दुर्गीणी-धारबांदोड्यातील अपघातात 1 ठार

0
1

दुर्गीणी-धारबांदोडा येथे टायर पंक्चर झाल्याने रस्त्यावर उभ्या केलेल्या कंटेनरला टेम्पोची धडक बसून सनित चंद्रा गीताल (25, सध्या रा. बाणास्तारी, मूळ रा. पश्चिम बंगाल) याचा मृत्यू झाला, तर टेम्पोचालक उत्तम गवळी (48, रा. बाणास्तारी) हा अपघातात जखमी झाला. अपघातानंतर टेम्पोमध्ये अडकून पडलेल्या दोघा जणांना फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन बाहेर काढून इस्पितळात दाखल केले.

सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वास्को येथून बेळगाव येथे जाणाऱ्या जीए-06-टी-4195 कंटेनरचा टायर दुर्गीणी येथील जुन्या वाहतूक खात्याच्या कार्यालयाजवळील रस्त्यावर पंक्चर झाला. कंटेनरचालक नरसिंह यादव (वास्को, मूळ उत्तर प्रदेश) याने त्यावेळी कंटेनर रस्त्यावर उभा करून पंक्चर काढण्याचा प्रयत्न केला; पण परिसरात रस्त्यावर अंधार असल्याने पंक्चर काढण्यात अडथळा निर्माण झाला. त्याचवेळी बाणास्तारी येथून बेळगाव येथे जाणारा जीए-05-टी -6987 क्रमांकाचा टेम्पो दुर्गीणी येथे पोहचली. विरुद्ध दिशेने अन्य एक वाहन येत असल्याने टेम्पोचालकाला रस्त्यावर उभ्या कंटेनरचा अंदाज आला नाही. त्यामुळे कंटेनरला टेम्पोची मागून धडक बसली. त्यात टेम्पोमधील दोघेही जण अडकून पडले.

फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन दोन्ही जखमींना बाहेर काढले. 108 रुग्णवाहिकेतून पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. पण अपघातात गंभीर जखमी झालेला सनित चंद्रा गीताल याचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे तपासणीत समोर आले. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आशिष वेळीप यांनी अपघाताचा पंचनामा केला. प्राप्त माहितीनुसार, अपघातात मृत पावलेला सनित चंद्रा गीताल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. गेल्या काही वर्षांपासून तो बाणास्तारी बाजारात भाज्या विक्री करीत होता. तो बेळगाव येथे भाजी खरेदीसाठी जात असतानाच त्याचा अपघातात मृत्यू झाला.