दिवस जत्रांचे सुरू जाहले…!

0
12
  • रमेश सावईकर

हा जत्रांचा काळ आहे. गावागावांतील जत्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. कोकण, सिंधुदुर्ग व गोवा या प्रदेशांत साजऱ्या होणाऱ्या जत्रा, सण, कालोत्सव संस्कृतीमधील समता व समरसतेचे दर्शन घडवितात. गोव्यात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या जत्रा व कालोत्सवांचे स्वरूप थोडेफार बदलले तरी मूळ उद्देश, मूल्ये तशीच आहेत.

गोवा ही परशुरामभूमी. देवदेवतांची भूमी. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेली भूमी. सागराच्या फेसाळत्या लाटा, पोफळी-माडांच्या थंडगार-हवेशीर बागायती, होड्या उलट्या घालाव्यात त्याप्रमाणे भासणारे डोंगर, कडेकपारींतून धावत जाणारे झरे जणू उसळणारे हिरे वाटावेत, हिरवीगार शेते, यांमुळे गोमंतभूमीचे आकर्षण काही आगळे-वेगळे. निसर्गसौंदर्य माणसांना मोहीत करते. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटक गोमंतभूमीच्या प्रेमात पडतात.
गोव्यातील चर्चेस, मंदिरे येथील इतिहासाची साक्ष देतात. देवदेवतांची मंदिरे शहरांतच नव्हे तर अगदी ग्रामीण भागातील प्रत्येक गावात सापडणारच! देव-देवतांच्या जत्रा, कालोत्सव व लोकोत्सवाची मांदियाळी असते. या उत्सवांच्या परंपरेमुळे गोव्याची अशी वेगळी संस्कृती आहे, आणि ती टिकवून ठेवण्याचे कार्य देवभक्तांनी केले आहे. वैदिक व पुराणकाळापासूनचे सण गोमंतकीय जनता-भक्तजन तेवढ्याच भक्तीने साजरे करतात. धार्मिक विधीशिवाय पाठवाचन, कीर्तन, सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पावित्र्य व भक्तीपूर्ण वातावरणात लोक न्हाऊन निघतात. त्यांच्यामध्ये नवी उमेद, चैतन्य आणि स्फूर्ती संचारते. कोकण, सिंधुदुर्ग व गोवा या प्रदेशांत साजऱ्या होणाऱ्या जत्रा, सण, कालोत्सव संस्कृतीमधील समता व समरसतेचे दर्शन घडवितात.

‘चातुर्मास’ संपला की मोसमी पावसाची सांगता होते. कार्तिक एकादशीपासून लग्नाचा मोसम सुरू होतो, तसा गोव्यात जत्रोत्सवांना प्रारंभ होतो. वेंगुर्ला-सोनुर्ली येथील, तसेच मातोंड गावात होणारी लोटांगण जत्रा कोकण व गोव्यात प्रसिद्ध आहे. काणकोण येथील मल्लिकार्जुनाची जत्रा, शिवनाथ मंदिर शिरोडा, बोरीची नवदुर्गा- कपिलेश्वरी, कवळेची श्रीशांतादुर्गा, बांदिवड्याची श्रीमहालक्ष्मी, म्हार्दोळची श्रीम्हालसा, मडकईची श्रीनवदुर्गा, केरी-फोंडा येथील श्रीविजयादुर्गा, खांडेपारची श्रीशांतादुर्गा, वरगाव- डिचोलीची श्रीचामुंडेश्वरी, मुळगाव- डिचोलीची श्रीकेळबाय, मयेची श्रीमहामाया आदी देवतांच्या जत्रा वैशिष्ट्यपूर्ण असतात. जत्रोत्सव काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी नऊ दिवस असतो.

जत्रेनिमित्त मंदिरात अभिषेक, पूजापाठ, प्रार्थना, तीर्थ-प्रसाद, सायंकाळी कीर्तन, रात्री पालखी व नंतर नाट्यप्रयोग, लोककला कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. ज्या मंदिराच्या परिसरात देवदेवतांच्या ‘तळी’ आहेत त्या ठिकाणी सजविलेली उत्सवमूर्तीची पालखी होडीत ठेवून, जलविहार केला जातो. त्याला ‘सांगोड’ म्हटले जाते. जत्रांचे एक आकर्षण असते. जत्रेनिमित्त हजारो भक्त-भाविक देवीचे दर्शन घेतात. सुहासिनी देवीची ‘ओटी’ भरतात. जत्रेनिमित्त मंदिराच्या प्राकारात भव्य फेरी भरते. मुलांची खेळणी, भांडी, मिठाई- खासकरून ‘खाजे’, रेवड्या, बुंदीचे लाडू लोक जत्रेचा प्रसाद म्हणून खरेदी करतात. जत्रांमुळे देवस्थानासाठी मोठी आर्थिक उलाढाल होते. सावई-वेरे येथील श्रीमदनंताची ‘सख्या हरी, माझ्या पांडुरंगा’ अशी ललकारी देत भव्य मिरवणूक होते. ही जत्रा अंत्रुज महालात प्रसिद्ध आहे.

