काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांच्या विरोधात गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता निवाडा देणार आहेत.
पर्वरी येथील विधानसभा सचिवालयाने यासंबंधीची एक नोटीस काल जारी केली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांच्याविरोधात गिरीश चोडणकर यांनी सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 25 ऑक्टोबरला अंतिम युक्तिवाद झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांना लिखित स्वरूपात बाजू मांडण्यासाठी सोमवार 28 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये दोन्ही पक्षांनी लेखी स्वरूपात आपली बाजू मांडलेली आहे.
गिरीश चोडणकर यांच्या याचिकेत पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे, तर कायद्याचे उल्लंघन झालेले नसल्याचा दावा आमदारांच्या वतीने युक्तिवादात करण्यात आला आहे.
गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवर 4 नोव्हेंबरपूर्वी निकाल देण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सभापतींना दिलेला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आमदार अपात्रता याचिका सुनावणीला येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सभापती रमेश तवडकर यांनी डॉम्निक नोरोन्हा यांनी 8 फुटीर आमदारांच्या विरोधात दाखल केलेली आमदार अपात्रता याचिका गेल्या 14 ऑक्टोबरला फेटाळून लावली होती. आता, गिरीश चोडणकर यांच्या आमदार अपात्रता याचिकेवर कोणता निवाडा दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.