राजकारणामध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग असण्याची गरज आहे. जनतेचे नेतृत्व करण्यासाठी दिव्यांग व्यक्ती पुढे आल्यास राज्यातील पंचायत, नगरपालिका, जिल्हा पंचायत स्तरापासून त्यांना प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवातील एका कार्यक्रमात बोलताना काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाला भेट दिली. जीएमसीमध्ये स्पाइनल कॉर्ड रिहॅब सेंटर आणि पंतप्रधान दिव्यांश केंद्र सुरू करणे ही सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी टाकलेली पावले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी महोत्सवातील सहभागी व्यक्तींशी संवाद साधला. या पर्पल महोत्सवात 17 देशांचा सहभाग आहे. दिव्यांग व्यक्ती विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मुख्य प्रवाहातील राजकारणातही दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व असण्याची गरज आहे. दिव्यांग व्यक्तींची माहिती संकलनाच्या अचूकतेमध्ये एक आव्हान आहे. दिव्यांग धोरण तयार करण्यासाठी लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, गोवा राज्य दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर व इतरांची उपस्थिती होती.