सर्वच पक्षांकडून मागणी
सर्वच पक्षांनी राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात राज्यपालांकडे असमर्थतता दर्शविल्यामुळे दिल्लीत आता नव्याने विधानसभा निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजप, कॉंग्रेस तसेच आम आदमी पक्ष (आप) या पक्षांच्या नेत्यांनी काल नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे त्यांना सांगितले, अशी माहिती राज्यपालांच्या कार्यालयातून देण्यात आली. कालच्या घडामोडींविषयीचा अहवाल नायब राज्यपाल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठविणार आहेत. त्यानंतर नव्याने निवडणुकीविषयीचा निर्णय होणार आहे.
आम आदमी पक्षाचे नेते संध्याकाळी जंग यांना भेटले.
नायब राज्यपालांनी सर्व राजकीय पक्षांचा या संदर्भातील निर्णय आपल्याला सांगितला अशी माहिती आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी पत्रकारांना दिली. ‘आठ महिन्यांपूर्वी आमची या संदर्भातील भूमिका होती तीच कायम आहे. दिल्लीत नव्याने निवडणुका झालेल्या आम्हाला हव्या आहेत. सरकार स्थापून दिल्लीत स्वस्त दराने वीज व पाणी आम्हाला उपलब्ध करून द्यायची आहे. तसेच सुशासनही द्यायचे आहे’, असे सिसोदिया म्हणाले.