>> २७ पक्ष सदस्यांचा अविश्वास ठराव सादर
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या नियमाप्रमाणे २०१७ मध्ये बैठक घेण्यात आली होती. ही बैठक वगळता सहा वर्षांपासून एकही सर्वसाधारण सभा झाली नाही. त्यानंतर केंद्रीय समितीला दोन वर्षे मुदतवाढ दिली होती ती सुद्धा २०१९ मध्ये संपली त्यामुळे दीपक ढवळीकर हे बेकायदा मगो पक्षाचे अध्यक्षपद भूषवित असल्याचा आरोप करत पक्षाच्या २७ सदस्यांनी दीपक ढवळीकर यांच्याविरुद्ध बंड केले आहे. या सदस्यांनी ढवळीकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून दीपक ढवळीकर यांची उचलबांगडी करावी, अशी पक्षाच्या समितीकडे मागणी केली आहे.
केंद्रीय समितीने गेल्या काही वर्षांत अनेक गैरप्रकार केले आहेत, त्याला विरोध करूनही बेकायदा अध्यक्षपद दीपक ढवळीकर यांनी भूषविण्यात धन्यता मानली. ढवळीकर यांनी पक्षाच्या निधीचा गैरवापर केला असून, त्यांनी समितीकडून मंजुरीही घेतली नाही. त्यामुळे त्यांची या पदावरून उचलबांगडी करावी, असे अविश्वास ठराव दाखल करताना सदस्यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या निधीचा गैरवापर
दरवर्षी होणारी सर्वसाधारण सभा घेण्यास ढवळीकर टाळाटाळ करीत होते. त्यांनी सरचिटणीस व खजिनदारांनी तयार केलेले अहवाल सभेत मांडलेले नाहीत. त्यामुळे पक्षाचा निधीचा गैरवापर झाला असल्याचा संशयही या सदस्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या सदस्यांनी समितीसमोर ठेवलेले विषय कधीच चर्चेला घेण्यात आले नाहीत. राज्यात पर्रीकर सरकार स्थापन करताना मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पाठिंबा दिला होता, त्यावेळी त्यांनी समितीला विश्वासात घेतले नाही. भाजपला पाठिंबा देतानाही समितीकडून मंजुरी घेण्यात आल्याची खोटी माहिती देण्यात आली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही अध्यक्ष ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढविताना केंद्रीय समितीची संमती घेतली नाही. स्वतःच अध्यक्ष असल्याने त्यांनी हा एकतर्फी निर्णय घेतला, असे या ठरावाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ढवळीकर यांनी केवळ वैयक्तिक रागापायी आपल्या मर्जीनुसार समितीचे माजी सरचिटणीस लवू मामलेदार यांना पक्षातून काढून टाकले. यापूर्वी त्यांनी पांडुरंग राऊत, दशरथ सावंत तसेच जयदीप शिरोडकर यांनाही पक्षातून काढण्यात आलेले आहे. मगो पक्षावर ढवळीकर हुकूमशाही चालवत आहेत. हा पक्ष त्यांची स्वतःची संस्था आहे, अशाप्रकारे वागत आहेत. पक्ष मजबूत करण्याऐवजी ते पदाचा गैरवापर करून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. त्यामुळे ते अध्यक्षपदाला पात्र नाहीत. म्हणून पक्षाने विशेष सर्वसाधारण सभा बोलावावी. सध्याची समिती बेकायदा असून त्याला अध्यक्ष जबाबदार असल्याचा दावा २७ पक्षसदस्यांनी पत्रात केला आहे.
यांनी केल्या सह्या
ढवळीकर यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणणार्यांमध्ये राजेंद्र नाईक, अशोक नाईक, नीलेश पटेकर, प्रभाकर गावस, रोहिदास बोरकर, मंदार नाईक, विजय नागवेकर, प्रभाकर मळीक, सोनू नाईक, उदय नाईक, गजानन सावंत, अरूण आजगावकर, जफर शेख, सखाराम गावकर, शिवानंद धावणकर, अक्षय साळगावकर, शुभम तोरस्कर, गुरूदास नाईक, अजय मिरिंगकर, संदेश नार्वेकर, सूरज नाईक, भारत नाईक, नागराज नाईक, दत्ता नाईक यांचा समावेश असून या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी या अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत.
अविश्वास ठराव बोगस ः ढवळीकर
काही असंतुष्ट लोकांकडून पक्षाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न चालविले जात आहेत. आपल्यावर आणलेला अविश्वास ठराव हा बोगस असल्याची प्रतिक्रिया मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली आहे.
अविश्वास ठराव आणलेल्यांनी आधी आपला चेहरा लोकांसमोर उघड करावा, असे आव्हानही ढवळीकर यांनी दिले आहे. मगो पक्षाला जनमानसात मोठे स्थान मिळत आहे. मगो पक्ष हा भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष आहे, बहुजन समाजाचा कष्टकरी समाजाचा पक्ष आहे. मगो पक्षाला गोमंतकीयांच्या मनात आणि ह्रदयात स्थान आहे, मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना गोंधळ माजवून पक्ष कार्यकर्ते व मतदारांत संभ्रम निर्माण करण्याची सवय असून त्याचाच हा एक भाग असल्याचे ढवळीकर म्हणाले. या ठरावावर ज्या सह्या केल्या आहेत, त्या एकाच पेनने केल्या आहेत. अविश्वास ठराव आणला आहे, तर मग प्रसारमाध्यमांसमोर आपला चेहरा या लोकांनी का उघड केला नाही, असा सवाल करून ज्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे, असे लोकच ही कृत्ये करीत असल्याचा आरोपही ढवळीकर यांनी केला आहे. मगो पक्षाचे कार्य सुरळीत चालू असून कोणतीही तक्रार नाही. पक्षाचे लेखा परीक्षणही करण्यात आले आहे आणि येत्या जानेवारीच्या अखेरीस पक्षाची आमसभा घेण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.