दिवेलागण…

0
290
  • गौरी भालचंद्र

एक सांगू तुम्हाला…वातावरणात प्रसन्नपणा आणण्याचं सामर्थ्य तिन्हीसांजेत असतं हेच खरं… आणि घरातील खेळीमेळीचे वातावरण त्याच्या जोडीला असेल तर क्या बात है, लाजवाब..!

तिन्हीसांजेला दिवेलागण झाली की लहान मुले-मुली बैठकीत श्‍लोक परवचा म्हणत आणि इकडे देवापुढे दिवा लावून आजी एक दिवा तुळशी वृंदावनाजवळ लावून परत देवघरात येऊन अगदी शांतपणे दिव्याच्या मंद प्रकाशात देवाकडे स्थिर मनाने आपल्या घरासाठी आणि आपल्या माणसांसाठी बरे मागायची…
संध्याकाळी मंद प्रकाशात क्षणभर डोळे मिटून दिवेलागणीच्या वेळी मनापासून देवापुढे आपण नतमस्तक होतो… आमच्यासोबत शुभंकरोती म्हणताना… आम्हाला शिकवताना आजीचा चेहरा तर समईसारखा उजळायचा अगदी.
पूर्वीच्या काळात गावाला कंदिलाच्या काचा साफ करणे, बाकीच्या दिव्यातील वाती साफ करणे हा रोजचा उद्योग असायचा आमच्या आजोबांचा… या दिवेलागणीला अनेक संदर्भ होते. या वेळेच्या आत मुलांनी खेळ आटोपून घरात यावे, हातपाय धुऊन शुभंकरोती म्हणावे आणि अभ्यासाला लागावे, अशी शिस्त होती. सांजवात करणे, तुळशीसमोर दिवा लावणे हेही होतेच. तिन्हीसांजेला दिवेलागण, धूप घालून झाला की माझे आजोबा खळ्यात आरामखुर्चीत बसून पोथी वाचत बसत…
माझी आजी सांगायची… संध्याकाळचे जेवण तयार झाले की मुलांनी पाटपाणी घ्यायची प्रथा होती. अगदी ताटाखाली आणि टेकायला पाट नसला तरी बसण्यासाठी एक पाट असायचाच. आता जमिनीवर बसण्यासाठी आपण सतरंजी वगैरे अंथरतो. पण त्या काळात अगदी आमच्याकडेही पाटावर बसण्याचीच प्रथा होती. पाणी घ्यायचे म्हणजे माठातील गार पाणी तांब्यात काढून घ्यायचे. पेल्याला फुलपात्र किंवा भांडे असा शब्द खास करून आमच्या घरी वापरात होता.

रात्रीचे जेवण झाले की बायकांचे अत्यावश्यक काम असायचे ते म्हणजे फ्रीज नसल्याने उरलेली भाजी- आमटी, दुसर्‍या भांड्यात काढून ती थंड पाण्याच्या परातीमध्ये… व्यवस्थित झाकून ठेवावी लागे. तापवलेले दूध थंड करून त्यावर जाळीचे झाकण ठेवणे, विरजण लावणे पण करावे लागे. दूधदुभत्यासाठी जाळीचे कपाट असे. रात्री कुठे बाहेर जायचे असेल किंवा अगदी अंगणात गप्पा मारत बसायचे असेल तर आईला हे सगळे आटपूनच यावे लागे.
आमचे आजोबा म्हणत, तिन्हीसांज ही पवित्र मानली जाते. त्यावेळी अवकाशात आढळणारा संधिप्रकाश कसा मनाला सुखावून जात असतो… प्रसन्न करत असतो. एक सांगू तुम्हाला… वातावरणात प्रसन्नपणा आणण्याचं सामर्थ्य तिन्हीसांजेत असतं हेच खरं… आणि घरातील खेळीमेळीचे वातावरण त्याच्या जोडीला असले तर क्या बात है, लाजवाब..!