ज्या शेतकर्यांना दुधावरील आधारभूत किंमत मिळालेली नाही त्यांना ती चतुर्थीपर्यंत देऊ असे आश्वासन पशुसंवर्धन खात्याचे मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना दिले. ज्या शेतकर्यांनी त्यासाठीची आवश्यक ती कागदपत्रे दिलेली नाहीत त्यांना आधारभूत किंमत मिळू शकलेली नाही. अशा लोकांनी कागदपत्रे ताबडतोब सादर केल्यास त्यांना चतुर्थीपर्यंत आधारभूत किंमत देऊ, असे आश्वासन त्यांनी विधानसभेत दिले.
यासंबंधीचा प्रश्न विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. गोवा डेअरीला दूध देणार्या शेतकर्यांना दुधाचे दर वाढवून देण्याबाबत सरकार विचार करील काय, असा प्रश्न राणे यांनी विचारला होता. दुभत्या गुरांना लागणारा चारा, गुरांची देखभाल करणार्या कामगारांचा पगार तसेच गुरांचे औषध-पाणी यावरील खर्च वाढल्याने त्यांना दुधाचे दर वाढवून देण्याची गरज असल्याचे राणे यांचे म्हणणे होते. सहकार मंत्री दीपक ढवळीकर यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, दुधावर आधारभूत किंमत देणे हे पशुसंवर्धन खात्याचे काम असल्याने त्या खात्याचे मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आधारभूत किंमत न मिळालेल्या शेतकर्यांना ती चतुर्थीपर्यंत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना सहकारमंत्री दीपक ढवळीकर म्हणाले की, गोवा डेअरीकडून दुधाचा पुरवठा करणार्या शेतकर्यांना त्यांच्या दुधाचे दर वेळोवेळी वाढवून देण्यात येत असतात. गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघटनेकडून तशी माहिती मिळाल्याचे ते म्हणाले. शेतकर्यांना लिटरमागे ९ रु. एवढी आधारभूत किंमत देण्यात येत असते अशी माहितीही यावेळी ढवळीकर यांनी दिली.
दूध उत्पादकांना कमी मदत : राणे
यावेळी बोलताना प्रतापसिंह राणे म्हणाले की, दूध उत्पादकांना खूपच कमी आर्थिक मदत देण्यात येते. सरकारने त्यांना योग्य ती आर्थिक मदत करावी. त्यांना सरकारची भीक नको असल्याचे ते म्हणाले. आधारभूत किमतीसाठी शेतकर्यांना कितीतरी कागदपत्रे आणायला सांगून त्यांची सतावणूक केली जात असल्याचा आरोपही यावेळी राणे यांनी केला. याच कारणांमुळे बर्याच शेतकर्यांना अद्याप आधारभूत किंमत मिळाली नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले.
यावेळी हस्तक्षेप करताना पशुसंवर्धन खात्याचे मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, काही शेतकर्यांना आधारभूत किंमत मिळालेली नाही ही गोष्ट खरी आहे. ज्या शेतकर्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केलेली नाहीत त्यांना ही मदत मिळू शकली नसल्याचे सांगून जे कोण कागदपत्रे सादर करतील त्यांना आधारभूत किंमत थकबाकीसह देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
चार्यासाठी अनुदान द्या : विश्वजित
यावेळी बोलताना विश्वजित राणे यांनी गुरांच्या चार्यावर अनुदान देण्याची मागणी केली. तर आमदार नरेश सावळ म्हणाले की, सरकारने गोवा डेअरीला दुधाचे दर कमी करण्यास सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी लिटरमागे ३ रु. एवढी वाढ केली. मात्र, त्यावर उत्तर देताना गोवा डेअरीने दर वाढवले नसल्याचा खुलासा दीपक ढवळीकर यांनी यावेळी केला. अन्य राज्यातील दुधापेक्षा गोवा डेअरीचे दूध स्वस्त असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.