दिशाभूल नको

0
17

वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये मद्यधुंद बसचालकामुळे झालेल्या भीषण अपघातात चौघा गरीब कामगारांचा बळी गेला, तर काही गंभीर जखमी झाले. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे ह्या अपघातानंतर सदर बसचालकाला खरा गुन्हेगार मानण्याऐवजी रस्त्याकडेला कामगारांसाठी तात्पुरत्या झोपड्या उभारणाऱ्या कंत्राटदाराला व उपकंत्राटदारालाच अपघातासाठी जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो आहे. त्यांनी म्हणे ह्या झोपड्या धोकादायक ठिकाणी उभारल्या होत्या. पण त्या रस्त्याच्या बाजूलाच उभारलेल्या होत्या ना? रस्त्याच्या मधोमध तर नव्हत्या? वळण घेताना बस एवढी रस्त्याबाहेर जाऊन झोपड्यांत घुसली, त्याला त्या झोपड्या जबाबदार की मद्यप्राशन करून बस चालवणारा चालक? उघड आहे की येथे बसमालकाचे हितसंबंध राजकारण्यांशी गुंतलेले असू शकतात. त्यामुळे अपघाताचा दोष त्या चालकाला देण्याऐवजी झोपड्या चुकीच्या ठिकाणी होत्या हेच अपघाताचे खरे कारण ठरवण्याचा खटाटोप होऊ शकतो. वेर्णा औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या कामांवर काम करणाऱ्या कामगारांच्या ह्या तात्पुरत्या झोपड्या चुकीच्या ठिकाणी उभारलेल्या होत्या असे जरी मानले तरी त्याकडे ह्या औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापन करणाऱ्यांचे वा ही विकासकामे करून घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष कसे गेले नव्हते? संबंधित कंत्राटदाराला त्या तेथून हटवण्याचे निर्देश का दिले गेले नव्हते? ह्या झोपड्या गेले किमान अडीच महिने तेथे होत्या. मग त्याकडे कानाडोळा करणारेही तितकेच दोषी ठरतात. दिवसभर घाम गाळून थकलेले श्रमिक तेथे झोपलेले होते. दारूच्या नशेत बेफामपणे बस त्यांच्या अंगावर चालवण्यात आली त्याचे काहीच नाही? वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली होती. बसचा चालक मद्याच्या नशेत तर होताच, शिवाय अपघात घडल्यानंतरही तो बाटलीतील मद्य पित असल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. बसचालक मद्याच्या नशेत असल्याचे बसमधील ह्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले नव्हते? असा प्रकार पूर्वी घडलेला होता का? त्यांनी किमान व्यवस्थापनाकडे ह्याविषयी तक्रार का केली नव्हती? हा प्रकार इतरांच्याच नव्हे, तर आपल्याही जिवावर बेतू शकतो ह्याची जाणीव ह्या महाभागांना नव्हती? जसे कंत्राटदारांना व उपकंत्राटदारांस ह्या प्रकरणात दोषी धरले गेले आहे, तर मग मद्यपि चालक असलेल्या बसचा मालक आणि अशी बस आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पुरवणाऱ्या सदर कंपनीच्या व्यवस्थापनालाही दोषी का मानले जाऊ नये? त्यांच्यावर कारवाई का होऊ नये? अपघातात ठार झालेले कामगार हे परप्रांतीय आहेत आणि गरीब आहेत. ह्या अपघात प्रकरणाची कायदेशीर लढाई लढण्याचे बळ त्यांच्या नातेवाईकांपाशी नाही. त्यामुळे जसे बाणस्तारी अपघात प्रकरणात घडले तसे पैसे चारून प्रकरण मिटवण्याचा खटाटोप येथेही होऊ शकतो. पुण्यात नुकत्याच घडलेल्या आणि सध्या देशात गाजणाऱ्या पोर्श कार अपघात प्रकरणात खऱ्याचे खोटे करण्याचे किती प्रकार झाले ते आपल्यासमोर आहेच. आधी वेगळीच व्यक्ती कार चालवत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला, इतकेच नव्हे तर चालक मद्यधुंद स्थितीत असताना त्याचा वैद्यकीय अहवाल बनवताना वेगळ्याच रक्त नमुन्यांचा वापर करून तो मद्याच्या नशेत नसल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. अपघात प्रकरण दडपण्यासाठी काय काय नाटके केली जातात हे आपण अशा अपघात प्रकरणांत पाहिलेच आहे. बाणस्तारी अपघातावेळीही मालकाऐवजी चालक वाहन चालवत होता असे दाखवण्याचा जोरदार प्रयत्न झाला होता. रस्तोरस्ती भीषण अपघात होऊन निष्पाप माणसे मृत्यूच्या जबड्यात फेकली जात असताना पैशाच्या आणि राजकीय दबाव दडपणाच्या जोरावर अशा अपघातांची प्रकरणे न्यायालयात टिकू नयेत यासाठी जे प्रयत्न होतात त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. वेर्णा अपघात प्रकरणातही जनतेचा रोष वेगळ्या दिशेने वळवण्याचा जो प्रयत्न सध्या चाललेला दिसतो, तो पाहता ह्या अपघात प्रकरणी बसच्या मद्यधुंद चालकाला कठोर शिक्षा होणार की नाही ही शंका बळावली आहे. येथे एक दोन नव्हे, चार निष्पाप लोक बळी गेले आहेत. ते परप्रांतीय आहेत, गरीब आहेत, न्यायालयीन लढाई लढायची त्यांची क्षमता नाही. शिवाय त्यांचा कैवार घ्यायला येथे त्यांचे कोणी नाही. परंतु याचा अर्थ त्यांना न्याय मिळू नये असा नव्हे. ह्या प्रकरणात दोषी बसचालकाला त्याच्या गुन्ह्याची कठोर सजा पोलीस देतात की नाही ह्यावर लक्ष ठेवावे लागेल. खटला कमकुवत करण्याचा खटाटोप कोणी भविष्यात करणार असेल तर तेही जागरूकपणे पाहावे लागेल.