरी लावली आणि त्यांनी तेथील उमेदवारी कोणाला ह्यासंबंधी सूतोवाचही करून टाकले. जो जास्त गर्दी गोळा करू शकतो, त्याला उमेदवारी, कारण विजय संपादन करून आणण्याची त्याची क्षमता जास्त असा सोपा हिशेब फडणवीसांनी आणि पक्षाने समोर ठेवलेला दिसतो. पक्षाला काहीही करून आपली राज्यातील सत्ता राखायची आहे आणि त्यासाठी केवळ जिंकण्याची क्षमता हाच निकष यावेळी पक्ष अवलंबिण्याची अधिक शक्यता आहे.
पक्षापुढे दुसरे अंतर्गत आव्हान आहे ते आपल्याबरोबरच आपल्या पत्नीला वा आपल्या उमेदवारांनाच उमेदवारी द्या असा हट्ट धरलेल्या आमदारांचे. मायकल लोबो तर पत्नी डिलायलासाठी केव्हापासून त्यासाठी पक्षनेतृत्वाला बेटकुळ्या दाखवत आलेले आहेत. उमेदवारी देता की नाही? देणार नसाल तर हा चाललो, अशी सरळसरळ दमदाटीच त्यांनी चालवलेली दिसते. बाबूश मोन्सेर्रातही तिरकी चाल चालू लागलेले पाहायला मिळत आहेत. आपल्या कार्यालयाबाहेरील फलकावरील पक्षाचे चिन्हच त्यांनी काढून टाकून पक्षनेतृत्वाला ललकारले आहे. हे सगळे चित्र पाहिले तर भाजपसाठी उमेदवार निवड यावेळी किती कठीण आहे त्याची प्रचीती येते. प्रत्येक मतदारसंघात असे त्रांगडे निर्माण झाले आहे आणि तसे ते होणे अपरिहार्य आहे, कारण सर्वांवर जरब ठेवणारे मनोहर पर्रीकरांचे नेतृत्व यावेळी नाही आणि स्थानिक नेतृत्वामध्ये सर्वांना काबूत ठेवण्याची क्षमता दिसत नाही. त्यामुळे पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनाच हा पेच सोडवावा लागणार आहे.
हे त्रांगडे जोरजबरदस्तीने सोडवण्याजोगी परिस्थितीही पक्षापुढे नाही, कारण सद्यपरिस्थितीत अनेक राजकीय पक्ष भाजपमधून कोणी बाहेर पडतो का यावर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून त्याला आपल्यासोबत घेण्यास आतुरले आहेत. त्यामुळे शक्यतोवर बाबापुता करून बंडाळीची झळ कमीत कमी बसेल असा प्रयत्न पक्षनेत्यांना करावा लागेल. पक्षाचे काही आमदार उमेदवारी धोक्यात असल्याने वा अन्य कारणांनी पक्षत्याग करण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यांना थोपवण्याचे आव्हान पक्ष प्रभारींपुढे
भाजपाला आगामी निवडणूक एकाकी लढवावी लागेल असे चित्र सध्या तरी निर्माण झालेले आहे. विरोधकांची एकजूट अद्याप झालेली नाही हा जरी त्यांच्यासाठी दिलासा असला, तरी एकेका मतदारसंघात अनेकानेक पक्ष आणि उमेदवारांची दाटी होणार असल्याने मतविभाजनातून शेवटी काय निष्पन्न होईल आणि विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालील हे सांगणे अवघड बनले आहे. भाजपचा आमदार शंभर टक्के निवडून येईल असे छातीठोकपणे सांगण्याजोगी परिस्थिती आज एकाही मतदारसंघात दिसत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत मगोने सोबत करावी म्हणजे निदान समविचारी मते तरी विभागली जाणार नाहीत असा भाजपचा प्रयत्न आहे. गोवा फॉरवर्डलादेखील येत असेल तर सोबत घेण्याची भाजपची तयारी आहे. परंतु दोन्ही पक्षांनी भाजपाचा प्रस्ताव सरळसरळ धुडकावून लावलेला दिसतो. युतीची गरज आज भाजपला आहे, मगोला नाही. त्यामुळे मगो नेते भाजपला फटकारत, अपमानीत करीत चालले आहेत. भाजपची साथसोबत म्हणजे आत्मघात असे सांगणारे मगो नेते आता येत्या निवडणुकीत भाजप एकेरी आमदारसंख्या ओलांडू शकणार नाहीत असे खिजवू लागले आहेत. हा मुका मार सोसण्यावाचून भाजप नेत्यांपुढे पर्याय राहिलेला नाही. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या प्रबळ भाजपावर ही वेळ का आली याचा विचारही पक्षनेते करतील काय?