म्हापसा येथील राखणदार श्रीबोडगेश्वराची जत्रा डिसेंबर महिन्यात होते. गोवा, महाराष्ट्र (कोकण- सिंधुदुर्ग) येथून हजारो भाविक या जत्रेस उपस्थिती लावतात आणि मनोभावे आपली वर्षभर राखण करण्याची प्रार्थना करतात. मडगाव येथील दिंडी उत्सव, डिचोलीचा ‘नवा सोमवार’ गोव्यात प्रसिद्ध आहे. दिंडी उत्सवात संगीत रसिकांना सुप्रसिद्ध गायकांच्या गायन-मैफलीची पर्वणी लाभते. गावातील देवीचे दिवजोत्सवही वैशिष्ट्यपूर्ण असतात. महिला ‘दिवजां’ प्रज्वलित करून मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानिमित्ताने मंदिराच्या दीपस्तंभातील दीपमाळा पाजळतात.

चैत्र महिन्यात विठ्ठलापूर-साखळी येथील विठ्ठल-रखुमाईचा ‘चैत्री उत्सव’ गोव्यात प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध नवमी ते पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. विविध धार्मिक विधी, कथा-पाठ वाचन, आरत्या-भजन, सायंकाळी कीर्तन, रात्री पालखी मिरवणूक व नंतर मोचेमाडकर नाट्यकंपनीतर्फे सर्व उत्सवदिनी दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले जातात. दशावतारी नाट्यप्रयोगांची ही परंपरा गोवा मुक्तीपूर्व काळापासून आजतागायत चालू आहे. पौर्णिमेच्या अखेरच्या रात्रीनंतर पहाटे ‘वीरभद्र’ होऊन चैत्री उत्सवाची सांगता होते. चैत्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणात भलीमोठी फेरी भरते. वैशाख महिन्याच्या पंचमीला होणारी शिरगाव (डिचोली) येथील श्रीलईराई देवीची ‘अग्निदिव्य’ जत्रा ही गोव्यातील सर्वात मोठी व मोसमी वर्षाअखेरची शेवटची जत्रा. फक्त गोव्यातच नव्हे तर कोकण, सिंधुदुर्ग, बेळगाव या शेजारी प्रदेशांतही ती प्रसिद्ध आहे. पाच दिवस व्रत केलेले ‘धोंड’ धगधगत्या निखाऱ्यांवरून चालत जाण्याचे अग्निदिव्य करतात. धोंडांची संख्या 35 ते 40 हजारांच्या घरात असते, तर प्रत्यक्ष जत्रेस अंदाजे पाऊ लाख भाविकांची उपस्थिती असते. जत्रोत्सवानंतर पाच दिवस कौलोत्सव असतो. देवीचा कळस गावात घरोघरी फिरतो.

दक्षिण गोव्यातील फातर्फे येथील श्रीशांतादुर्गा कुंकळ्येकरीण व फातर्फेकरीण देवींच्या जत्रा गोव्यात प्रसिद्ध आहेत. जानेवारी महिन्यात या जत्रा होतात. उत्तर गोव्यातील मयेची सातेरी केळबाय, महामाया ‘माल्यांची जत्रा’, तसेच मुळगाव- डिचोलीची श्रीसातेरी-केळबाय देवीची जत्रा प्रसिद्ध आहे.
गोवा मुक्तीपूर्व काळात जत्रा व कालोत्सवात मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळ, नाईक दशावतारी नाट्यमंडळ आदींनी गोव्यात दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्याची परंपरा जतन करीत रंगदेवतेची मनोभावे सेवा केली आहे. पौराणिक कथानकांवर आधारित नाट्यप्रयोगातील संभाषणे कलाकारांना तोंडपाठ (मुखोद्गत); त्यामुळे त्यांची संवादफेक, संभाषण, गायन, वादन आदी आकर्षक व रोमांच उभे करणारे! तलवारी घेऊन लढाई करताना ती पात्रे जे कसब दाखवतात ते वाखाणण्याजोगे व डोळ्यांचे पारणे फेडणारे!
गोवा मुक्तीपूर्व काळात गोव्यात पोर्तुगीज सैनिक ‘पाखले’ व गोव्यात मुक्तिचळवळीने वेग घेतल्यानंतर दाखल झालेले आफ्रिकन सैनिक ‘खाप्री’ दशावतारी नाटकांना उपस्थित राहायचे. दशावतारी नाटकांतील राक्षसांची भूमिका करणाऱ्या कलाकारांच्या ओरड्याने ते सैनिक घाबरून जायचे असे हे दृश्य प्रत्यक्ष पाहणाऱ्या गतपिढीच्या लोकांकडून मुक्तीनंतर आम्ही ऐकले आहे.

