दुखरं सुख

0
161
  •  पौर्णिमा केरकर

मला तर पार नदीच्या काठावर स्थित असलेली ती वास्तू साहित्यिक-सांस्कृतिक स्पंदनांच्या अनुभूतीची संवेदना देते. पार नदी साक्षीला आहे तुमच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी… ते तरंग घेऊन तिचा प्रवास चालू आहे.

धो-धो पाऊस कोसळत होता… हवेत गारवा भरून राहिलेला… या गारव्याचा
गारठा सर्वांगावर शहारे उमटवत होता. अंग झिम्माड ओलेचिंब… गुरांच्या गळ्यातील घंटानाद… दुदिन सड्यावरील त्या छोट्या टेकडीआड हळूहळू अस्ताला चाललेला तो परतीचा सूर्य… विविध विभ्रमांनी विनटलेले आभाळ… पानापानांवरून टपटपणार्‍या थेंबांचा तो नाद… विजेच्या तारेवरच्या थेंबातील इंद्रधनुषी रंग… आणि मातीशी समरस होणारे पाऊसथेंब… हे वेड लावणारे दृश्य कितीही वेळा अनुभवले तरी पुन्हा पुन्हा डोळ्यांत साठवून ठेवावेसे वाटायचे… मला खूप आवडायचा पाऊस. घरासमोरून वाहणारी पार नदी, तिच्या काठावरील माड, संथ जलाशयात त्यांचे पडणारे प्रतिबिंब मी तासन्‌तास डोळ्यांत साठवून ठेवायचो… आवडायची मला पाऊसफुले… थेंबाथेंबांनी जलाशयात नक्षी रेखाटत सर्वदूरपर्यंत पसरलेली… मी भान विसरायचो… भर पावसात काठावर बसून आकंठ भिजायचो.

गुरांना दुदिन सड्यावर चरायला घेऊन जातानाही हाच पाऊस सोबत असायचा. थेंबांची अखंड टपटप मातीत आणि माझ्या मनातही. कवी म्हणून ओळख नाही तुमची साहित्यिक जगताला… तरीही तुम्ही आतून आतून… मनातून कवीच होता! खरंतर तुमचं आणि माझं नातं कोणतं? मला नाही त्याला शब्दबद्ध करता येणार.

पण तुमच्यासारखी माणसे खूपच कमी आहेत जी वाचतात आपल्यापेक्षा अनुभवाने, वयाने कमी असलेल्या लिहित्या हातांचे शब्द… प्रोत्साहन देतात नवीनच अभिव्यक्त होऊ पाहणार्‍या युवामनांना! …मला वाटते हेच कारण असावे तुमच्याविषयी माझ्या मनात अढळ स्थान निर्माण होण्याचे. तुमचे नाव लहानपणी कानांवर पडले होतेच. घरात साहित्यिक वातावरण होते. गोमंतकातील नामांकित साहित्यिकांची नावे वडिलांच्या, भावाच्या चर्चेमधून ऐकू यायची. नंतर सासरी तर राजेंद्रच्या बोलण्यातून तुमच्याविषयी त्याची असलेली आत्मीयता, आदर अधिकच दृढ होत गेला. ‘गुलमोहर’ त्यात प्रामुख्याने असायचा.

पुढे तर साहित्य हाच महत्त्वाचा विषय ठरल्याने ‘कथा’ या प्रकारचा अभ्यास करताना ‘जयराम कामत’ हे नाव सवयीचेच झाले. ‘दुखरं सुख’ मुलांपर्यंत पोहोचविताना तुमची वेगळी ओळख झाली. तुम्हीही आला होता आमच्या विनंतीला मान देऊन. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यासमोर बा. भ. बोरकर उलगडवून दाखविला होता. तुमची ओघवती सहजसुंदर कथनशैली… मंत्रमुग्ध केलं होतं तुम्ही त्यावेळी सारं वातावरण! आपले थोरले बंधू बोरकरांचे जावई. या अनुबंधातून आपले घर साहित्यिक जगतातील वंदनीय व्यक्तिमत्त्वांशी जोडले गेले. यासंदर्भातील आठवणींचे भांडार तुमच्याकडे होते. तुम्ही बोलायचा यावर भरभरून. इथेच तुम्हाला सहवास लाभला त्यांचा. तुम्ही तो माझ्यासारख्यांना आठवणीतून उलगडूनही दाखवला. तुमच्या घरी, दुदिन सड्यावरील परिसरात बोरकर, पाडगावकर, पु.ल. व इतर अनेक दिग्गज साहित्यिक येऊन गेले. त्यांच्या सहवासातील आमची माणसे श्रीराम कामत, जयराम कामत यांना मी ओळखते याचा मला अभिमान वाटला.

