दिल्ली पोलिसांकडून 14 दहशतवादी ताब्यात

0
5

>> राजस्थान, झारखंड व उत्तरप्रदेशात कारवाई

>> देशातील दहशतवादी हल्ल्याचा कट उघड

दिल्ली पोलिसांनी काल गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये कारवाी करत अलकायदाच्या 14 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले.
दिल्ली पोलिस दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्यांच्या पोलीस दलांच्या सहकार्याने ही मोहीम उघडली व ही कारवाई केली. भारतीय उपखंडातील अल कायदाचा (एक्यूआयएस) म्होरक्या डॉ. इश्तियाक याला झारखंडमधून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तो देशात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता.

राजस्थानमधून 6 जण ताब्यात
दिल्ली पोलिसांनी राजस्थान, झारखंड व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तेथील पोलिसांसह विविध ठिकाणी छापे टाकले. झारखंड, लोहरदगा, हजारीबाग आणि रांची या तीन जिल्ह्यांमध्ये 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या ठिकाणी दहशतवादी मॉड्यूलच्या सदस्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात होते. राजस्थानमधील भिवडी येथून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर झारखंड आणि उत्तर प्रदेशमधून 8 जणांना ताब्यात घेण्यात आले.
झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अल कायदा नेटवर्क तयार करत असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. याची पुष्टी होताच बुधवारी रात्री उशिरा झारखंडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर रात्री उशिरा छापा टाकला.

एटीएसने हजारीबागच्या लोहसिंगणा पोलीस स्थानक परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. फैजान अहमद असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अल कायदा भारतीय उपखंडातील सक्रिय सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. फैजानची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर पथकाने त्याला न्यायालयात हजर केले. यानंतर टीम त्याला रांचीला घेऊन आली.
राजस्थानमधील भिवडी येथील चौपंकी येथे अल कायदाशी संबंधित सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी चौपंकी येथील औद्योगिक परिसरात छापा टाकण्यात आला.

झारखंडमधून 7 जणांना अटक
झारखंड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. एटीएसने राज्यातील लोहरदगा, हजारीबाग, रांची या तीन जिल्ह्यांमध्ये 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. जिथून 7 दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. अल कायदा भारतीय उपखंडातील स्लीपर सेल म्हणून त्यांचे वर्णन केले जाते. एटीएस सर्व संशयितांची चौकशी करत आहे.

शस्त्रे ताब्यात

झारखंडमधील छापेमारीत एटीएसने शस्त्रेही जप्त केली आहेत. लोहरदगा येथील कुडू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेजला या पथकाने छापा टाकला. कौवाखाप येथून एका दहशतवाद्याला दोन शस्त्रांसह पकडण्यात आले आहे. गेल्या वर्षी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी फैजान उर्फ फैज याला लोहरदगा येथून अटक करण्यात आली होती. 19 वर्षीय फैजान हा लोकांना इंटरनेट मीडियावर दहशत पसरवण्याचे प्रशिक्षण देत होता. त्याचे आयएसआयएसच्या विदेशी ऑपरेटर्सशी संपर्क होते. जे भारतात हिंसक कारवाया करत होते आणि भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत होते.