ऍशेस मालिकेतील दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाची दुसर्या डावात ४ बाद ५३ अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. परंतु, पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यानंतर कांगारूंनी आपली एकूण आघाडी २६८ धावांपर्यंत फुगवत सामन्यावर घट्ट पकड मिळविली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४४२ धावांना उत्तर देताना इंग्लंडने दुसर्या दिवसअखेर १ बाद २९ धावा केल्या होत्या. काल तिसर्या दिवशी त्यांचा पहिला डाव २२७ धावांत संपला. त्यांच्याकडून एकाही फलंदाजाला अर्धशतकी वेस ओलांडता आली नाही. आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या क्रेग ओव्हर्टन याने त्यांच्याकडून सर्वाधिक नाबाद ४१ धावांची खेळी साकारली. वोक्सने ३६ धावा जमवल्याने इंग्लंडला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने ४, मिचेल स्टार्कने ३, कमिन्सने २ व हेझलवूडने १ गडी बाद केला. पहिल्या डावाच्या आधारे २१५ धावांची मोठी आघाडी घेऊनही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर फॉलोऑन लादला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी विद्युतझोतात गोलंदाजी करण्याचा लाभ उठवत कांगारूंचे आघाडीचे चार गडी बाद केले. दिवसअखेर पीटर हँड्सकोंब व नाईट वॉचमन नॅथन लायन प्रत्येकी ३ धावांवर नाबाद होते.