दुचाकीवरील सहप्रवाशालाही यापुढे हेल्मेट सक्ती

0
9

>> वाहतूक पोलीस अधीक्षकांची माहिती; पहिल्या टप्प्यात चालकांत जनजागृती करणार

राज्यात मागील 20 दिवसांत दुचाकीवरील सात सहप्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात दुचाकी चालक आणि सहप्रवाशांमध्ये हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक बोन्स्युएट सिल्वा यांनी आल्तिनो-पणजी येथे पत्रकारांशी बोलताना काल दिली.

मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकीवरील दोघांना हेल्मेट वापरण्याची सक्ती आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करीत नव्हते. पोलिसांनी हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू केल्यानंतर आता दुचाकीचालकांकडून हेल्मेट परिधान केले जात आहे. आता, दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीबाबत माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे. दुचाकीवरील सहप्रवाशाने हेल्मेट परिधान केल्यास अपघातप्रसंगी त्याचे प्राण वाचू शकतात, असे सिल्वा यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशास प्राण गमवावे लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पंचवाडी फोंडा येथे दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला होता. बाळ्ळी केपे येथे एका परराज्यातील वाहनाने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला. वाळपई येथे एका अर्तंगत मार्गावर रंबलर स्ट्रीपजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला. मागील 20 दिवसांत सात दुचाकीवरील सहप्रवाशांच्या मृत्यूची गंभीर नोंद झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर देखील दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार आहे, असेही सिल्वा यांनी सांगितले.