२ ऑक्टोबरपासून हेल्मेट सक्ती
राज्यातील वाढत्या रस्ता अपघातांचा विचार केल्यास दुचाकी स्वारांचे व मागे बसलेल्यांचे अपघातात बळी गेलेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्यांचे रुंदीकरण करून दुचाकींना ३ मीटर रुंदीची वेगळी लेन ठेवण्याचे सरकाने ठरविले आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या वेळी दिली.
येस बँकेच्या सहकार्याने वाहतूक खात्याने मिरामार येथील साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या सभागृहात रस्ता सुरक्षा सप्ताहाचा आरंभ सोहळा आयोजित केला होता. दुचाकींना होणार्या अपघातात युवकांचेच अधिक बळी जातात, ही चिंतेची बाब असल्याचे ढवळीकर म्हणाले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळेच अपघात घडतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षेचे महत्व प्रत्येकाला पटविण्याचे काम केल्यास बर्याच प्रमाणात जागृती होऊन अपघातांचे प्रमाण घटू शकेल, असे ते म्हणाले.
२ ऑक्टोबरपासून हेल्मेट सक्ती
सरकारने २ ऑक्टोबरपासून हेल्मेट सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करून वाहन चालकांमध्ये केलेल्या जागृतीला अधिक महत्व आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनातही वाहतूकमंत्र्यांनी सर्व आमदारांचे सहकार्य असल्यास नियमानुसार मागे बसलेल्यांनाही हेल्मेट सक्ती निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने यापूर्वी या विषयावर घोषणा केल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात राज्यात या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही.
येस बँकेच्या ज्येष्ठ अध्यक्षा नमिता विकास यानी उद्योग समुहांची सामाजिक जबाबदारी म्हणून या क्षेत्रात योगदान देण्याचे जाहीर केले. गोव्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या बाबतीत जागृती करणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.