दीपस्तंभ

0
31

भारतीय संविधानाचे रक्षक आणि नागरी हक्क व व्यक्तिस्वातंत्र्याचे ठाम पुरस्कर्ते पद्मविभूषण फली एस. नरीमन यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. भारतातील पारशी समाज संख्येने छोटा जरी असला, तरी उद्योगापासून लष्करापर्यंत आणि शास्त्रीय संशोधनापासून न्यायपालिकेपर्यंत त्या व्यक्तींचे योगदान नेहमीच फार मोठे राहिले आहे. केवळ विधिज्ञांचाच विचार केला, तरीदेखील नानी पालखीवाला, सोली सोराबजी, फली नरीमन ही नावे केवळ त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या उत्तुंगतेमुळे घरोघरी लक्षात राहिली आहेत. फली नरीमन यांचा जन्म खरे म्हणजे ब्रह्मदेशात रंगूनला झाला. त्यांचे पूर्वज मुळात केरळमधील कालिकातचे रहिवासी होते, परंतु घरातील वादामुळे त्यांचे खापर खापर पणजोबा नावेत बसून निघाले ते थेट ब्रह्मदेशच्या किनाऱ्याला लागले. तेथे थिबा राजाच्या मदतीने त्यांनी शून्यातून विश्व उभे केले होते. परंतु नंतरच्या काळात अमेरिकेच्या पर्ल हार्बरवरील जपानच्या हल्ल्यानंतर जेव्हा महायुद्धाला तोंड फुटले आणि जपानची सेना ब्रह्मदेश काबीज करायला आली तेव्हा नरिमन कुटुंबाला कधी बैलगाडीतून, कधी चालत, कधी डोलीतून असा तब्बल 21 दिवसांचा साहसी प्रवास करून भारतात आश्रयाला यावे लागले. शरणार्थी म्हणून भारतात यावे लागलेल्या फली नरीमन यांनी पुढे आपल्या विधिज्ञाच्या कारकीर्दीत भारतीय संविधानाची प्रतिष्ठा आणि आब अबाधित राखण्यासाठी जे विविधांगी योगदान दिले आहे ते निव्वळ अतुलनीय आहे. सर जमशेदजी कांगा यांच्यासारख्या त्या काळातील नामांकित विधिज्ञाच्या हाताखाली फली यांना उमेदवारी करण्याची संधी मिळाली होती. सुरुवातीच्या काळात मुंबई उच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर त्यांनी दिल्लीत बस्तान हलवले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू केली. इंदिरा गांधींनी त्यांची देशाच्या अतिरिक्त महाधिवक्तापदी नियुक्ती केली होती, परंतु नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करीत इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लागू केली, तेव्हा एका ओळीचे पत्र लिहून फली नरीमन यांनी ते पद त्यागले. त्यांच्या त्या पदत्यागाचा नेहमीच गौरवाने उल्लेख होतो, परंतु आपण जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्याचे तरंगही उठले नव्हते, असे फली नरीमन यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. भली भली मंडळी सत्ताधीशांपुढे सरपटताना त्यांनी तेव्हा पाहिली. परंतु नरीमन यांचा हा बाणेदारपणा केवळ एका विचारधारेच्या विरोधात नव्हता. पुढे गुजरातमध्ये नर्मदा धरणासंदर्भात गुजरात सरकारने त्यांना वकीलपत्र दिले, तेव्हा राज्यात ख्रिस्ती समुदायावर झालेल्या हिंसक हल्ल्यांच्या निषेधार्थ त्यांनी ते परत करून आपल्या बाणेदारपणाचे ओजस्वी दर्शन घडवले होते. देशाच्या न्यायिक इतिहासातील असंख्य महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये नरीमन यांचे युक्तिवाद संविधान, नागरी स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या संरक्षणासाठी उपकारक ठरले. संविधानामध्ये मनमानीपणे बदल करण्याचा हक्क सरकारला पोहोचत नसल्याचे ठणकावणाऱ्या आणि त्यातील मूलभूत नागरी अधिकारांचे संरक्षण करणाऱ्या केशवानंद भारती निवाड्याचा पाया ठरलेल्या गोलकनाथ वि. पंजाब सरकार खटल्यामध्ये नानी पालखीवालांच्या हाताखाली त्यांचे सहायक म्हणून नरीमन उभे होते. खासगी शिक्षणसंस्थांची स्वायत्तता राखणारा टीएए पै खटला असो, न्यायिक नियुक्त्यांमध्ये पुढे कोलेजियम व्यवस्था उभी करण्यास कारण ठरलेला एस. पी. गुप्ता खटला असो, वृत्तपत्रस्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करणारा इंडियन एक्स्प्रेसचा खटला असो, अशा अनेक खटल्यांमध्ये त्यांनी केलेले युक्तिवाद ही वकिलांच्या नव्या पिढ्यांसाठी गीता बनून राहिली आहे. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर त्यांनी युनियन कार्बाईडची बाजू लढवली, परंतु नंतर जनतेची त्याबद्दल माफीही मागितली. वायूपीडितांना न्यायालयाबाहेर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी नंतरच्या काळात प्रयत्न करून आपल्या चुकीचे परिमार्जन केले. पुत्र रोहिंग्टन नरीमन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पित्याचा वारसा पुढे चालवला. आपल्या ‘बिफोर मेमरी फेड्स’ या आत्मचरित्रात फली नरीमन यांनी वकिलांसाठी जी मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत, ती खरोखरीच प्रत्येक वकिलाने अनुसरावीत अशी आहेत. भारतीय संविधानावरील त्यांचे ‘यू मस्ट नो युवर कॉन्स्टिट्यूशन’ हे अत्यंत मौलिक पुस्तक तर प्रत्येक भारतीय नागरिकाने जवळ ठेवावे असे आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आग्रही होते. नुकत्याच आलेल्या निवडणूक रोखे निवाड्यानंतर त्यांनी प्रशांत भूषण यांना लिहिलेले पत्र त्याची साक्ष देते. परवा रात्रीदेखील ते घटनापीठाला सादर करण्यासाठी मसुदा लिहीत बसले होते. नागरी स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेला असा लढवय्या विरळाच!