दुचाकी नेल्याने वाद; भावाकडून भावाचा खून

0
4

>> सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीतील घटना

मुरगाव सडा येथील गोवा पुनवर्सन मंडळाच्या वसाहतीमध्ये दोन भावांमध्ये दुचाकीवरून झालेल्या वादातून थोरल्या भावाचा मधल्या भावाने चाकूचे वार करून खून केला. आपली दुचाकी घेऊन गेल्याबद्दल थोरले बंधू श्रीकांत बसवराज किवारी यांनी मधले बंधू मल्लिकार्जुन बसवराज किवारी याला जाब विचारले असता, त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यातून ही खुनाची घटना घडली. श्रीकांत किवारी (51) याचा खून केल्या प्रकरणी मुरगाव पोलिसांनी मल्लिकार्जुन किवारी (45) याला अटक केली आहे.

मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा पुनवर्सन मंडळाच्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे किवारी बंधूंमध्ये गुरुवारी रात्री 10.30 वाजता जोरदार भांडण सुरू झाले. श्रीकांत किवारी यांच्या दोन दुचाकी असून, त्यातील एक दुचाकी मधले बंधू मल्लिकार्जुन हा घेऊन गेला होता. तो परतल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या झटापटीत मल्लिकार्जुन याने श्रीकांत यांच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना त्वरित दाबोळी-चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वादातून सडा येथे एकाचा मृत्यू झाल्याचे मुरगाव पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम पोलिसांना श्रीकांतचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना विचारले असता सर्व हकीकत समोर आली. दोघा भावांमध्ये दुचाकीवरून जोरदार भांडणं झाले. या भांडणात श्रीकांत यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. यानंतर मुरगाव पोलिसांनी त्वरित मल्लिकार्जुन याला ताब्यात घेतले. श्रीकांत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात अला. या खून प्रकरणी मुरगावचे पोलीस निरीक्षक धीरज देविदास अधिक तपास करीत आहेत.