दीपश्री सावंतला आता पणजी पोलिसांकडून अटक

0
9

>> 10 लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण; 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश

येथील पणजी पोलिसांनी सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुमारे 10.35 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संशयित दीपश्री प्रशांत सावंत गावस हिला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला.
संशयित आरोपी दीपश्री सावंत हिने राज्य सरकारच्या लेखा संचालनालयात अकाऊंटंटची नोकरी देण्याचे आमिष दाखवून नादोड्यातील एका युवकाला 10.35 लाखांना गंडा घातला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित दीपश्री सावंत हिला 28 नोव्हेंबरला अटक केली.

संशयित दीपश्री सावंत हिने वर्ष 2018 मध्ये सरकारी नोकरी देण्यासाठी 10.35 लाख रुपये घेतले आहेत. त्या युवकाला संशयित महिलेने नोकरी दिली नाही किंवा घेतलेले पैसे परत केले नाहीत.
दरम्यान, संशयित आरोपी दीपश्री सावंत हिने पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. तिच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी सोमवारी 2 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

सोने कर्ज तारणाविषयी महत्त्वाचे निर्देश
राज्यातील सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयित आरोपी दीपश्री सावंत हिने तारण ठेवलेले सोन्याचे दागिने परत केले जाणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात संबंधित खासगी वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीने मान्य केले आहे. गोवा खंडपीठाने त्या खासगी वित्त कंपनीला दीपश्रीने घेतलेल्या कर्जाचे हप्ते स्वीकारण्याची परवानगी दिली आहे.