दुर्दैवी!

0
19

वेर्णे येथील औद्योगिक वसाहतीतील आपल्या कंपनीसाठी घेतलेले कोट्यवधींचे कर्ज फेडता न आल्याने मूळ कारवारच्या एका उद्योजकाने पत्नी आणि मुलाला नदीत ढकलून आत्महत्या करण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्यासोबत पत्नी आणि बारा वर्षांच्या अजाण मुलानेही आत्महत्या केली असे मानणे गैर ठरेल. खरे तर त्या दोघांची त्याने हत्या केली व नंतर स्वतःचे जीवन संपवले असेच म्हणायला हवे. संकटे कधी कोणावर सांगून येत नसतात, परंतु प्रस्तुत प्रकरणात स्वतःच्या व्यवसायवृद्धीच्या महत्त्वाकांक्षेपोटी हा उद्योजक कर्जाच्या विळख्यात अडकत गेल्याचे दिसते. त्याला ‘झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास’ संबोधणेही गैर आहे. आपण श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. तो काही गुन्हा नाही. परंतु अंथरूण पाहून पाय पसरावेत असा आपल्याला वाडवडिलांकडून मिळालेला धडा असतो. त्याची पर्वा न करता जेव्हा आपल्या आवाक्याबाहेर उडी घेण्याचा प्रयत्न एखादा करतो, तेव्हा ती अंधारातली उडी योग्य ठिकाणी पडेल की संकटात नेईल हे सांगणे अवघड असते. व्यवसायक्षेत्रामध्ये अनेक बाह्य गोष्टीही त्याच्या यशापयशावर मोठा परिणाम घडवत असतात. गेल्या काही वर्षांत तर नोटबंदी, कोवीड महामारी ह्यासारख्या बाह्य घटकांनी कित्येक उद्योजक आणि व्यावसायिकांना मातीला मिळवले. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणातील उद्योजकाच्या व्यवसायाची कर्जबाजारीपणाकडे उतरण झाली तर तो त्याचाच दोष म्हणता येणार नाही. वेर्ण्याच्या औद्योगिक वसाहतीत तो सुरवातीला एका कंपनीत सुरक्षारक्षक होता. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याने त्यांना कामगार आणि इतर साधनसामुग्री पुरवण्याची कंत्राटे घ्यायला सुरुवात केली आणि त्यासाठी स्वतःच्या नावाने कंपनी थाटली. आपला व्यवसाय वाढावा असे त्याला वाटले तर त्यात गैर काय? परंतु तो वाढवताना आपली स्वप्ने आणि भोवतालचे वास्तव याचे तारतम्य बाळगण्यात त्याची चूक झाली असावी आणि त्यामुळेच मग तो एका कर्जातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात अशा सापळ्यात अडकत गेला. एवढा गुंतला की त्यातून बाहेर येणे अवघड झाले. आपल्या आत्महत्येच्या निर्णयात त्याने पत्नीलाही सामील करून घेतले होते का हे कळायला मार्ग नाही, परंतु हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तो कारवारला आपल्या घरी गेला होता व परतीच्या वाटेवर त्याने हा मार्ग उचलला असे उपलब्ध माहितीवरून दिसते. काही वर्षांपूर्वी आपल्या मानसिक विकलांग मुलाच्या मृत्यूचे दुःख असह्य झाल्याने एका पतीपत्नीने आपल्या मुलीसह कुंभारजुव्यात आत्महत्या केली होती त्याचे येथे स्मरण होते.
आपल्या देशात दरवर्षी एक लाखांहून अधिक व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यात लक्षवेधी बाब म्हणजे राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्याची सरासरी जवळजवळ दुप्पट आहे. 2021 च्या उपलब्ध आकडेवारीनुसार गोव्यात हे प्रमाण 19.5 टक्के आहे. गेल्या काही वर्षांत आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. नॅशनल क्राईम ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, 2017 मधील 9.9 टक्क्यांवरून 2021 पर्यंत ते 12 टक्क्यांवर पोहोचले आहे. आर्थिक संकट हे त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे व त्याला बाह्य घटक मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात. त्यामुळे याचा दोष सरकारच्या आर्थिक नीतीवरही येतो. संकटात सापडलेल्या व्यक्तींना दिलासा देणारी कोणतीही प्रभावी व्यवस्था सरकारपाशी नाही. त्यामुळे अशा व्यक्ती देवाधर्माच्या मागे लागतात आणि त्यामध्ये मानसिक समाधान शोधू पाहतात. मानसिक आरोग्याकडे जेवढे लक्ष दिले जायला हवे तेवढे दिले जात नाही हे अशा समस्यांचे मूळ आहे. अलीकडच्या काळात यासंदर्भात जागृती होते आहे. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन स्तरांवर समुपदेशन व्यवस्था सुरू झाली आहे. हेल्पलाईनही निर्माण करण्यात आली आहे. परंतु संकटात सापडलेली माणसे लोकलज्जेस्तव पुढे यायला तयार होत नाहीत. एखाद्याच्या कर्जाची परतफेड झाली नाही की बँकाही हात धुवून त्याच्या मागे लागतात. दुसरीकडे बँकांच्या संचालक मंडळांच्या संगनमताने अब्जावधीचे घोटाळे करणारे लोक मात्र विदेशात पळून जाऊन सुखाने राहताना दिसत आहेत. सामान्य कारणांमुळे आर्थिक संकटात सापडणाऱ्या व्यक्तींना त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारी एखादी व्यवस्थाही उभी राहिली पाहिजे. मुळात जनतेमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी प्रयत्न होण्याची जरूरी आहे. रात्रीच्या अंधारानंतर नव्याने सूर्य उगवत असतो हे चिरंतन सत्य परमेश्वराने आपल्यासमोर नित्य उभे केलेले असतानाही नैराश्याने माणसे ग्रासली जातात आणि परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत गमावून बसून टोकाचे पाऊल उचलतात हे कुठेतरी थांबायलाच हवे.