दिल्लीच्या दंगलग्रस्तभागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सुरक्षा रक्षकांची गस्त वाढविण्यात आल्यानंतर काही दुकाने उघडण्यात आली तेव्हा नागरिकांनी घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि औषधांची खरेदी केली. काही ठिकाणी दगडविटांचा खच दिसून येत होता. जाफराबाद, मौजपूर, यमुना विहार, चांद बाग, मुस्तफाबाद आणि भजनपुरा या परिसरांना जातीय दंगलीचा सर्वाधिक तडाखा बसला त्या परिसरातील रस्त्यांवर वाहनांची आणि नागरिकांची गर्दी दिसून येत होती. दरम्यान,
समाज माध्यमांवर प्रक्षोभक संदेश वितरित करण्यांविरुद्ध तक्रार करता यावी यासाठी दिल्ली सरकार एक व्हॉट्सऍप क्रमांक जारी करण्याचा विचार करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आणखी तीन मृतदेह
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारातील मृतांची संख्या अजूनही वाढतचअसून दिल्ली पोलीस अधिकार्यांना काल तीन मृतदेह आढळून आले. एक मृतदेह गोकलपुरी भागातील नाल्यात आढळला. तर दोन मृतदेह त्याच परिसरातील भागीरथी विहार नाल्यातून पोलिसांनी बाहेर काढले. या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. ईशान्य दिल्लीत तीन दिवस हिंसाचार सुरू होता. या हिंसाचारात आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जखमी आहेत. हिंसाचारग्रस्त भागात अजूनही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. या बंदोबस्तात हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पण दुपारी पोलिसांना आणखी तीन मृतदेह आढळल्याने मृतांची संख्या वाढत आहे. हे मृतदेह नाल्यांमध्ये आढळले.
दिल्ली सरकारकडून हिंसाचार पीडितांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, श्री श्री रविशंकर यांनी काल रविवारी हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. नागरिकांची समस्या आणि त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांबद्दल संवेदना व्यक्त केली. दंगलग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.