तुमच्याकडे सगळेच होते, पण ते कधीच तुम्ही ‘मिरविले’ नाही. जीवन, शिक्षण, नोकरी, आरोग्य… एकूणच स्थैर्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष याच्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत. तो तर तुमच्याच तोंडून ऐकायचा. संघर्षाला खमक्या सहजतेने कसे भिडायचे, तक्रारी करत न बसता जे पटले ते स्वीकारायचे, अन्यथा तेवढ्याच करारी बाण्याने ते नाकारायचे. भलेही त्याचे परिणाम कोणतेही होवोत. या तर्‍हेचे अनेक प्रयोग तुम्ही केले. राजकारण, समाजकारण करण्याची तुमची तीव्र इच्छा. त्यात सहभागी झाल्यावर सहवासातील माणसांचे तुम्हाला दिसलेले चेहरे, त्यामागचा खोटारडेपणा अनुभवल्यावर मुखवटे चढवून वावरणार्‍या माणसांची मनस्वी चीड तुम्हाला आली. तुम्ही नाकारले अशा वाटेने जाण्याचे! तुमचा पिंडच मुळी साहित्यिकाचा! तिथे जपली जाते माणुसकी, नाती, संस्कार, संस्कृती आणि माती.

तुमची धडपड, तत्त्वनिष्ठा याचसाठी तर होती! समाजमनाच्या वेदना जाणण्यासाठी हृदयातील संवेदना जागृत असणे गरजेचे होते. तुम्ही तर याच ध्येयाने प्रेरित होता. जग निरामय असावे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जिव्हाळ्याने एकमेकांना बांधिल असावी. नाती फक्त दिखाव्यासाठी नाहीत तर ती जगावी लागतात, हे तुम्ही तुमच्या वागण्यातून, आचरणातून कुटुंबातील इतरांपर्यंत पोहोचविले. तुमचे हे फक्त विचार नव्हते तर ते जगण्याचे तत्त्व होते. त्यानुसारच तुम्ही जगलात. शिस्त, नीटनेटकेपणा, वेळेचे महत्त्व, सचोटी, तत्त्वनिष्ठा, प्रामाणिकपणा याला वेढून असलेला करारी बाणा, दूरदृष्टी तुमच्याकडे होती. साधं सरळ आयुष्य तुम्ही अनेक चढ-उतारांवर मात करीत जगलात. हे नुसतंच जगायचं म्हणून जगणं नव्हतं तर ते समंजस जगणं होतं. त्यात संस्कार, संस्कृती, परंपरेतील चांगुलपणाची सोबत होती. तुम्ही बांधून ठेवलंत तुमच्या कुटुंबाला आणि कुटुंबाच्या सहवासात येणार्‍या आमच्यासारख्यांना. यासाठी सोबत दिली तुम्हाला तुमच्या सहचारिणी कालिंदी यांनी. तुम्हाला तुमच्या सहजीवनाचा अभिमानही होताच. त्याला अहंकार कधी शिवला नाही. हसतमुख आदरातिथ्य हे घराचे ब्रीद त्यांनीच तर निष्ठेने संभाळले.

