दीड महिन्यानंतर सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १ हजारांच्या खाली

0
13

>> सक्रिय रुग्णसंख्या ८०७; २४ तासांत नवे ९५ रुग्ण; ३ कोरोना बळींची नोंद; ५१२ जण कोरोनामुक्त

तब्बल दीड महिन्यानंतर राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १ हजारांच्या खाली आली. ३१ डिसेंबर २०२१ रोजी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजारांच्या वर गेली होती. त्यानंतर सातत्याने कोरोना रुग्ण वाढत होते. आता तिसरी लाट ओसरू लागल्यानंतर राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ८०७ एवढी झाली आहे.

राज्यात नाताळ सण आणि नववर्ष स्वागताचे कार्यक्रम झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढायला लागली होती. या काळात राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. तसेच नाताळ सणामुळे नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी वर्दळ वाढली होती. परिणामी २८ डिसेंबरनंतर राज्यात हळूहळू रुग्णसंख्येत वाढ व्हायला लागली होती. २८ डिसेंबरला ११२ रुग्ण, २९ डिसेंबरला १७० रुग्ण, ३० डिसेंबरला २५६ रुग्ण सापडले होते. ३१ डिसेंबरला राज्यात २१२ रुग्ण सापडले आणि सक्रिय कोरोना १ हजारांच्या (१०४६) वर गेली होती. त्यानंतर नव्या वर्षांत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढताच राहिला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट ओसरायला सुरुवात झाली. परिणामी आता नवे कोरोनाबाधित कमी आढळत आहेत, तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. काल दिवसभरात ५१२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या १ हजारांच्या खाली आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के एवढे आहे.

दुसरीकडे, राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३ कोरोना बळींची नोंद झाली असून, नवीन ९५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासांत कोविड स्वॅबच्या चाचण्यांमध्ये घट झाली असून, २३२८ स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील ९५ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.०८ टक्के एवढे आहे, तर राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३७८८ एवढी झाली आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत ५ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले आहे. इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोनाबाधिताची संख्या कमी होत आहे. काल बर्‍या झालेल्या २ जणांना इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ४४ हजार ६०३ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील २ लाख ४० हजार ००८ नागरिक बरे झाले आहेत.