ऍथलेटिकमध्ये भारताच्या दुती चंद (महिला, १०० मीटर), हिमा दास (महिला, ४०० मीटर) व मोहम्मद अनास याहिया (पुरुष, ४०० मीटर) यांनी काल रविवारी भारताला तीन रौप्यपदके जिंकून दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या दुती हिने ११.३२ सेकंद अशी वेळ नोंदविली. उपांत्य फेरीत तिसरे स्थान मिळविलेल्या दुतीची अंतिम फेरीतील सुरुवात संथ होती. अर्धे अंतर होईपर्यंत ती पाचव्या स्थानी होती. यानंतर वेग घेताना तिने रौप्य जिंकले. ११.३० सेकंद वेळेसह बहारिनच्या इडिडियोंग ओडियोंग हिने सुवर्णपदकावा गवसणी घातली. रौप्यपदकाचा निकाल देण्यासाठी आयोजकांना ‘फोटो फिनिश’चा आधार घ्यावा लागला. चीनची योंगली वेई ०.०१ सेकंदाने तृतीय आली.
दुसरीकडे राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनासने ४५.६९ सेकंद अशी वेळ नोंदवत रुपेरी यश प्राप्त केले. उपांत्य फेरीत अनासने ४५.३० अशी वेळ नोंदविली होती. परंतु, अंतिम फेरीत त्याची वेळ खालावली. कतारच्या अब्दुलेला हसन याने ४४.८९ सेकंदसह सुवर्ण जिंकले. पहिल्या १०० मीटर अंतरापर्यंत हसन व अनास बरोबरीत होते. यानंतर मात्र हसनने वेग पकडला. बहारिनचा खामिस अली केवळ ०.०१ सेकंदाने तिसरा आला. २० वर्षांखालील गटात विश्वविजेतेपद पटकावलेल्या हिमा दास हिने वरिष्ठ स्तरावरही चमक दाखवताना ४०० मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले. आसामच्या दासने राष्ट्रीय विक्रम करताना ५०.७९ अशी वेळ नोंदविली. बहारिनच्या सल्वा इद नासरने ५०.०९ वेळेसह सुवर्ण पटकावले. इलिना मिखेना तिसर्या स्थानी राहिली.