तुमच्या घरासमोरून वाहणारी पार नदी… तिच्यात आणि कालिंदी यांच्यात मला बरेच साम्य आढळते. खूप वादळे आली-गेली असतीलही, पण मनाचा तोल ढळला नसेल. चांगले-वाईट यांना सामावून घेतच तर तिचा प्रवास प्रवाही आहे… तो डोह अथांग, ठाव लागत नाही मनातळाचा… तरीही ती स्थिरता नदीकाठची संयत सहनशीलता… बिंब-प्रतिबिंबाची नक्षी डोळ्यांत सामावून घेतच जीवनाचे सौंदर्य न्याहाळत तो प्रवाह अविरत सुरू आहे. सोपं कधीच नसतं सर्जकतेचे वेड घेऊन जगणार्‍या बेधुंद वार्‍याला पदरात बांधून ठेवणं. तिथं समर्पणच हवं. ते समर्पण म्हणजे कालिंदी. तिला सामावून घेणं कळतं… ‘स्व’ला बाजूला सारीत जीवन जगण्याची कला तिनं मुळापासून शिकून घेतलेली असते, म्हणून ती टिकवून ठेवू शकली घराचे घरपण… दीर, जावा, मुलं, नातवंडं, सुना हे अतूट बंध!
तुम्हाला याची पुरेपूर जाणीव होती. तुमचे हृदय त्यासाठी नेहमीच कृतज्ञ राहिले. तुमचा व्यवसाय असो की लिखाण, कुटुंब असो अथवा समाज, तुम्ही यासाठी नेहमीच सजग राहिलात. सामाजिक बांधिलकी कायम जतन केलीत. अतुल, उदय, अरुण या तुमच्या मुलांसमोरही तुम्ही तोच आदर्श ठेवलात. तुम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कथाकार साहित्यिक! पण या गोष्टी मिरवायच्या असतात असे तुम्ही कधी मानलेच नाही. किंबहुना व्यासपीठ, साहित्यसंमेलने, पुरस्कार, साहित्यिकांच्या तथाकथित मांदियाळीपासून तुम्ही तसे अलिप्तच राहिलात. ही अलिप्तता सर्जक सजगतेचीच होती. वाचनात खंड पडला नव्हता. लिहायचे म्हणून लिहायचे हे तुम्हाला कधीच पटले नाही. जे पटले नाही ते तुम्ही केले नाही. आजन्म वेळेचे काटेकोर पालन तुम्ही केलंत. ती चाकोरी नव्हती, तर संस्कार, आदर्शत्वाची शिस्त होती. संस्काराची मूल्ये मुलांमध्ये रुजविणे तुम्ही विसरला नाही. घराचे घरपण त्यामुळेच टिकून आहे. जीवनाला अर्थ देणे हे साहित्यिकाचे काम. त्यासाठी एकांताची सोबत करावी लागते. भरल्या कुटुंबात एकांताची सर्जकता सापडणे कठीण असते खरी, पण तुम्ही याला अपवाद ठरलात. या एकांताने तुम्हाला भावगर्भी, अर्थगर्भ, तत्त्वगर्भ बनविले म्हणून आयुष्याच्या उत्तरार्धात एकटेपणाचा वेढा तुम्हाला पडला नाही. तुमची मुलं तुमच्याशी जोडली गेली आहेत. ते वरवरचे नाही. कर्तव्य आणि भावना यांची उत्कटता तिथे आहे. जीवन समजून घेण्यासाठी ही उत्कटता गरजेची असते. जीवनाकडे पाहण्याचे तत्त्वज्ञान ज्यांना उमजलेले असते त्यांना कोलाहलातही सर्जक एकांत गवसतो. जीवन त्यांनाच तर कळते!!

कृतार्थ जीवन तुम्ही जगलात. आखून-रेखून, समजून-उमजून जगलात. श्रीराम-जयराम या जोडीचे मोठे योगदान आहे गोमंतकीय साहित्यजगताला. नाही विसरता येणार! मला तर पार नदीच्या काठावर स्थित असलेली ही वास्तू साहित्यिक-सांस्कृतिक स्पंदनांच्या अनुभूतीची संवेदना देते. पार नदी साक्षीला आहे तुमच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी… ते तरंग घेऊन तिचा प्रवास चालू आहे. तुम्ही-आम्ही असो-नसो… ती तर निरंतर वाहणार… सांगणार तुमचीच कहाणी येणार्‍या प्रत्येक पिढीला. नदीवरील पुलाने गोवा मुक्तिसंग्रामात स्वतःला सामावून घेतले होते. याच मातीत बाळा राया मापारीच्या रूपाने पहिला हुतात्मा अमर झाला. या इथेच नदीकाठावर गोमंतकीय समाजजीवनाचा आपल्या सशक्त, अर्थगर्भ कथांमधून वेध घेणार्‍या क्रांतिदूत जयराम कामतांचा जन्म झाला. तुम्ही मोठेपणा या शब्दाचा अर्थ जगण्यातून उलगडवलात! या इथे मी ‘तुम्ही नाहीत आज आमच्यामध्ये’ हे मनाला समजावीत आहे. मनाला ते पटतं तरीही आठवणींनी डोळे भरून येतात. खूप उशिराने का असेना मी जोडली गेले होते तुमच्या घराशी. येणे-जाणे नव्हते वारंवार, तरीही अव्यक्त बंध हृदयाला सांगायचे- त्या तिथं पावसाच्या थेंबफुलांची नक्षीवक्षी
धारण करणारी मिस्कील हसणारी,
वरून कडक भासणारी,
भरभरून मोजक्याच माणसांशी
मनमोकळा संवाद साधणारी…
तुम्ही जीवनाला सहजतेने आपलेसे केलात, त्याच सहजतेने मृत्यूलाही सामोरे गेलात. ही नितळता मोठी प्रेरणा आहे. देहदान केलंत. सर्वांना ऋणात ठेवूनच तर तुम्ही अनंताचे प्रवासी झालात. देहाने तुम्ही नाही, हे दुःख आहेच. …पण मी तुमच्याशी जोडले गेले होते या सुखाची अनुभूती प्रेरणा देते… हे दुखरे सुख हृदयात कायम गुलमोहरी संवेदनांची प्रचिती देणारे असेल… विनम्र आदरांजली!!