>> साथरोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांची माहिती; पहिला डोस घेतलेल्यांना नोव्हेंबरपर्यंत दुसरा डोस देणार
राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या काळात २५३६ कोविड बळी गेले होते, त्यापैकी २३५९ जणांनी कोविड प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नव्हता. दुसर्या लाटेतील एकूण कोविड बळींपेकी ९२ टक्के मृत्यू हे लसीकरण न झालेल्यांचे होते, अशी माहिती साथरोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल दिली.
पणजी येथे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर उपस्थित होते.
याच लाटेच्यावेळी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या १९ जणांचा मृत्यू झाला होता; पण त्यापैकी १७ जणांना गंभीर स्वरूपाचे आजार होते, अशी माहिती देखील डॉ. बेतोडकर यांनी दिली. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, असे २ लाख ६ हजार लोक गोव्यात आहेत. कोविडच्या निर्मूलनासाठी जास्तीत जास्त लोकांनी दुसरा डोस घेण्याची गरज डॉ. बेतोडकर यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत ज्या लोकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा सर्वांना येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दुसरा डोस देण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य सेवा संचालनालयाने ठेवले आहे, अशी माहिती डॉ. बोरकर यांनी यावेळी दिली.
राज्यात आतापर्यंत १०४ टक्के एवढ्या लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला असून, त्यात पर्यटक व इतरांचाही समावेश आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांची राज्यातील टक्केवारी ही ७१ टक्के एवढी आहे. गोवा हे पर्यटन राज्य असून, आता मोठ्या संख्येने राज्यात पर्यटकांची गर्दी उसळणार आहे. त्यामुळे कोविडचा संसर्ग टाळायचा असेल, तर राज्यातील सर्व लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले पाहिजेत, असेही डॉ. बोरकर म्हणाले.
३१ ऑक्टोबरपासून लसीकरणाला वेग : डॉ. बोरकर
ज्या लोकांनी पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यांना दुसरा डोस घेता येईल. या सर्वांच्या लसीकरणाला गती देण्यासाठी येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सध्या अस्तित्वात असलेल्या ४० लसीकरण केंद्रांबरोबरच आणखी २१९ उपकेंद्रें उभारून लसीकरणाची एक महामोहीम हाती घेण्यात येणार आहे. हे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ या दरम्यान होणार असून, त्यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बोरकर यांनी दिली.