बेळगाव हे समस्त गोमंतकीयांचे आवडते शहर. शनिवार – रविवार तेथे मनसोक्त खरेदीत घालवणे गोमंतकीयांना नेहमीच आवडते. बेळगावची बाजारपेठही बव्हंशी गोमंतकीयांवर अवलंबून असल्याने गोवेकरांचे तेथे नेहमीच अत्यंत आतिथ्यशील स्वागत होते. मात्र, फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांना तेथे आलेला विपरीत अनुभव आणि रिक्षाचालकाकडून झालेल्या मारहाणीअंती ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा झालेला मृत्यू ही अत्यंत अपवादात्मक आणि तितकीच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. बेळगाव शहराच्या मध्यवस्तीत खडेबाजारातील अरूंद गल्लीत त्यांचे वाहन रिक्षाला जरासे घासल्याचे निमित्त करून ते लॉजमध्ये जात असताना त्यांची वाट रोखून त्यांना जबर मारहाण केली गेली. त्यामुळे लॉजच्या पायऱ्या चढून गेल्यावर लागलीच ते खाली कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. रक्तदाब वाढून ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू ओढवल्याचे निदान त्यामुळे करता येते. त्यांच्या मृत्यूचे कारण जरी ह्रदयविकार ठरले असले तरी ह्रदयविकाराचा झटका येण्यास त्यांना झालेली बेफाम मारहाण हेच कारण आहे. त्यामुळे संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा खटला चालवून त्याला त्याच्या कृत्याची कठोर शिक्षा दिली गेलीच पाहिजे. त्यासाठी गोवा सरकारने ह्या प्रकरणाचा पाठपुरावा केला पाहिजे. लवू मामलेदार हे जरी राजकारणी असले, माजी आमदार असले, तरी आपल्या राजकीय स्थानाचा माज त्यांच्यात कधीच दिसत नसे. ते एक सौम्य स्वभावाचे, मृदू बोलणारे आणि अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे रिक्षाचालकाने भांडण उकरून काढले तरी ते त्याच्याशी अरेरावीने वागणे संभवत नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्येही हे दिसते. तरीही संबंधित रिक्षाचालकाने त्यांची वाट अडवून धरून त्यांच्यावर हात उगारला व जोरदार थपडा लगावल्या. किमान मामलेदार यांच्या वयाचा विचार करून तरी त्याने संयम बाळगायला हवा होता. परंतु ज्या तऱ्हेने मामलेदार यांना मारहाण झाली, ते सरळसरळ गुंडगिरीचे कृत्य आहे आणि त्याची त्याला शिक्षा झाली पाहिजे. लवू मामलेदार यांची ओळख जरी एक राजकारणी म्हणून अलीकडच्या काळात असली, तरी मुळात एक शिक्षक, पोलीस अधिकारी आणि राजकारणी असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास राहिला. पोलीस दलातही उपनिरीक्षकपदावरून उपअधीक्षक पदापर्यंत त्यांनी प्रगती केली होती. सेवेचा राजीनामा देऊन ते आपले शाळकरी मित्र सुदिन ढवळीकर यांच्यामुळे मगो पक्षाच्या तिकिटावर राजकारणात उतरले. फोंड्याचे तोवर अनभिषिक्त सम्राट असलेल्या रवी नाईक यांचा भाजप – मगो युतीच्या वतीने पराभव करून जायंट किलर आमदार बनले. पुढे सुदिन यांच्याशी त्यांचे राजकीय मतभेद उद्भवल्याने त्यांचे तिकीट कापले गेल्याने ते काँग्रेसतर्फे गेली विधानसभा निवडणूक लढले. मात्र, तेथे त्यांना यश मिळू शकले नाही. पराभवामुळे लवू हे जरी राजकारणातून दूर फेकले गेले, तरी पुन्हा राजकारणात येण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यांचे हे स्वप्न आता अकाली मृत्यूमुळे अधुरेच राहिले आहे. बेळगावात घडलेल्या घटनेकडे पाहताना जाणवते की रिक्षाला गाडी घासणे हे केवळ निमित्त ठरले आहे. मामलेदार यांची गाडी गोव्याची आहे हे दिसल्यानेच त्यांची वाट अडवून त्यांना मारहाण करण्यापर्यंत संबंधित तरुणाची मजल गेली. हाच प्रकार स्थानिकाकडून घडला असता, तर कदाचित प्रकरण तेथल्या तेथे बाचाबाचीअंती मिटले असते. बाहेरगावचे वाहन आहे हे पाहून दांडगाई करण्याचे प्रकार केवळ परराज्यांतच घडतात असे नव्हे. गोव्यातही हे सर्रास दिसते. प्रादेशिक अस्मितेला सतत घातले जाणारे खतपाणी हेही अशा घटनांमागचे कारण असते. त्यामुळेच केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने आता वाहन कोणत्या राज्यातील आहे हे कळू नये यासाठी भारत असा उल्लेख दर्शवणाऱ्या राष्ट्रीय क्रमांकपट्ट्या देण्यास सुरूवात केलेली आहे. त्यातून अशा प्रकारच्या घटना टळू शकतात. मामलेदार यांना झालेली मारहाण आणि त्यात त्यांचा ओढवलेला मृत्यू याचा जबर धक्का गोमंतकीयांना बसला आहे. विशेषतः हे बेळगावात व त्यातही नित्यपरिचयाच्या असणाऱ्या खडेबाजारात घडावे हे पाहून आम गोमंतकीय जनता सुन्न झाली आहे. मात्र, ह्या एका घटनेमुळे गोव्याच्या वेशीवरच्या बेळगावसारख्या आतिथ्यशील शहराच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये हे पाहणेही जरूरीचे आहे. ह्या प्रकरणाचा काटेकोर तपास करून कर्नाटक पोलिसांनी गुन्हेगाराला त्याच्या अमानुष कृत्याची कठोर सजा द्यावी लागेल. येथे प्रश्न केवळ ह्या एका घटनेचा नाही. त्या घटनेचा गोमंतकीय जनमानसावर झालेल्या परिणामाचाही आहे. यापुढे बेळगावात खरेदीसाठी जाणाऱ्या गोमंतकीयांना शहरात पाऊल ठेवताक्षणी खडेबाजारातील त्या घटनेचे स्मरण झाल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळे ह्या घटनेमुळे गोवा आणि बेळगाव या दोन्ही शहरांमधील पूर्वापार अनुबंधांना बाधा येऊ नये आणि अकारण परकेपणाची भावना निर्माण होऊ नये, हेही तितकेच महत्त्वाचे असेल.