सनातन धर्माची संस्कृती, पौराणिक काळातील कथासंदर्भाची माहिती समाजापर्यंत पोचविण्याचे मोठे कार्य या नाट्यकंपन्यांनी केले आहे. ‘पेट्रोमॅक्स’ दिव्याच्या प्रकाशात ठेवलेला बाकडा (लाकडी बाक) हे त्यांचे व्यासपीठ. त्यांची काही वाक्ये आजही आठवतात- ‘जातोस तर जाताना पेट्रोमॅक्स दिव्याला दोन पंप मारून जा’, ‘संकटांचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ पाहायला मिळत नसते’, ‘हवेत तलवार फिरवली म्हणून वाऱ्याचा शिरच्छेद होत नसतो!’ धन्य ते दशावतारी कलाकार आणि त्यांची कला!
गोव्यात जत्रोत्सवाएवढेच महत्त्व देवदेवतांच्या कालोत्सवांना लोक देतात. कालोत्सवात रात्री सादर केला जाणारा ‘काला’ हा एक लोककलेचा आविष्कार होय. मुखवटेधारी कलाकार वेगवेगळी पात्रे सादर करतात. लोकांचे मनोरंजन करणे हा हेतू असतो.
संकासुर, पुतना, म्हातारी, श्रीकृष्ण अशी मुखवटेधारी पात्रे असतात. संकासुराची भूमिका प्रमुख असते. हरदास श्रीगणेशाचा धावा करतो आणि काल्याला प्रारंभ होतो. सारे नाट्य संकासुराभोवती फिरते. थोडक्यात, कथानक असे की पुतना श्रीकृष्णाचा वध करण्याच्या इराद्याने त्याला स्तनपान करते. कृष्ण पुतनाचा वध करतो. त्यानंतर संकासुराचे आगमन होते. कापडी मुखवटा व काळा वेश धारण करून तो प्रवेश करतो. त्याच्या सोबत हरदास वेगवेगळी प्रलोभने देऊन संकासुरास गुंतवून ठेवतो.
ग्रामीण भागातील छोटी मंदिरे. त्या मंदिरांचा वार्षिक उत्सव म्हणजे ‘काला.’ लोकांचे मनोरंजन करणारा. कोकणातील दशावतारी नाट्यकंपन्यांना गोव्यात काला व नंतर दशावतारी नाट्यप्रयोग करण्याची निमंत्रणे देत असत. मध्यरात्री सुरू होणारा नाट्यप्रयोग पहाटे 4-5 वाजेपर्यंत चालायचा. लोकांना अखेरपर्यंत आसनावर खिळवून ठेवण्याची ताकद त्या कलाकारांमध्ये होती व आजच्या पिढीतही आहे.

काल्याच्या दुसऱ्या दिवशी गौळणकाला होतो. आजही देव-देवतांच्या देवस्थानांमार्फत कालोत्सवाची परंपरा चालू आहे. पूर्वी जत्रा-कालोत्सवाचा भपका, रोषणाई नव्हती. पण लोकांच्या मनातील देवाबद्दलचा श्रद्धाभाव वाखाणण्याजोगा होता. आज जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात चालतात, पण जत्रांचे नि कालोत्सवांचे मूळ मूल्य देवतांची आराधना, त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याकरिता न चुकता दर्शन घेणे. तसेच धार्मिक, सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती लावून धर्म, रूढी-परंपरांबद्दलच्या श्रद्धाभावनांचे जतन करणे हा उद्देश लोकांच्या मनात व हृदयात तसाच आहे.

गोव्यात सत्तरी व पेडणे येथे दशातवतारी नाट्य सादर करणारे कलासंघ म्हणा किंवा नाट्यमंडळे आहेत. त्यांना सरकारने प्रोत्साहन द्यावे. उत्सवाच्या निमित्ताने लोककलांचा जागर होतो. रंगभूमीची सेवा नाट्यप्रयोग सादर करून होते. त्याचबरोबर धार्मिक विधी, अनुष्ठांनाद्वारे देवदेवतांप्रती श्रद्धा व्यक्त होते. सेवा होते. आज गोव्यात जत्रोत्सवानिमित्त स्थानिक नाट्यकलाकार नाट्यप्रयोग सादर करतात. याशिवाय ग्रामीण भागातील विविध लोककला दिवजोत्सव, शिगमोत्सव, कालोत्सवाच्या माध्यमातून सादर केल्या जातात. त्यातून धर्माची परंपरा व रूढी आदींचे संवर्धन होते. गोव्यात कला अकादमीमार्फत एकांकिका, नाट्यस्पर्धा, लोकोत्सव, कीर्तन संमेलन आदींचे आयोजन केले जाते. गोव्यात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या जत्रा व काला उत्सवांचे स्वरूप थोडेफार बदलले तरी मूळ उद्देश, मूल्ये तशीच आहेत.