दीन दयाळ स्वास्थ्य योजनेच्या कंपनी निवडीसाठी निविदा जारी

0
70

आरोग्य संचालनालयाने दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली आरोग्य विमा कंपनी निवडण्यासाठी निविदा जारी केली आहे. विमा कंपन्यांना निविदा व कागदपत्रे सादर करण्यासाठी २७ मार्च २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ पासून दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना राबविली जात आहे. या आरोग्य विमा योजनेचे कंत्राट युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीने मिळविले आहे. या योजनेखाली सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जात आहे. तीन आणि त्यापेक्षा कमी संख्येच्या कुटुंबाला वार्षिक २.५ लाख रुपये आणि चार आणि त्यापेक्षा जास्त संख्येच्या कुटुंबाला वार्षिक ४ लाख रुपये आरोग्य विमा कवच उपलब्ध केला जात आहे. आरोग्य विमा सेवा देणार्‍या कंपनीची एक वर्षाची मुदत पूर्ण झाली आहे. तसेच या कंपनीला मार्च २०१८ पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

१ सप्टेंबर २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१७ या काळात २,२५,८७८ कुंटुबियांनी या योजनेसाठी नोंदणी केली. ७ लाख ९५६१३ नागरिकांना आरोग्य विमा कवच उपलब्ध करण्यात आले आहे. त्यातील १०,३९५ विमाधारकांना १२.३९२ उपचारांसाठी योजनेखाली साहाय्य करण्यात आले आहे. या आरोग्य विमा योजनेखाली ४४७ आजारांवर उपचार करण्याची सोय आहे. या विमा योजनेखाली ४७ सरकारी आणि खासगी हॉस्पिटलांमध्ये वैद्यकीय उपचार घेतले जाऊ शकतात. तसेच परराज्यातील संलग्न हॉस्पिटलमध्ये सुध्दा उपचार घेतले जाऊ शकतात. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेमुळे आरोग्य विमा योजनेमध्ये आणखी सुधारणा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सरकारने या योजनेखाली आत्तापर्यत १०८ कोटी रूपये हप्त्यांच्या स्वरूपात विमा कंपनीला भरले आहेत. तसेच ८.५ कोटी रूपये हप्त्यांच्या स्वरूपात भरण्यात येणार आहेत. या विमा कंपनीच्या मुदतीत आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी आणखी १७ कोटी रूपये भरले जाण्याची शक्यता आहे. या विमा कंपनीकडून दाव्याच्या स्वरूपात विविध हॉस्पिटलना आत्तापर्यत ६० कोटी रूपयांचे वितरण केले आहे. सुमारे हॉस्पिटलांचे सुमारे १२ कोटी रूपयांचे दावे प्रलंबित आहेत. या आरोग्य विमा योजनेतून विमा कंपनीला पंधरा ते वीस कोटी रूपयांचा नफा होण्याची शक्यता आहे. नवीन निविदा स्वीकारण्याची प्रक्रिया मे महिन्याअखेरपूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली