दिव्यांग व 85 वर्षांवरील वृद्ध मतदारांच्या मतदानास प्रारंभ

0
17

लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यात 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी मतपत्रिका मतदानाला (पोस्टल बॅलेट) सुरुवात करण्यात आली आहे.

उत्तर गोवा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील मतपत्रिका मतदानासाठी नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांचे मतदान करून घेण्याचे काम सुरू केले आहे. राज्यातील 85 वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग मिळून सुमारे 21 हजार मतपत्रिका मतदानासाठी पात्र आहेत. मतपत्रिका मतदानासाठी मतदारांना आगाऊ नोंद करावी लागत आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी कार्यालयातील मतदान पथक त्या मतदाराच्या घराला भेट देऊन त्यांच्याकडून मतदान करून घेत आहेत. येत्या 3 मेपर्यंत मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाणार आहे, असे निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

मुरगाव, साखळी, मयेतही मतदान
मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को, मुरगाव या चारही मतदारसंघात मिळून 85 वर्षावरील 267 मतदार आहेत. तर 127 दिव्यांग व्यक्ती आहेत. यात 267 पैकी 107 ज्येष्ठ व 127 दिव्यांगापैकी 81 जणांची मतदान प्रकिया पूर्ण झाली.
साखळी मतदारसंघातील 68 ज्येष्ठ नागरिकांतून 22 जणांनी तसेच विकलांग गटातील 50 पैकी 13 जणांनी मतदान हक्क बजावला. मयेतील 74 ज्येष्ठ नागरिकांमधून 23 जणांनी तर विकलांग 45 मधून 14 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.