दिल्ली-मडगाव विशेष ट्रेन आज पोचणार

0
101

नवी दिल्ली ते मडगाव ही खास रेल्वेगाडी सुमारे ७०० पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन नवी दिल्ली स्थानकावरून शुक्रवारी दुपारी रवाना झाली असून आज शनिवारी मडगावात दाखल होणार आहे. राज्यात मागील दोन दिवसात कोरोनाची बाधा झालेले ८ रुग्ण आढळून आल्याने रेल्वेगाडीतून येणार्‍या प्रवाशांबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

या रेल्वे गाडीतून येणारे ५० टक्के प्रवासी बिगर गोमंतकीय असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी गुरूवारी दिली होती. या रेल्वेतून येणार्‍या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे या खास रेल्वेमध्ये बसणार्‍या प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.

परराज्यातून आलेले नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून येत असल्याने गोमंतकीयामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गोवा राज्याचा हरित विभागात समावेश झालेला होता. परराज्यातून आलेल्या ८ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रेल्वे व इतर माध्यमातून येणार्‍या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे.

नवी दिल्ली ते तिरूअनंतपुरम या खास रेल्वेगाडीतील सात प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आलेली आहेत. त्यांना केरळ प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या रेल्वे गाडीतून १७ प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर उतरले आहेत. या प्रवाशांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईऩ करण्यात आलेले आहे.