दुसरा बळी

0
109

कांदोळीच्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये ईशा मंत्री या बॉलिवूडच्या उभरत्या कॉस्च्युम डिझायनरचा काल झालेला संशयास्पद मृत्यू या एकंदर तथाकथित संगीत महोत्सवांच्या आडून चालणार्‍या अमली पदार्थांच्या व्यवहारांकडेच अंगुलीनिर्देश करतो आहे. ईशाचा बळी हा नैसर्गिक मृत्यू नाही. तिच्या अनैसर्गिक मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नसले, तरी अमली पदार्थाच्या अतिसेवनातून एखादीचा असा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००९ साली बेंगलुरूची मेहा बहुगुणा नामक एक तरुणी ‘सनबर्न’ साठी गोव्यात आली असता तिचाही अशाच प्रकारे अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू ओढवला होता. एक मादक द्रव्य प्राशन करताच ती कोसळल्याची जबानी तिच्या मित्रांनी दिली होती, परंतु तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला बायपोलर डिसऑर्डर हा मानसिक आजार होता अशी जबानी पोलिसांना दिली होती. बायपोलर डिसऑर्डर म्हणजे मनःस्थितीमधले कमालीचे चढउतार. मात्र, त्या मृत्युप्रकरणामागील सत्य कधीच बाहेर आले नाही आणि हे महोत्सवही बंद झाले नाहीत. उलट अशा प्रकारच्या तथाकथित संगीत महोत्सवांना बंद पाडू म्हणणारे सत्तेवर येताच त्याचे समर्थनही करू लागल्याचे गोमंतकीय जनतेला पाहावे लागले. केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी आणि आर्थिक फायदा नजरेसमोर ठेवून अशा प्रकारच्या गैरगोष्टींकडे कानाडोळा करण्याची प्रवृत्ती सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहे असे दिसते. त्यामुळे विरोधात असताना अशा प्रकारांबाबत गदारोळ माजवायचा आणि स्वतः सत्तेत येताच मात्र मिठाच्या गुळण्या घ्यायच्या हा प्रकार सुरू आहे. खरे तर अशा प्रकारचे संगीत महोत्सव हे खरोखरच संगीताचे महोत्सव आहेत की त्यांच्या आडून गैरगोष्टी घडत आहेत, याची शहानिशा होणे अत्यावश्यक आहे. परंतु आयोजक, राजकारणी, पोलीस यांची अशी मिलीभगत या गैरप्रकारांकडे डोळेझाक करत असल्यानेच अशा निष्पाप तरुणींचे बळी जातात. खास या महोत्सवांसाठी म्हणून शेकडोंच्या संख्येने जे तरूण – तरूणींचे गट गोव्यात येत असतात, त्यांच्या येण्याचा उद्देश केवळ संगीत ऐकणे हा निश्‍चितच नसतो. ही मंडळी सर्व प्रकारची चैन करायला आलेली असते. या चैनीच्या व्याख्येत मग सगळेच बसते. त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून देणार्‍या दलालांची गोव्यात काही कमी नाही. शिवाय गोव्यात तर अशा महोत्सवांना उपस्थिती लावणे ही फॅशन बनलेली आहे. आपण आजच्या आधुनिक युगाचे प्रतिनिधी आहोत, पुढारलेले आहोत हे मिरवण्यासाठी अशा महोत्सवांचे पास मिळवण्यासाठी धडपडणारी मध्यमवर्गीय कोवळी तरूण मुले अवतीभवती बरीच दिसतात. ज्यांना स्वतःचे हित कशात आहे याची जाणीव झालेली नाही, ज्यांना आपण एका सापळ्यात अडकू शकतो याची धास्ती नाही, अशी ही मुले महोत्सवात बेधुंद होऊन जातात आणि एखाद्या निसटत्या क्षणी जाणीवपूर्वक वा फसवले गेल्याने म्हणा, अमली पदार्थांच्या सापळ्यात अडकू शकतात. प्रस्तुत प्रकरणात ईशा मंत्री हिचा मृत्यू ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि तिच्या मृत्यूची समूळ चौकशी व्हायलाच हवी. अशी प्रकरणे दडपली जाण्याची दाट शक्यता असते आणि बहुतेक वेळा मुलांचे पालकही आपल्या मुलाने अमली पदार्थाचे सेवन केले हे कबूल करायला तयार नसतात. त्यामुळे आपल्या पाल्याला अमूक आजार होता, तमूक आजार होता असे सांगत ते पोलिसांची दिशाभूल करू शकतात. परंतु अशाने या महोत्सवांच्या आडून चालणार्‍या गैरगोष्टींवरही आपण पांघरूण घालत आहोत आणि त्यातून आपल्या मुलीसारख्याच इतर मुलीबाळींचा बळी जाऊ शकतो याची जाणीव ते ठेवत नाहीत. मेहा बहुगुणा हिच्या मृत्यूमागील कारण जर उजेडात आले असते, तर आज इशा मंत्रीवर ही वेळ आली नसती. त्यामुळे या मृत्यूचा दोष अशा महोत्सवांची पाठराखण करणारे राजकारणी, पोलीस आणि आयोजक या सर्वांकडे जातो. आजवर गोव्याची ओळख जगात मद्याची गंगा वाहणारे पर्यटनस्थळ अशी होती. आता ती कॅसिनो, मसाज पार्लरच्या आडून चालणारा वेश्याव्यवसाय, संगीत महोत्सवांआडचा अमली पदार्थांचा व्यापार यांची गंगोत्री म्हणून होऊ लागलेली आहे आणि उठता बसता भारतीय संस्कृतीच्या गमजा सांगणारे सत्ताधीश हे रोखू शकत नाहीत हे अतिशय खेदजनक आहे.