>> 200 व्यापाऱ्यांची म्हापसा पालिकेवर धडक; आश्वासनानंतर माघार
म्हापसा नगरपालिकेने दुकानांचे भाडे वाढवल्याने संतप्त झालेल्या सुमारे 200 व्यापाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चाची दखल घेत स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी भाडेवाढ मागे घेण्याचे आश्वासन दिले. पालिका मंडळाच्या बैठकीत या विषयावर तोडगा काढू असे आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी व्यापाऱ्यांनी माघार घेतली.
गेल्या 29 डिसेंबर रोजी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत दुकानांच्या भाडेवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. पीडब्ल्यूडीच्या नवीन लीज दरानुसार प्रति चौरस मीटर 296 रुपये भाडे पालिकेने मंजूर केले होते. यापूर्वी हा दर 152 रुपये प्रति चौरस मीटर होता. त्यामुळे पालिकेच्या मालकीच्या कायमस्वरूपी दुकानांचे भाडे जवळपास दुपटीने (96 टक्के) वाढले होते. म्हापसा व्यापारी संघटनेने भाडेवाढीला तीव्र विरोध करत 4 जानेवारीला म्हापसा नगरपालिकेवर धडक दिली होती. त्याचवेळी नगराध्यक्षांना भाडेवाढ मागे घेण्यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली होती; मात्र पालिकेने यावर कोणतीही भूमिका न घेतल्याने काल सकाळी संतप्त व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा पालिकेवर धडक दिली.
सुमारे 200 व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. सकाळी 10 वाजता व्यापारी नगरपालिकेत पोहोचले असता नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी कार्यालयात हजर होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले.