>> पणजीतील घटना; संशयिताची ओळख पटली; शोध सुरू
रविवारी रात्री पणजीतील जुन्या पाटो पुलावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघा तरुणींकडे पाहून एका विकृत इसमाने अश्लील चाळे केले. सदर तरुणींपैकी एका तरुणीने सोशल मीडियावर सदर प्रकाराला वाचा फोडल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी सदर तरुणीने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली. सदर विकृत इसमाची ओळख पटली असून, तो करंझाळेतील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. गोवा पोलिसांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी वेगवेगळी पथके स्थापन केली आहेत.
सदर तरुणीने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टनुसार ती व तिची एक मैत्रीण रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास जुन्या पाटो पुलावरून जात असताना एक तरुण आपल्या दुचाकीवरून आला. तो एका हाताने दुचाकी चालवित होता. आणि दुसऱ्या हाताने अत्यंत अश्लील असे चाळे करीत होता. आमच्याजवळ पोचल्यानंतर त्याने आमच्याकडे पाहत अत्यंत अश्लील व घाणेरडे असे बोलून आमचा छळ सुरू केला. अचानक घडलेल्या या घटनेते आम्ही बिथरून गेल्याने आम्हाला काय करावे तेच कळनासे झाले. मोठ्याने ओरडून कुणाला तरी मदतीला बोलवावे, असा विचारही क्षणभर आमच्या मनात आला; पण तसे करण्याचे धाडस न झाल्याने आम्ही वेगाने आमच्या दुचाकीवरून पुढे निघून गेलो आणि सदर विकृत मनोवृत्तीच्या त्या गुन्हेगाराच्या तावडीतून बचावलो, असे स्पष्ट करतानाच सदर तरुणीने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
भर रस्त्यावरून प्रवास करताना अशा प्रकारचे निंद्य व अश्लाघ्य कृत्य करण्याचे धाडस अशा लोकांना होतेच कसे? असले घाणेरडे कृत्य करून त्यांना कोणता आनंद मिळतो? अशी कृत्ये करण्यापूर्वी त्यांना काही संकोच वाटत नाही का? की मुलींनी घरीच सुरक्षित रहावे हा त्यावरील उपाय आहे? असे कित्येक प्रश्न सदर तरुणीने आपल्या पोस्टद्वारे विचारले आहेत.